How much Coffee good for health | सकाळी सकाळी गरमागरम कॉफी (Coffee) प्यायला कुणाला आवडत नाही? एक्स्पेसो (Expresso) असो किंवा मोचा (Mocha), कॉफी पिण्याची मजा काही औरच. थकवा घालवण्यासाठी आणि मूड रिफ्रेश करण्यासाठी कॉफी हे अनेकांचं मनपसंत पेय असतं. अनेकदा काम करताना आलेली सुस्ती घालवण्यासाठी कॉफीचा उपयोग केला जातो. काहीजणांना तर कॉफी पिण्यासाठी फक्त कारणच हवं असतं. कधी कंटाळा आला म्हणून, कधी काही चांगली बातमी आली म्हणून, कधी मूड ऑफ झाला म्हणून तर कधी मीटिंग सुरू असताना औपचारिकता म्हणूनही लोक कॉफी पितात. काहींना तर कॉफीचं व्यसनच लागलेलं असतं. कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं निमित्त करत ते कॉफी ढोसणं सुरूच ठेवतात.
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा आरोग्यासाठी हानीकारक असतो. कॉफी हादेखील त्याला अपवाद नाही. कॉफीमध्ये असणारं कॅफिन जर प्रमाणापेक्षा अधिक झालं, तर अनेक दुष्परिणाम शरीरावर होत असतात. जाणून घेऊया याच साईट इफेक्ट्सबाबत.
साऊथ ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या ऑस्ट्रेलिया सेंटर फॉर प्रिसिजन हेल्थ या संस्थेनं कॉफीबाबत एक अभ्यास नुकताच प्रकाशित केला आहे. त्यानुसार ज्या व्यक्ती दिवसातून तीन ते पाच कप एक्स्पेसो कॉफी पितात, त्यांच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढलेली असते. त्यामुळे रक्तातील लिपिडचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे हृदयाचं आरोग्य बिघडायला सुरुवात होते. एका अभ्यासानुसार, दिवसातून तीन ते पाच कप कॉफी पिणाऱ्या महिलांच्या तुलनेत तितकीच कॉफी पिण्याऱ्या पुरुषांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक आढळून आलं आहे.
प्रमाणापेक्षा अधिक कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये चिडचिड आणि अस्वस्थता येण्याचं प्रमाण अधिक दिसून आलं आहे. ही सर्व अँग्झायटी या आजाराची लक्षणं आहेत. काहीजणांसाठी कॉफी हा ‘बुस्टर डोस’ ठरू शकतो. मात्र तुम्ही अँग्झायटीचे रुग्ण असाल, तर कॉफीचा दुसरा कप भरण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार केलेलाच बरा.
आधुनिक कॉफीतील कॅफेन हे शरीराला कायम सतर्क ठेवत असतं. मात्र त्यामुळे शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात. ॲस्ट्रोजन नावाच्या हार्मोनच्या प्रमाणात झालेले बदल महिलांसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता असते.
झोप येऊ नये किंवा आलेली झोप उडून जावी, यासाठी अनेकजण कॉफी पितात. मात्र सतत असं करण्यामुळे निद्रानाशाचा त्रास सुरू होण्याची शक्यता असते. प्रमाणात कॉफी पिणाऱ्यांना मात्र हा धोका नसतो. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत कॉफीत असणारं कॅफेन झोपेच्या वर्तुळाला भेदत नाही.
यापूर्वी झालेल्या संशोधनानुसार दिवसातून 5 पेक्षा अधिक कप कॉफीचं सेवन हे हानीकारक मानलं जात होतं. मात्र नव्या संशोधनानुसार दिवसाला 3 ते 5 कप कॉफीचं सेवन करणं, हेदेखील हानीकारक असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे दिवसातून दोन ते तीन कप कॉफीच सुरक्षित असल्याचं म्हणता येतं.