Cervical Cancer Vaccine : पुणे : सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) सर्वाइकल कॅन्सर (Cervical Cancer ) विरोधी लस तयार केली असून रुग्णांना ती लस देण्यात यावी यासाठी DCGI समितीने शिफारस देखील केली आहे. DCGI च्या विषय तज्ज्ञ समितीने 9 ते 26 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील गर्भाशयाच्या कर्करोगाच्या (Cervical Cancer Vaccine) रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटच्या स्वदेशी विकसित क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (qHPV) लसीची शिफारस केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) द्वारे गर्भाशयाच्या कर्करोगाविरूद्ध प्रथम स्वदेशी लस क्वाड्रिव्हॅलेंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस लसीवर बुधवारी विषय तज्ञ समितीने चर्चा केली.
एका अधिकृत सूत्राने सांगितले की, "कोविड-19 वरील विषय तज्ज्ञ समितीने बुधवारी या लसीच्या वापरावर चर्चा केली. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग विरोधी QHPV लस निर्मितीसाठी तसेच मार्केटिंग मान्यतेसाठी शिफारस करण्यात आली आहे." प्रकाश कुमार सिंग, SII चे संचालक (सरकारी आणि नियामक व्यवहार) यांनी QHPV साठी 8 जून रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) यांच्याशी संपर्क साधला. तसेच याच्या मार्केटिंग मंजुरीसाठी अर्ज केला होता. दरम्यान कंपनीच्या म्हणण्यानुसार, या लसीने बेसलाइनपेक्षा हजार पट जास्त अॅटीबॉडीचा प्रतिसाद दाखवला आहे.
याबाबत असे सांगितले जात आहे की, 2022 च्या अखेरीपूर्वी ही लस (सर्व्हायकल कॅन्सर लस) बाजारात दाखल होण्याची अपेक्षा आहे. HPV ही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध भारतातील पहिली देशी बनावटीची लस असेल. देशात त्याची लवकर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या मदतीने फेज 2/3 क्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्यानंतर बाजार अधिकृततेसाठी अर्ज केला.