Fitness Funda | शरीरातील अनावश्यक चरबी (Unwanted Fats) करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. काहीजणांना त्यात लवकर यश येतं, तर काहीजण अनेक महिने प्रयत्न करूनही त्यात यशस्वी होत नाहीत. काहीजण प्रयत्न केल्यावर यशच मिळत नसल्यामुळे निराश होतात आणि व्यायाम करणेच सोडून देतात. कुठल्या वेळी व्यायाम करावा, हे माहित नसल्यामुळे असे प्रकार घडतात. नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनातील निष्कर्षानुसार व्यायाम करण्यासाठी जर योग्य वेळ निवडली तर अपेक्षित परिणाम अधिक वेगाने दिसायला सुरुवात होते.
वास्तविक, सकाळच्या वेळी व्यायाम करावा, असं आपल्याकडे सांगितलं जातं. सकाळ हीच परंपरागतरित्या व्यायामासाठी योग्य वेळ मानली जाते. अनेकजण पहाटेपासून सूर्यादयापर्यंतची वेळ ही सर्वोत्तम मानतात. मात्र नव्याने करण्यात आलेल्या संशोधनानुसार महिला आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळ्या वेळा व्यायामासाठी योग्य असल्याचं दिसून आलं आहे.
महिलांसाठी सकाळच्या वेळी केलेला व्यायाम जास्त फायदेशीर ठरतो, असं फ्रंटियर्स इन फिजिऑलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटलं आहे. वेगवेगळ्या वेळी व्यायाम करणाऱ्या महिलांचा एकत्रित अभ्यास केला, तर ज्या महिला सकाळच्या वेळेत व्यायाम करतात, त्यांच्या शऱीरातील चरबी घटण्याचं प्रमाण हे इतर महिलांच्या तुलनेत अधिक असतं, असं या अभ्यासातून दिसून आलं आहे.
न्यूयॉर्कमधील डॉ. पॉल. जे. आसीर्रो यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या शरीरात साठलेली अनावश्यक चरबी करण्यासाठी सकाळच्या वेळी केलेला व्यायाम सर्वाधिक फायद्याचा ठरतो. त्यामुळे ज्या महिला चरबी करण्यासाठी आणि वजन घटवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांच्या व्यायामासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम आहे. मात्र असं असलं तरी सरसकट सर्व कारणांसाठी सकाळीच व्यायाम कऱण्याची गरज नाही. व्यायामाच्या उद्देशानुसारही वेगवेगळ्या वेळा फायदेशीर असल्याचं समोर आलं आहे.
चरबी कमी करण्यासाठी सकाळची वेळ उपयुक्त असली तरी मसल ट्रेनिंग आणि शरीराची क्षमता वाढवण्यासाठी मात्र संध्याकाळी केलेला व्यायाम उपयुक्त ठरत असल्याचं दिसून आलं आहे. संध्याकाळी केलेल्या व्यायामामुळे मनोबल सुधारण्यासही मदत होत असल्याचं दिसून आलं आहे.
पुरुषांसाठी मात्र संध्याकाळ हीच व्यायामासाठीची योग्य वेळ असल्याच दिसून आलं आहे. कोलेस्टेरॉल पातळी कमी करणे, रक्तदाब आणि श्वासावर नियंत्रण मिळवणे आणि इतर शारीरिक सुधारणांसाठी पुरुषांनी संध्याकाळी व्यायाम करण्याचा सल्ला या संशोधनातून देण्यात आला आहे. पुरुष सकाळच्या तुलनेत संध्याकाळी व्यायाम करताना कमी थकतात, असंही या संशोधनातून दिसून आलं आहे.
व्यायमाची अधिक परिणामकारक वेळ कुठली, याच्या संशोधनासाठी 30 महिला आणि 26 पुरुषांवर प्रयोग करून हा निष्कर्ष काढण्यात आला. फिट, अनफिट, धुम्रपान करणारे आणि कुठलाही आजार नसणारे अशा प्रकारच्या व्यक्तींकडून दिवसातील वेगवेगळ्या वेळी व्यायाम करवून घेण्यात आला. या प्रयोगातून वरील निष्कर्ष काढण्यात आले.
अधिक वाचा - Weight loss: हे फळ खाल्ल्याने तुमचे वजन होईल कमी, आजच आहारात समावेश करा हे fruit