कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक व्ही पैकी सर्वोत्तम कोरोना प्रतिबंधक लस कोणती?

भारत सरकारने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लससह देशात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरू केली. नंतर रशियन बनावाटीची स्पुटनिक व्ही लस पण भारतात उपलब्ध झाली.

Know all about covid-19 vaccines, which is better among Covishield, Covaxin, Sputnik V, Moderna, Johnson & Johnson?
कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक व्ही पैकी सर्वोत्तम कोरोना प्रतिबंधक लस कोणती?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक व्ही पैकी सर्वोत्तम कोरोना प्रतिबंधक लस कोणती?
  • मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन या दोघांच्या लस भारतात कधी उपलब्ध होणार हा प्रश्न आजही अनुत्तरीत
  • कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लस भारतात उपलब्ध

नवी दिल्ली: भारत सरकारने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लससह देशात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरू केली. नंतर रशियन बनावाटीची स्पुटनिक व्ही लस पण भारतात उपलब्ध झाली. मॉडर्ना कंपनीची लस तसेच जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लस यांना भारत सरकारने आपत्कालीन वापराची मंजुरी दिली असली तरी या दोन कंपन्यांच्या लस भारतात कधी उपलब्ध होणार हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. भारत सरकारने आतापर्यंत कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक व्ही, मॉडर्ना कंपनीची लस तसेच जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लस यांना आपात्कालीन वापराची मंजुरी दिली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये १२ वर्षांवरील मुलांसाठीची कोवोवॅक्स ही कोरोना प्रतिबंधक लस देशात उपलब्ध होईल. ही लस पुण्याची 'सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया' तयार करत आहे. कंपनीने कोवोवॅक्स या लससाठी आपत्कालीन वापराची परवानगी मागितली आहे. Know all about covid-19 vaccines, which is better among Covishield, Covaxin, Sputnik V, Moderna, Johnson & Johnson?

कोविशिल्ड (Covishield)

ब्रिटिश स्वीडिश अॅस्ट्राझेन्का, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि पुण्याची 'सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया' यांनी संयुक्तपणे कोविशिल्ड लसची निर्मिती केली आहे. भारतात सिरमच्या फॅक्टरीत लसची निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. व्हायरल व्हेक्टर पद्धतीचा वापर करुन ही लस तयार करण्यात आली आहे. ही लस सामान्य सर्दीच्या विषाणूचे कमकुवत रूप आहे. याला एडेनोव्हायरस असेही म्हणतात. हा प्रामुख्याने चिंपाझीला बाधीत करतो. या विषाणूमध्ये काही बदल करुन हा कोरोनाच्या विषाणूसारखा दिसेल अशी व्यवस्था करण्यात आली. हा विषाणू शरीरात गेला तरी कोरोनाचे कारण होणार नाही पण या विषाणूमुळे शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिजैविके विकसित होतील. 

कोविशिल्डचे प्रत्येक व्यक्तीला दोन डोस दिले जातात. प्रत्येक डोसमध्ये अर्धा मिलि. लस असते. दोन डोसमध्ये भारतात सध्या ८४ दिवसांचे अंतर ठेवले जात आहे. परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्यांना २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतातील अठरा आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला ही लस घेता येऊ शकते. सरकारी लसीकरण केंद्रावर ही लस विनामूल्य उपलब्ध आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये कोविशिल्डचा एक डोस ७८० रुपयांत उपलब्ध आहे. यात जीएसटीच्या १५० रुपयांचाही समावेश आहे. ही लस ८२ टक्के प्रभावी असल्याचे आतापर्यंतच्या निरीक्षणांतून आढळले आहे.

कोवॅक्सिन (Covaxin)

हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआर आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी अर्थात एनआयव्ही यांच्या सहकार्याने संयुक्तपणे कोवॅक्सिन ही लस विकसित केली आहे. कोवॅक्सिन ही लस एका निष्क्रीय कोरोना विषाणूपासून तयार करण्यात आली आहे. हा विषाणू शरीरात गेल्यावर कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास असमर्थ आहे. पण हा विषाणू शरीरात गेल्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिजैविके विकसित होतील. सार्स कोव्ह २ (SARS Cov2) या अँटीबॉडी (प्रतिजैविके) विकसित होतील.

कोवॅक्सिनचे प्रत्येक व्यक्तीला दोन डोस दिले जातात. दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर राखले जाते. भारतातील अठरा आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला ही लस घेता येऊ शकते. सरकारी लसीकरण केंद्रावर ही लस विनामूल्य उपलब्ध आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये कोवॅक्सिनचा एक डोस १४१० रुपयांना उपलब्ध आहे. यात जीएसटीच्या १५० रुपयांचाही समावेश आहे. ही लस ८१ टक्के प्रभावी असल्याचे आतापर्यंतच्या निरीक्षणांतून आढळले आहे. भारतात कोवॅक्सिनचे दोन ते बारा वयोगटातील मुलांवर प्रयोग सुरू आहेत.

स्पुटनिक व्ही (SPUTNIK V)

रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड अंतर्गत गमलेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी यांनी ही लस विकसित केली आहे. भारतात हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबकडे ही लस तयार करण्याचा परवाना आहे. या व्यतिरिक्त भारतातील हेटेरो बायोफार्मा, ग्लँड फार्मा, स्टेलिस बायोफार्मा आणि विरचो बायोफार्मा यांनाही लस निर्मितीचे परवाने मिळाले आहेत. व्हायरल व्हेक्टर पद्धतीचा वापर करुन ही लस तयार करण्यात आली आहे. पण स्पुटनिक व्ही दोन डोससाठी दोन स्वतंत्र एडेनोव्हायरसचा वापर करते. यामुळे शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिजैविके विकसित करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होते. भारतात २१ दिवसांच्या अंतराने या लसचे दोन डोस दिले जातात. ही लस अपोलो, मेदांता, फोर्टिस हेल्थकेयर अशा निवडक मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये ही लस ११४५ रुपयांत उपलब्ध आहे. ही लस ९१.६ टक्के प्रभावी आहे. भारतातील अठरा आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला ही लस घेता येऊ शकते.

मॉडर्ना (Moderna)

मैसाचुसेट्स येथील मॉडर्न थेरेप्यूटिक्सने अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेशिअस डिजीजच्या सहकार्याने लस विकसित केली आहे. ही लस mRNA अर्थात मेसेंजर RNA तंत्राच्या मदतीने विकसित केली आहे. ही लस शरीरात प्रवेश करताच कोशिकांना सार्स कोव्ह २ (SARS Cov2) या अँटीबॉडी (प्रतिजैविके) विकसित करण्यासाठी स्पाइक प्रोटिन बनवण्याचे निर्देश देते. या लसचे प्रत्येक व्यक्तीला दोन डोस दिले जातात. प्रत्येक डोसमध्ये अर्धा मिलि. लस असते. दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर असते. ही लस ९४.१० टक्के प्रभावी आहे. भारतात या लसला आपात्कालीन वापराची मंजुरी मिळाली असली तरी ही लस देशात अद्याप उपलब्ध झालेली नाही. तसेच भारतातील या लसची अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. अमेरिकेत या लसचा एक डोस १५ डॉलर म्हणजे साधारण १११४ रुपयांत उपलब्ध आहे. युरोपमध्ये ही लस १८ डॉलर म्हणजे साधारण १३३७ रुपयांत उपलब्ध आहे. भारतात ही लस आयात करण्याचा परवाना सिप्ला कंपनीकडे आहे. 

जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson)

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची उपकंपनी असलेल्या जेनसेन फार्मास्युटिकल्स यांनी लस तयार केली आहे. हैदराबादच्या बायोलॉजिकल ई लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून भारतात लसचा पुरवठा होणार आहे. भारतात या लसला आपात्कालीन वापराची मंजुरी मिळाली असली तरी ही लस देशात अद्याप उपलब्ध झालेली नाही. तसेच भारतातील या लसची अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. ही लस शरीरात प्रवेश करताच कोशिकांना सार्स कोव्ह २ (SARS Cov2) या अँटीबॉडी (प्रतिजैविके) विकसित करण्यासाठी स्पाइक प्रोटिन बनवण्याचे निर्देश देते. लससाठी सुधारित (कस्टमाइज्ड) एडेनोव्हायरसचा वापर करण्यात आला आहे. या लसचा फक्त एकच डोस पुरेसा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ही लस ८५ टक्के प्रभावी आहे. लसची अमेरिकेतील किंमत दहा डॉलर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी