Fruits for high Uric Acid | आपल्या शरीरात ज्याप्रमाणे कोलेस्टेरॉल (Cholesterol) असतं त्याचप्रमाणं युरिक ॲसिड (Uric Acid) नावाचा एक घटकही असतो. याचं प्रमाण वाढत गेलं तर त्याचे तब्येतीवर विपरित परिणाम होतात आणि गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. त्यासाठी वेळोवेळी उपाय करून या युरिक ॲसिडची पातळी मर्यादेत ठेवावी लागते. अनेकजण त्यासाठी वेगवेगळी औषधंही घेत असल्याचं दिसतं. मात्र नैसर्गिकरित्या जर ही पातळी नियंत्रणात ठेवायची असेल, तर त्यासाठी काही फळं फारच उपयुक्त ठरतात. विशेषतः पाच फळं अशी आहेत जी बाजारात सहज उपलब्ध असतात, स्वस्त असतात आणि युरिक ॲसिडची शरीरातील पातळी कमी करण्यासाठी गुणकारी ठरतात.
शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी कऱण्यासाठी आंबट, तुरट चवीची फळं अधिक गुणकारी असल्याचं सिद्ध झालं आहे. द्राक्षे, संत्रे, अननस, स्ट्रॉबेरी या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात सी जीवनसत्त्व असतं. या फळांच्या सेवनामुळे शरीरातील युरिक ॲसिड कमी व्हायला मदत होते. मात्र जर तुम्ही ‘कोल्सिसीन’ औषध घेत असाल, तर मात्र द्राक्षं न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे औषधाचा परिणाम होत नाही आणि अपेक्षित गुण येत नसल्यामुळे औषधोपचार घेणाऱ्या काही रुग्णांना विशिष्ट फळं न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र विकार बळावण्यापूर्वी आणि औषधे घेण्याची वेळ येण्यापूर्वीच जर काळजी घेतली आणि आहारात योग्य ते बदल केले, तर युरिक ॲसिडची पातळी कायमच नियंत्रणात राहू शकते. बघुया, त्यासाठी कुठली फळं उपयुक्त ठरतात.
नाशपातीमुळे युरिक ॲसिडची लेवल नियंत्रणात ठेवता येते. या फळाला सुपरफूड असं म्हटलं जातं. नाशपातीत व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. युरिक ॲसिडच्या अतिरेकामुळे शरीरात होणाऱ्या गाऊट फ्लेअर्सना प्रतिबंध करण्याचं काम नाशपातीच्या नियमीत सेवनामुळे होतं.
चेरीमध्ये अँथोसायननीन नावाचा घटक असल्यामुळेच त्याचा रंग जांभळा आणि लालसर असतो, असं NCBI मध्ये प्रकाशित एका संशोधनातून समोर आलं आहे. अँटिऑक्सिडंटचा खजिना असलेलं हे फळ शरीरावरील सूज कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतं.
जर उत्तम आरोग्य राखायचं असेल, तर अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या केळींची मदत घेता येते. सर्व ऋतुंमध्ये शहरांपासून गावापर्यंत प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असणारं हे फळं युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. केळात प्यूरिनचं प्रमाण अत्यल्प असतं. रोज एक केळ खाल्लं तर शरीरातील युरिक ॲसिड कायमस्वरुपी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
एका अभ्यासानुसार, सफरचंदात फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. शरीरातील अनावश्यक युरिक ॲसिड फायबरमध्ये शोषलं जातं आणि रक्तातील ॲसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
अधिक वाचा - पोटाच्या विकारांपासून हृदयविकारावर लाभदायी आहे गवार, जाणून घ्या गवार खाण्याचे फायदे
वास्तविक, या फळांनी आरोग्य सुधारायला मदत होते आणि अनेक फायदेही होतात. मात्र तुम्हाला काही गंभीर आजार असेल, तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घेणं आणि आहाराचं नियोजन करणं गरजेचं आहे.