Skipping Rope Benefits : रोज 1 तास दोरीउड्या मारा आणि मिळवा 7 फायदे, व्यायाम करता करताच मूडही सुधारेल

दोरीउड्या हा जसा शरीरासाठी उपयुक्त व्यायाम आहे, तसाच तो मनासाठीची फायद्याचा आहे. दोरीउड्या मारण्याचा नियमित व्यायाम करणाऱ्यांना अनेक फायदे होतात.

Health Benefits of Rope Skipping
दोरीउड्या मारण्याचे अनेक फायदे  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • दोरीउड्या मारल्यामुळे सुधारतं हृदयाचं आरोग्य
  • पचनक्रिया सुधारल्यामुळे वजन वेगाने होतं कमी
  • मनाच्या अनेक विकारांवरही दोरीउड्या हेच उत्तर

Skipping Rope Benefits | लहान मुलं खेळता खेळताच दोरीउड्या मारायला शिकतात. पण दोरीउड्या हा केवळ पोरखेळ नाही. दोरीउड्यांचे अनेक फायदे आहेत आणि जगात रुढ असणाऱ्या व्यायााच्या अनेक प्रकारांपैकी दोरीउड्या हा अनेक फायदे देणारा व्यायाम असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी दररोज किमान काही वेळ तरी दोरीउड्या मारण्याचा व्यायाम करावा, असा सल्ला दिला जातो. 

अनेक प्रकारचे फायदे

शरीरातील वेगवेगळ्या भागांना चालना देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असतात. त्यामध्ये कार्डिओ, मसल ट्रेनिंग, स्ट्रेचिंग, टोनिंग असे वेगवेगळे व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो. प्रत्येकाने आपल्या व्यायामाच्या शेड्यूलमध्ये या चारही प्रकारच्या व्यायामांचा समावेश होईल, असे व्यायाम प्रकार निवडावेत, असा सल्ला देण्यात येतो. 

दोरीउड्या मारण्याचे फायदे

वजन कमी करण्यासाठी दोरीउड्या

जगातील बहुतांश लोक हे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत असतात. कित्येक प्रयत्न करूनही त्यांना यश येत नाही. अशा लोकांना नियमित दोरीउड्या मारण्याचा सल्ला दिला जातो. दोरीउड्या मारल्यामुळे शरीराची चयापचय संस्था सक्रिय होते आणि पचनाची क्षमता आणि दर्जाही वाढतो. त्यामुळे शरीरातील अधिकाधिक फॅट्स जाळल्या जातात आणि पोटाचा घेर कमी व्हायला सुरुवात होते, असं सांगण्यात येतं. 

हृदयाचं आरोग्यही सुधारतं

दोरीउड्या मारणं हा एक कार्डिओ व्यायाम आहे. उड्या मारताना हृदयाचे ठोके वाढतात आणि धाप लागते. यामुळे हृदयाची क्षमता वाढते आणि शरीराची लवचिकतादेखील. दोरीउड्या मारणाऱ्यांना मजबूत घाम येतो. त्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात आणि त्वचा अधिक चमकदार होते, असा अनुभव आहे. 

मनाचंही आरोग्य सुधारतं

दोरीउड्या मारल्यामुळे शरीराप्रमाणे मनावरही चांगले परिणाम होतात. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी दोरीउड्यांचा उपयोग होतो. सतत चिंताग्रस्त राहणाऱ्या व्यक्तींना दोरीउड्या नियमित मारण्याचा सल्ला दिला जातो. या व्यायामामुळे सतत वाटणारी चिंता कमी होते आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळे विचारांच्या एकाच चक्रातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तींना मदत मिळते, असं सांगितलं जातं. 

दोरीउड्या मारण्याचे हे आहेत सात फायदे

  1. दोरीउड्या हा एक हाय इंटेंसिटी प्रकारातील व्यायाम आहे. हृदयाची क्षमता वाढणे आणि हृदयरोगाचा धोका कमी होण्यासाठी या प्रकाराचा उपयोग होतो. 
  2. दोरीउड्या मारल्यामुळे मेंदूची क्षमता वाढते आणि स्मरणशक्तीही वाढते. एखाद्या गोष्टीवर फोकस करण्याच्या क्षमतेतही दोरीउड्यांमुळे वाढ होते. 
  3. दोरीउड्यांमुळे स्टॅमिना वाढतो. त्यामुळे कुठलंही काम दीर्घकाळ करण्याची क्षमता विकसित होते. 
  4. सतत चिंतातूर असणाऱ्या व्यक्तींना दोरीउड्या मारण्याचा सल्ला दिला जातो.
  5. दोरीउड्या मारण्यामुळे हाडं मजबूत होतात. ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.
  6. दोरीउड्या मारताना प्रचंड घाम येतो. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर पडून त्वचा चमकदार होते. 
  7. वजन कमी करणाऱ्यांसाठी दोरीउड्या हा उत्तम व्यायाम आहे. चयापचय क्रिया सुधारते आणि वेगाने पोटावरील चरबी घटायला सुरुवात होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी