Bad Breath | श्वासांना येणारी दुर्गंधी ही अनेकांची समस्या असते. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी यामुळे अनेकांना अवघडून जायला होतं. आपल्या श्वासाला दुर्गंधी येते, याची जाणीवही अवघडून टाकणारी असते. मात्र नेमकं काय करावं, हे काही समजत नाही. रोजच्या रोज ब्रश करून आणि माउथ फ्रेशनरचा वापर करूनही तोंडाची दुर्गंधी कमी होत नसल्याचा अनुभव अनेकांना वारंवार येतो. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय फायद्याचे ठरू शकतात. वास्तविक, तोंडाला किंवा श्वासाला येणारी दुर्गंधी ही बहुतांश वेळा दातांमध्ये तयार होणाऱ्या बॅक्टेरियामुळे येत असते. यावर वेळीच उपाय केला नाही तर पायरियासारखे गंभीर विकार त्यातून उद्भवण्याची शक्यता असते. मात्र काही परंपरागत घरगुती उपाय नियमित केले, तर या समस्येपासून कायमची सुटका होऊ शकते. जाणून घेऊया, अशाच काही उपायांबाबत.
श्वासाला येणाऱ्या दुर्गंधीला पळवून लावायचं असेल, तर दालचिनी हा त्यासाठी उत्तम उपाय आहे. दालचिनी सिल्लमिक ॲल्डिहाईड नावाचा घटक असतो. श्वासांची दुर्गंंधी दूर कऱण्यासाठी हा घटक उपयुक्त ठरतो. त्यासाठी चहामध्ये दालचिनीचा वापर तुम्ही करू शकता किंवा दालचिनी पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्याही करू शकता. कुठल्याही प्रकारे दालचिनी वापरणे हे या समस्येवर चांगले उत्तर ठरते.
अधिक वाचा - Skin Care Tips: सुंदर त्वचेसाठी तुमच्या आहारात करा बदल, आतापासून 'या' 6 पदार्थांचा करा समावेश
जेवण झाल्यानंतर माउथ फ्रेशनर म्हणून बडीशेप खाण्याची सवय अनेकांना असते. ही उत्तम सवय असून त्यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. बडीशेपेत अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे श्वासांची दुर्गंधी निघून जाते आणि तोंडाला वास येण्याचं प्रमाण कमी होतं. चहा करताना त्यात बडीशेप वापरल्याचाही फायदा होतो. त्यामुळे चहाची चवही उत्तम होते आणि श्वासांनाही फायदा होतो. मात्र बडीशेप ही जेवण झाल्यानंतर खाणे, हाच सर्वोत्तम मार्ग मानला जातो.
अधिक वाचा - Blood Sugar Control Tips : रक्तातील साखर अचानक वाढली तर काय करायचं? या गोष्टी ठेवा लक्षात
तोंडाला आणि श्वासाला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी माउथ फ्रेशनर आणि माउथ वॉशचाही उपयोग करण्यात येतो. बाजारात अनेक प्रकारचे माउथ वॉश उपलब्ध असतात. मात्र बाजारात मिळणारे माउथवॉश रोजच्या रोज वापरू नयेत, असा सल्ला दिला जातो. यामध्ये क्लोरेहेक्सिडाईन नावाचं रसायन असतं, ज्यामुळे दातांचं नुकसान होऊ शकतं.
झोपेतून उठल्यावर तोंडाला आणि श्वासांना वास येत असेल, तर त्याची फारशी काळजी कऱण्याची चिंता नसते. ही बाब नैसर्गिक असून अनेक तास तोंड बंद असल्यामुळे दातात तयार होणाऱ्या बॅक्टेरियामुळे ही घटना घडते. अर्थात, श्वासांना येणारी दुर्गंधी दूर करण्याबाबतचे हे केवळ काही घरगुती उपाय आहेत. याबाबत तुम्हाला काही गंभीर समस्या असेल, तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणं गरजेचं आहे.