पुणे : कोरोना व्हायरस (Coronavirus)वर प्रभावी लस निर्मितीचं काम जगभरातील विविध देशांत सुरू आहे. भारतातही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India)मध्ये कोरोनावरील लस निर्मितीचे काम सुरू आहे. या लस निर्मिती आणि वितरण तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे २८ नोव्हेंबर रोजी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
कोविड-१९वर प्रभावी लस निर्मितीचे काम ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत औषध निर्माता कंपनी अॅस्ट्राझेंका (Astrazeneca) आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संयुक्तपणे काम करत आहेत. या कोरोनावरील लसीचे नाव कोविशिल्ड (Covishield) असे आहे.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने प्री क्लिनिकल स्क्रिनिंग, चाचणी आणि विश्लेषणासाठी सात कंपन्यांना कोविड-१९ वरील लसीच्या निर्मितीला परवानगी दिली आहे. यापैकी दोन म्हणजे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि जीनोव्हा बायोफार्मास्युटिक्ल्स या आहेत.
जगभरातील १०० देशांचे राजदूत हे ४ डिसेंबर रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी हे सर्व राजदूत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि जीनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडलाही भेट देणार आहेत अशी माहितीही विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
दिवाळीनंतर देशभरातील अनेक राज्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत कोरोना लस कधी उपलब्ध होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.