बंपर ऑफर : कोरोनाची लस घ्या आणि फ्रीमध्ये मिळवा बिअर

तब्येत पाणी
Updated Apr 09, 2021 | 18:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

देशातील विविध भागात सर्वसामान्य नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी यासाठी वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीजवळच्याच गुरूग्राम येथील एका रेस्टॉरंटने एक निराळीच ऑफर दिली आहे.

Show corona vaccine card & get free Beer
कोरोनाची लस घ्या आणि मिळवा मोफत बिअर 

थोडं पण कामाचं

  • विविध भागात सर्वसामान्य नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी यासाठी वेगवेगळ्या ऑफर
  • कोरोनाची लस घ्या आणि मोफत बिअर घेऊन जा.
  • दिल्लीजवळच्याच गुरूग्राम येथील एका रेस्टॉरंटने एक भन्नाट शक्कल

नवी दिल्ली : संपूर्ण जगभर कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. भारतातदेखील दुसऱ्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरतो आहे. त्यामुळे देशभर कोरोना लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. मात्र बरेच नागरिक अजूनही कोरोनाची लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. काही नागरिकांना लस घेण्याची भीती वाटते आहे. लोकांमध्ये कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सर्वसामान्य नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी यासाठी निरनिराळी शक्कलदेखील लढवण्यात येते आहे. अलीकडेच गुजरातमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर सोने आणि छान भेटवस्तू वाटण्यात येत होत्या. आता एका रेस्टॉरंटने एक भन्नाट ऑफर शोधून काढली आहे. 'लस घ्या आणि बिअर मोफत घेऊन जा.' नेमकी ही ऑफर काय आहे ते पाहूया.

लस घ्या आणि मोफत बिअर मिळवा


देशातील विविध भागात सर्वसामान्य नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी यासाठी वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत. गुजरातमध्ये महिलांनी कोरोनाची लस घ्यावी यासाठी त्यांना नोज पिन देण्यात आल्या. आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीजवळच्याच गुरूग्राम येथील एका रेस्टॉरंटने एक भन्नाट शक्कल लढवली आहे. या रेस्टॉरंटची ऑफर आहे, कोरोनाची लस घ्या आणि मोफत बिअर घेऊन जा. या रेस्टॉरंटचे नाव 'इंडियन ग्रिल रुम'असे आहे. इंडियन ग्रिल रुमच्या अनोख्या ऑफरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या रेस्टॉरंटच्या ऑफरनुसार नागरिकांनी लस घेतल्यानंतर आपले कार्ड दाखवायचे आहे आणि मोफत बिअरचा आनंद घ्यायचा आहे. या रेस्टॉरंटने या कॅम्पेनचे नाव 'इंडियन ग्रिल रुम विथ व्हॅक्सिनेशन सेलिब्रट' असे ठेवले आहे. ही ऑफर नागरिकांसाठी पाच एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे आणि यापुढील काही दिवस अशीच सुरू राहणार आहे.

एकापेक्षा एक सरस ऑफर


गुजरातमध्ये देखील कोरोना लस घेण्यासाठी जबरदस्त ऑफर देण्यात येत आहेत. गुजरातच्या राजकोटमध्ये एका संघटनेने कोरोना लस घेण्यासाठी मोफत जेवणाची ऑफर आणली आहे. या संघटनेचे म्हणणे आहे की या ऑफरनुसार सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण नागरिकांना दिले जाणार आहे. इतरही अनेक संघटना अशाच पद्धतीने नवनवीन भन्नाट ऑफर नागरिकांना कोरोना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणत आहेत. 

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे जगभरात चिंतेचे वातावरण झाले आहे. भारतातदेखील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होते आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. सरकारने निर्बंध घालण्याबरोबर लसीकरण मोहिमसुद्धा जोरात राबवण्यास सुरूवात केली आहे.

महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यांमधीलदेखील कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. देशभरात कोरोना लसीकरणाने वेग घेतलेला दिसतो आहे. कोरोना महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा विपरित परिणाम होत असल्यामुळे आगामी काळात मोठ्या लोकसंख्येला कोरोनाची लस उपलब्ध करून देत कोरोनाच्या संसर्गाला आटोक्यात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी