Woman Health Tips: मासिक पाळीदरम्यान कधीच करू नका या चुका, होईल नाहक त्रास

पिरियड्सच्या काळात काळजी घेण्यासोबतच काही चुका टाळणे आवश्यक असते. अनेक तरुणींना वेळेवर पॅड बदलण्याची सवय नसते. ही सवय महागात पडू शकते. पिरियड्सच्या काळात वापरले जाणारे पॅड्स योग्य वेळी बदलण्याची गरज असते.

Woman Health Tips
मासिक पाळीदरम्यान कधीच करू नका या चुका  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मासिक पाळीदरम्यान तरुणींकडून होतात अनेक चुका
  • दिवसातून किमान तीन वेळा पॅड बदलणं आवश्यक
  • पाळीच्या काळात कधीही चुकवू नका व्यायाम

Woman Health Tips: मासिक पाळी (Periods) सुरु असताना तरुणींनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी (Health Care) घेण्याची गरज असते. या काळात स्वच्छतेची काळजी घेणे आणि आरोग्याबाबत कुठलीही हेळसांड न करणे आवश्यक असल्याचं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. या बाबतीत काळजी घेतली नाही, तर आरोग्याबाबतच्या अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. मासिक पाळीच्या काळात नेमक्या कुठल्या बाबींची काळजी घेण्याची गरज असते, त्यासाठी नेमकं काय करायला हवं आणि कशा प्रकारे मासिक पाळीच्या काळात घेतलेली काळजी आरोग्यावर सकारात्मक परिणाम करणारी ठरू शकते, ते समजून घेऊया. 

वेळेवर पॅड बदलणे

पिरियड्सच्या काळात काळजी घेण्यासोबतच काही चुका टाळणे आवश्यक असते. अनेक तरुणींना वेळेवर पॅड बदलण्याची सवय नसते. ही सवय महागात पडू शकते. पिरियड्सच्या काळात वापरले जाणारे पॅड्स योग्य वेळी बदलण्याची गरज असते. मात्र अनेक तरुणी याबाबत गोंधळलेल्या अवस्थेत असतात. याविषयी शास्त्रोक्त माहिती घेतली नाही, तर त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होत असतात. आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार एक पॅड चार तासांपेक्षा जास्त काळ लावून ठेवू नये, असा सल्ला दिला जातो. पॅड दीर्घकाळ लावून ठेवल्यामुळे रक्त शोषून घेण्याची त्याची क्षमता कमी होते. त्यामुळे दिवसातून किमान 3 वेळा पॅड बदलणे आवश्यक असते. 

अधिक वाचा - Hands Legs Tingling: तुमच्या हाताला आणि पायाला मुंग्या येतात? मग या जीवनसत्त्वाची आहे कमतरता

व्यायामाला सुट्टी नको

मासिक पाळीच्या काळात अनेक तरुणींना थकवा जाणवतो. त्यामुळे या काळात आराम करण्याकडे अनेकजणीचा कल असतो. मासिक पाळीच्या काळात व्यायाम टाळला जातो. मात्र असे करणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. व्यायाम केल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि दिवसभर तुमची ऊर्जा टिकून राहिल. त्याशिवाय व्यायाम केल्यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या वेदनादेखील कमी होतील. मात्र या काळात कुठलाही जड आणि थकवणारा व्यायाम करू नका. हलका आणि स्ट्रेचिंगच्या स्वरुपातील व्यायाम या काळात उत्तम असल्याचं सांगितलं जातं. 

मिठाचं प्रमाण आवरा

मासिक पाळीच्या काळात ब्लोटिंगची समस्या अनेकींना त्रास देत असते. या काळात प्रमाणापेक्षा जास्त मिठाचं सेवन केलं, तर अनेक त्रास सुरु होण्याची शक्यता असते. या काळात शक्यतो मिठाचं प्रमाण अधिक असणारे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. 

अधिक वाचा - Blood Pressure: वयानुसार किती ब्लडप्रेशर योग्य? महिला आणि पुरुषांसाठी असतात वेगवेगळे निकष

नाश्ता न करणे

मासिक पाळीच्या काळात शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्त जात असतं. त्यामुळे अशक्तपणा येण्याची शक्यता असते. या काळात शरीराला अधिकाधिक पोषण मिळणं आवश्यक असतं. त्यासाठी तुम्हाला सकाळचा नाश्ता करणं आवश्यक आहे. दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने केली, तर दिवस अधिक उत्साहात जाऊ शकतो. 

डिस्क्लेमर - मासिक पाळीच्या काळात घेण्याच्या काळजीबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न वा समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी