Bone Health: चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, अपुरी झोप यासारख्या गोष्टींमुळे सर्वसामान्य भारतीयांच्या आरोग्यावर (Health) विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षात दिसून येत आहे. त्यातच वाढते ताणतणाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यसनाधीनतेचा परिणाम प्रत्येकाच्या आरोग्यावर होत असतो. साधारण पन्नाशीच्या उंबरठ्यावर हाडांचे आरोग्य (Health of bones) बिघडायला सुरुवात होते आणि ती कमकुवत होऊ लागतात, असे मानले जायचे. मात्र अलीकडे हे वय कमी झाले असून ऐन तारुण्यातच अनेकांना हाडांशी संबंधित समस्या सुरू होत असल्याचे दिसून आले आहे. हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे, हे त्यामागील प्रमुख कारण मानले जाते. त्याचप्रमाणे दैनंदिन आयुष्यात आपल्याकडून होणाऱ्या अनेक चुकादेखील त्यासाठी कारणीभूत ठरतात. या चुका समजून घेणे आणि त्या टाळणे, हे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.
मद्यपान करणाऱ्या व्यक्तींच्या हाडांची अवस्था इतरांच्या तुलनेत वाईट असते. सातत्याने मद्यपान करणाऱ्या व्यक्तींची हाडे इतरांच्या तुलनेत लवकर कमकुवत आणि ठिसूळ होतात. हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी लवकरात लवकर मद्यपानाची सवय सोडून देणे आवश्यक असल्याचा सल्ला आरोग्य तज्ञांकडून दिला जातो. हाडांबरोबरच अल्कोहोलचा परिणाम फुफ्फुस, किडनी आणि लिव्हरवरही होत असतो. मद्यपान करण्याबरोबरच तंबाखू आणि सिगरेट यामुळेदेखील हाडांचे आरोग्य बिघडते.
अधिक वाचा - Digestive Problem: पोटात गॅसचा त्रास होत असेल तर हे आहेत सोपे उपाय, लगेच मिळेल आराम
अन्नातील प्रमाणापेक्षा अधिक मिठाचे प्रमाण अन्नाची चव तर बिघडवतेच, मात्र हाडांवरही त्याचा विपरीत परिणाम होत असतो. जेवणात मिठाचे प्रमाण जास्त असेल तर हाडांच्या घनतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि हाडे ठिसूळ होण्यास सुरुवात होते. मिठामध्ये असणारा सोडियम हा घटक शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी करतो. त्यामुळे आहारात मिठाचे प्रमाण कमीत कमी ठेवणे आवश्यक आहे.
डेस्क जॉब करणाऱ्या अनेकांचा अनेक दिवस उन्हाशी संबंध येत नाही. सूर्यकिरणे हा विटामिन डी चा उत्तम स्रोत मानला जातो. अशा व्यक्तींची हाडे ठिसूळ होण्याची दाट शक्यता असते. यासाठी शक्य तेवढा वेळ सूर्यप्रकाशात बसणे आणि ते शक्य नसेल तर विटामिन डीसाठी पूरक औषधे घेणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला जातो. रोज किमान 30 मिनिटे उन्हात बसण्याचा सल्ला आरोग्यतज्ञ देतात. त्याचप्रमाणे एकाच जागी तासनतास बसून राहणे हेदेखील आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे दिसून येते.
अधिक वाचा - सर्दी खोकल्यावर पाच प्रभावी उपाय
हाडांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी सकस आहार, पुरेसा व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी टाळणे आणि ताणतणावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे, हादेखील हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठीचा उपाय मानला जातो.
डिस्क्लेमर - हाडांचे आरोग्य उत्तम राखण्याबाबतच्या सामान्यज्ञानावर आधारित अशा या काही टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या अथवा प्रश्न असतील, तर तज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे.