Harms of mouthwash: रोज रोज माउथवॉश करणं बरं नव्हे, बसेल हा भुर्दंड

माउथवॉशचा रोज वापर केल्यामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे तोंडाशी संबंधित अनेक विकार जडण्याची शक्यता तर असतेच, शिवाय त्यामुळे कॅन्सरलाही निमंत्रण मिळू शकतं.

Harms of mouthwash
रोज रोज माउथवॉश करणं बरं नव्हे!  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रोज माउथवॉश करण्याने होतात दुष्परिणाम
  • तोंडाचा कॅन्सर होण्याचीही असते शक्यता
  • नैसर्गिक माउथवॉशचा वापर करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Harms of mouthwash: आजकाल लोक ओरल हायजिनबाबत (Oral Hygiene) प्रचंड जागरुक आहेत. आपल्या तोंडाचं आरोग्य (Health) चांगलं राहावं, यासाठी अनेकजण माउथवॉशचा वापर करत असतात. दातांच्या स्वच्छतेसोबतच पूर्ण तोंडाची सफाई (Mouth Cleaning) करण्यासाठी माउथवॉशचा वापर केला जातो. तोंडाची नीट सफाई केली नाही, तर मुखदुर्गंधींची (Odour) समस्या भेडसावण्याची शक्यता असते. जर दात आणि हिरड्यांचं आरोग्य उत्तम राखायचं असेल, तर माउथवॉश करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र रोज-रोज माउथवॉशचा वापर करणं ही डोकेदुखी ठरण्याचीही शक्यता असते. जाणून घेऊया, जास्त प्रमाणात माउथवॉशचा वापर केल्यामुळं नेमकं काय नुकसान होऊ शकतं.

का करतात माउथवॉश?

तोंडात असणाऱ्या बॅक्टेरियांचा निपटारा करण्यासाठी माउथवॉशचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या प्रकाराच्या आजारांपासून वाचण्यासाठी त्याचा उपयोग होतो. माउथवॉशमुळे तोंडाची दुर्गंधी आणि दात किडण्यासारख्या समस्यांपासून सुटका होत असते. त्यामुळे माउथवॉशचा वापर करण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञांकडून दिला जातो. त्याचप्रमाणे माउथवॉशमुळे फ्रेशनेस येण्यासही मदत होत असते. 

कॅन्सरचा धोका

माउथवॉशच्या अतिवापरामुळे आरोग्य अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॅन्सर होण्याचाही धोका असतो. माउथवॉशमध्ये सिंथेटिक घटक असतात, जे कॅन्सरचं कारण बनू शकतात. तोंडाची सफाई करणारा माउथवॉश हा मान आणि डोक्याच्या कॅन्सरचे कारण बनण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - World Vegan Day: काय असतात वीगन डाएटचे फायदे? आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

तोंड कोरडे पडणे

माउथवॉशमध्ये असणारे घटक तोंडातील बॅक्टेरिया तर दूर करतातच, मात्र हे करताना त्याचा परिणाम तोंडातील त्वचेवर होत असतो. माउथवॉशमुळे तोंड खरबरीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे माउथवॉशचा जास्त उपयोग करणं टाळण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जातो. 

तोंडात जळजळ

कित्येक माउथवॉश तयार करताना अल्कोहोलचा वापर केला जातो. त्यामुळे तोंडात प्रचंड जळजळ होण्याची शक्यता निर्माण होते. माउथवॉशमध्ये वापरण्यात येणाऱ्या काही घटकांमुळे तोंडाती त्वचा जळजळू लागते. तोंडात लाल चट्टे उठण्याचीदेखील शक्यता त्यामुळे निर्माण होते. 

दातांची समस्या

माउथवॉशचा रोज वापर केल्यामुळे दातांचे आरोग्यही बिघडू शकते. माउथवॉशमुळे दातांवर डाग पडू लागतात. दात कमकुवत होतात आणि खरखरीत व्हायला लागतात. त्यामुळे दातांशी संबंधित समस्यांना सुरुवात होते. 

अधिक वाचा - Healthy & Long Life : कमी आजारी पडणाऱ्यांचे रहस्य...तुम्हालाही मिळू शकते दीर्घायुष्य

नैसर्गिक माउथवॉश

बाजारात मिळणाऱ्या नैसर्गिक माउथवॉशमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा माउथवॉश करण्याचा सल्ला देण्यात येतो. आपण घरी कडुलिंब किंवा पुदिन्यापासून नैसर्गिक माउथवॉश तयार करू शकतो. याचा रोजच्या रोज वापर करायलाही हरकत नसते. यात कुठलेही केमिकल्स नसल्यामुळे त्याचा आरोग्यावर काहीही विपरित परिणाम होत नाही. 

डिस्क्लेमर - माउथवॉशमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबतच्या या काही सामान्य टिप्स आणि निरीक्षणं आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी