Danger of Pani Puri : पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पावसाळ्यात मनावर ठेवा ताबा, अन्यथा होईल ‘पानी पुरी डिसीज’

पावसाळ्यात स्ट्रीट फूड खाणं किती धोकादायक ठरू शकतं, याचं उदाहरण तेलंगणामध्ये दिसून आलं आहे. तेलंगणात वाढत चाललेल्या टायफॉईडला रस्त्यावर विकली जाणारी पाणीपुरी जबाबदार असल्याचं तेलंगणा सरकारनं म्हटलं आहे.

Danger of Pani Puri
पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान!  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पाणीपुरीप्रेमींना सावधानतेचा इशारा
  • दूषित पाण्यामुळे होऊ शकतो टायफॉईड
  • पाणी उकळून पिण्याचा सल्ला

Danger of Pani Puri : वर्षभरातील सर्वाधिक साथीचे आजार पसरण्याचा काळ म्हणजे पावसाळा. पावसाळी वातावरणात घरोघरी तब्येतीच्या काही ना काही कुरबुरी सुरू असल्याचं दिसतं. त्यापैकी एक कॉमन आजार म्हणजे टायफॉईड. दूषित पाण्याच्या वापरामुळे होणारा हा आजार भारतातील अनेक भागात पावसाळ्यात डोकं वर काढत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. आता तर तेलंगणा राज्यानं पाणीपुरी या खाद्यपदार्थालाच त्यासाठी जबाबदार धरलं असून सर्व पाणीपुरी विक्रेत्यांना स्वच्छता राखण्याचा दम भरला आहे.

तेलंगणा आणि पाणीपुरी

तेलंगणात गेल्या काही दिवसांपासून टायफॉईडच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जून महिन्यात तेलंगणामध्ये टायफॉईडचे 2752 रुग्ण आढळून आले होते. मे महिन्यातही 2700 रुग्ण सापडले होते. यातील बहुतांश रुग्णांना पाणीपुरी खाल्लामुळेच टायफॉइची लागण झाल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे तेलंगणातील आरोग्य खात्याचे संचालक डॉ. श्रीनिवास राव यांनी या आजाराला ‘पानी पुरी डिसिज’ असं म्हटलं आहे. लोकांनी स्ट्रीट फूडपासून पावसाळ्याच्या कालावधीत शक्यतो दूर राहावं, असा सल्ला सरकारच्या वतीनं नागरिकांना देण्यात आला आहे. 

अधिक वाचा - Side effects of Holding Pee : लघवी रोखून धरल्यामुळे काय होतं? वाचा आणि चुका टाळा

पाणीपुरीमुळे वाढतायत आजार

पाणीपुरी या पदार्थात काही दोष नसला तरी रस्त्यावर ते पदार्थ विकत असताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नसल्यामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत असल्याचं चित्र आहे. दूषित पाणी, डास आणि दूषित अन्नामुळे मलेरिया, डायरिया आणि व्हायरल फिव्हरसारखे आजार डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. तेलंगणात आतापर्यंत डायरियाचे 6 हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले असून डेंग्युच्या रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ नोंदवली जात आहे. 

टायफॉईडची लक्षणे

टायफॉईड हा एक बॅक्टेरियल आजार आहे. दूषित अन्न किंवा दूषित पाणी पोटात गेल्यामुळे हा आजार होतो. दीर्घकाळापर्यंत अंगात ताप राहणे, पोटदुखी, पोटात मुरडा मारणे, भूक मरणे यासारखी लक्षणे या आजारात जाणवतात. जर वेळेत यावर उपचार घेतले नाहीत, तर हा आजार अधिक गंभीर लक्षणं धारण करण्याची शक्यता असते. त्यानंतर उलट्या होणे, उलटीतून रक्त पडणे, अंतर्गत रक्तस्राव होणे, त्वचा पिवळी पडणे यासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Fruits for weight loss : वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय? ही फळं खाल्ली तर लवकर मिळेल फळ

करा हे उपाय

पावसाळी आजारांपासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, प्रत्येक वेळी शौचाला जाऊन आल्यानंतर हातपाय धुणे, खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल पकडणे, नाक आणि तोंडाला सतत हाताने स्पर्श करायचं टाळणे यासारखे खबरदारीचे उपाय त्यावर सुचवले जातात. 

स्ट्रीट फूडला ब्रेक

पावसाळ्याच्या काळात रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळा आणि पाणी उकळून प्या, असा सल्लाही डॉक्टर देतात. अशा प्रकारची प्राथमिक काळजी पहिल्यापासून घेतली तर पावसाळी आजारांना दीर्घकाळ दूर ठेवणं सहज शक्य होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी