Morning Headache : झोप (Sleep) हे माणसाला लाभलेलं वरदान आहे. दिवसभर कितीही कष्ट घेतले तरी रात्री पुरेशी झोप झाल्यावर सकाळी एकदम ताजंतवानं (Fresh and energetic) आणि फ्रेश वाटतं. सगळा थकवा निघून जातो आणि नव्यानं काम सुरू करण्यासाठी आपण तयार होतो. मात्र अनेकांना सकाळी उठल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी डोकेदुखीचा (Headache) त्रास होतो. रात्री नीट झोप झाली तरीही सकाळी डोकेदुखीनंच जाग येते. त्यामुळे पूर्ण दिवस आळसात आणि त्रासात जातो. असं होण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. अनेकदा डिहायड्रेशनमुळे डोकेदुखीचा त्रास होतो. हा त्रास काही सोप्या उपायांनी दूरही करता येतो. जाणून घेऊया, अशा डोकेदुखीमागची कारणं आणि त्यावरील सोपे उपाय.
सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी होण्याची अनेक कारणं असू शकतात. शरीरातील पाण्याची पातळी कमी झालेली असणं, रात्री अतिरिक्त मद्यपान केलेलं असणं, दुपारच्या वेळी उन्हात जास्त वेळ फिरणं यासारख्या कारणांमुळे सकाळी उठल्यावर डोकं दुखण्याची शक्यता असते. याशिवाय तणाव आणि वेगवेगळ्या आजारांमुळेही सकाळच्या वेळी डोकं दुखू शकतं. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार याची फार चिंता करण्याची गरज नसते. सोप्या उपायांनी यावर मात करता येऊ शकते.
शरीराचं नैसर्गिक चक्र बदलल्यामुळेही सकाळी डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. प्रत्येकाच्या शरीराचं घड्याळ हे निसर्गक्रमाशी जोडलेलं असतं. सूर्योदय आणि सूर्यास्तानुसार आपलंं शरीर काम करत असतं. मात्र अनेकजणांना शिफ्टमध्ये काम करावं लागतं. त्यामुळे दर आठवड्याला किंवा महिन्याला झोपेच्या वेळा बदलत राहतात. त्यामुळेच कुठल्याच एका वेळापत्रकाची शरीराला सवय होत नाही. वारंवार झोपेच्या वेळा बदलत राहण्याचा परिणाम शरीरावर होतो आणि त्यामुळे डोकेदुखीचा त्रास जाणवत राहतो.
अनेकांना झोपेसंबंधीचे काही विकार असू शकतात. अशा व्यक्तींना रात्री सलग आणि गाढ झोप लागत नाही. झोप पुरेशी आणि चांगल्या दर्जाची न झाल्यामुळेही सकाळी डोकं दुखण्याची शक्यता असते. स्लीप ॲनिमिया नावाच्या आजाराचंही हे लक्षण असू शकतं. यामध्ये रात्री झोप नीट लागत नाही आणि दिवसभर थकवा जाणवत राहतो. अशा व्यक्ती रात्री अधिक घोरत असल्याचंही दिसतं.
अधिक वाचा - Weight Loss: वजन कमी करायचे आहे पण Craving ने झालात हैराण?, मग आजपासून खा 'या' पाच गोष्टी
डिप्रेशन, अँग्झायटी यासारख्या मानसिक कारणांमुळेही रात्री झोप लागत नाही आणि सकाळी उठल्यावर डोकेदुखी सुरु होते. त्याचप्रमाणं काही शारीरिक आजार असतील, तर त्यावर घेतल्या जाणाऱ्या औषधोपचारांचाही परिणाम मेंदूवर होत असतो. त्यामुळेही सकाळी डोकं दुखण्याची शक्यता असते.
भरपूर पाणी पिणं हा डोकेदुखी थांबवण्यासाठीचा उपाय सांगितला जातो. दिवसभर भरपूर पाणी पिणं आणि अधूनमधून पित राहणं गरजेचं आहे. मात्र झोपताना भरपूर पाणी न पिण्याचा सल्लाही दिला जातो. झोपण्यापूर्वी किमान तासभर पाणी पिऊ नये. त्यामुळे रात्री लघवी लागून झोपमोड होण्याची शक्यता कमी होते. याशिवाय उत्तम आहार आणि चांगली जीवनशैली हाच त्यावरचा सर्वोत्तम उपाय सांगितला जातो.
डिस्क्लेमर - डोकेदुखी कमी कऱण्याबाबतच्या या काही सामान्य आणि घरगुती स्वरुपाच्या टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे.