Weight loss Tips : सगळं काही करूनही वजन कमी होत नाही? मग नक्कीच असणार ‘ही’ तीन कारणं

सगळं काही करुनही वजन मात्र कमी होत नसल्याचा अनुभव तुम्हाला येतोय? असं होण्यामागे काही महत्त्वाची कारणं असतात.

Weight loss Tips
सगळं काही करूनही वजन कमी होत नाही?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पथ्यं पाळूनही अनेकदा घटत नाही वजन
  • काही सवयींमुळे कमी होतो ‘वेट लॉस’ प्रक्रियेचा वेग
  • अन्न चावून खाणं सर्वात महत्त्वाचं

Weight Loss Tips : वाढता लठ्ठपणा (Obesity) ही तमाम मध्यमवर्गियांची मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि वजन घटवण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात. जिममध्ये घाम गाळणं, मैदानात धावणं, योगा करणे, चालणं, सायकलिंग करणं यासारखे कुठले ना कुठले उपाय करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तरीही वजन कमी होत नसल्याचा अनुभव अनेकांना येतो. योग्य आणि आवश्यक व्यायाम, त्याच्या जोडीला सुयोग्य आहार असं सगळं काही करूनही वजन काही कमी होण्याचं नाव घेत नाही. अशा वेळी काही सवयींचा (Habits) पुनर्विचार करण्याची गरज असते. खाण्यापिण्याचे पदार्थ बदलले तरी ते खाण्याची पद्धत जर चुकीची असेल, तर वजन कमी होत नाही. जाणून घेऊया अशा काही सवयींविषयी ज्यामुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात. 

पटापट, न चावता खाणे

अनेकांना पटापट आणि न चावता अन्न गिळण्याची सवय असते. जे लोक न चावता आणि पटापट खातात, त्यांचं वजन इतरांच्या तुलनेत जास्त असतं. पटापट खाण्यामुळे अन्न नीट चावलं जात नाही. त्यामुळे त्या अन्नाचं पचन व्हायला वेळ लागतो आणि आपल्या पचनसंस्थेवर अनावश्यक ताण येतो. पचनसंस्थेवर सातत्याने ताण येत गेल्यामुळे पचन नीट होत नाही आणि वजन वाढत राहतं. त्यासाठी नाश्ता किंवा जेवण हळूहळू आणि नीट चावून करणं आवश्यक आहे. अन्न न चावता खाण्यामुळे इतरही आरोग्याच्या समस्या बळावण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Skin Care Tips: त्वचेवरील टॅन दूर करण्यासाठी 'हे' फ्रूट Face Pack अत्यंत फायदेशीर

एकाच जागी बसणे

अनेकांना कामानिमित्त तासन्‌तास एकाच जागी बसावं लागतं. मधल्या काळात शरीराची काहीही हालचाल होत नाही. काहीजण सलग आठ-नऊ तास एकाच जागी बसून काम करतात. त्यामुळे शरीराची पचनक्रिया मंदावते आणि वजन वाढायला सुरुवात होते. शरीरात फॅट्स जमा झाल्यामुळे चरबी वाढते आणि लठ्ठपणाचा प्रवास सुरू होतो. तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तरी या सवयीमुळे तुम्हाला उशीर लागू शकतो. त्यासाठी कामाच्या ठिकाणी काही मिनिटांनी ब्रेक घेणे आणि जागेवरून उठून स्ट्रेचिंग करणे, वॉक घेणे यासारख्या कृती गरजेच्या आहेत. 

अधिक वाचा - Health News: अंजीर खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे, 'या' समस्या होतात दूर

अल्कोहोल आणि इतर व्यसने

दारु पिण्याचं व्यसन असलेल्या व्यक्तींना वजन कमी करण्यात अनेक अडथळे येतात. अल्कोहोलमुळे अनेक कॅलरीज शरीरात जातात. नियमितपणे दारु पिणाऱ्या व्यक्तींनी रोज व्यायाम केला तरीही इतरांच्या तुलनेत त्यांचं वजन कमी होण्याचा वेग फारच कमी असतो. शिवाय दारुच्या अतिसेवनाने मधुमेह, लिव्हर इन्फेक्शन आणि हृदयरोग होण्याचीदेखील शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर अगोदर सर्व प्रकारच्या व्यसनांतून बाहेर पडणं गरजेचं आहे. 

डिस्क्लेमर - या सर्व घरगुती स्वरुपाच्या टिप्स आहेत. तुम्हाला यासंबंधी काही गंभीर समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी