Coronil for COVID-19: कोरोनावरील औषध तयार, बाबा रामदेव यांच्या पतंजलीचा दावा

Vaccine for coronavirus: बाबा रामदेवची कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या सीईओ आचार्य बालकृष्णनं कोरोना व्हायरसवरील औषध विकसित केल्याचा दावा केला आहे. पाहा काय म्हणाले आचार्य बालकृष्ण...

Baba Ramdev and Aacharya Balkrishna
कोरोनावरील औषध तयार, पतंजलीच्या सीईओ आचार्य बालकृष्णचा दावा  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दररोज होतेय वाढ, आजच्या आकडेवारीनुसार सलग दुसऱ्या दिवशी ११ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले.
  • कोरोना व्हायरसवरील उपचारांसाठी पतंजलीचा नवा शोध, औषधांची केली निर्मिती, रुग्ण झाले बरे.
  • पतंजलीचे सीईओ आचार्य़ बालकृष्ण यांनी औषध बनविण्याचा केला दावा.

नवी दिल्ली: योगगुरू बाबा रामदेवची (Baba Ramdev) कंपनी पतंजली (Patanjali) आयुर्वेद लिमिटेडचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आचार्य बालकृष्ण यांनी कोरोना व्हायरसवरील औषध तयार केलं असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या कंपनीनं एक आयुर्वेदिक औषध तयार केलंय जे कोरोना व्हायरस (CoronaVirus) संक्रमित रुग्णांना ५ ते १४ दिवसांमध्ये बरं करतं.

न्यूज एजंसी एएनआयच्या रिपोर्टनुसार, बालकृष्ण यांनी शनिवारी म्हटलं की, कोरोना व्हायरस संक्रमित शेकडो रुग्णांवर या औषधांची ट्रायल घेतली गेलीय. या औषधांमुळे १०० टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मात्र अजून आरोग्य मंत्रालयाच्या ICMRनं यासंबंधी कुठलंही वक्तव्य जारी केलेलं नाही.

एएनआयनुसार बालकृष्ण यांनी हरिद्वार इथं बोलतांना सांगितलं की, कोरोना व्हायरसचं संक्रमण सुरू झाल्यानंतर आम्ही संशोधकांची एक टीम नियुक्त केली होती. सर्वात पहिले सिम्युलेशन केलं गेलं आणि जे या व्हायरससोबत लढा देऊ शकतील, अशा रुग्णांची ओळख केली गेली. जे शरीरात व्हायरसचा प्रसार रोखू शकतील. मग आम्ही पॉझिटिव्ह रुग्णांवर क्लिनिकल केस स्टडी केली आणि आम्हाला १०० टक्के योग्य रिझल्ट मिळाले.

आचार्य बालकृष्ण पुढे म्हणाले, आमचं औषध घेतल्यानंतर कोविड रुग्णांना ५-१४ दिवसांमध्ये रिकव्हर झाले आणि नंतर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली. म्हणून आम्ही म्हणू शकतो की, कोविड-१९ वरील उपचार आयुर्वेदाच्या माध्यमातून शक्य आहे. आम्ही फक्त नियंत्रित क्लिनिकल ट्रायल करत आहोत. पुढील ४-५ दिवसांमध्ये याबाबतीतील पुरावे आणि डेटा आम्ही जारी करू.

पतंजलीचे सीईओ बालकृष्ण यांनी पुढे सांगितलं की, लोकांनी योगाचा अभ्यास केला पाहिजे आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार घेत आपलं आरोग्य सुदृढ राखलं पाहिजे.

देशात कोरोना व्हायरस खूप झपाट्यानं पसरतो आहे. आज १५ जूनला आलेल्या आकड्यांनुसार कोरोनाचे एकूण रुग्ण वाढून आता देशातील संख्या ३,३२,४२४ झालीय. ज्यात १,५३,१०६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर १,६९.७९७ रुग्ण बरे झालेले आहेत. तर ९५२० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मागील २४ तासांमध्ये देशात ११५०२ नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत, तर ३२५ रुग्णांचा मृत्यू झालाय. यापूर्वी रविवारी पण एका दिवसात सर्वाधिक ११,९२९ रुग्ण आढळले होते आणि ३११ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी