Weight loss साठी उन्हाळ्यातील तीन महिने सर्वोत्तम!

तब्येत पाणी
Updated Apr 13, 2019 | 17:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss: आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं पाणी, उन्हाळा आणि लठ्ठपणा या तिन्हीचा खूप जवळचा संबंध आहे. जे लोक आपलं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतील, त्यांच्यासाठी उन्हाळ्यातील तीन महिने सर्वोत्तम मानले जातात.

weight loss in summer
उन्हाळ्यात असं करा वजन कमी  |  फोटो सौजन्य: YouTube

मुंबई:  एप्रिल महिना सुरू आहे आता उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. उन्हाचा त्रास तसा कुणालाच सहन होत नाही. भारतात आपल्याला सर्व ऋतू समसमान अनुभवायला मिळतात. प्रत्येक ऋतूचा आपल्या शरीरावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो. उन्हाळ्यात उत्तम आरोग्यासाठी आहार कसा असावा हे आयुर्वेद शास्त्रात सांगितलं गेलं आहे. तसंच ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी हा ऋतू म्हणजे पर्वणी आहे. कारण ज्यासाठी लठ्ठ व्यक्ती परिश्रम घेत असतो त्या परिश्रमांना नैसर्गिकपणे यश देण्याचं काम हा उन्हाळा ऋतू करतो. घाम येणारा हा ऋतू असल्यामुळे शरीरातील चरबी घटवण्याचं काम आरामात होऊ शकतं.

लठ्ठपणा वाढविणारा आहार या ऋतूमध्ये टाळणं आयुर्वेद शास्त्र सांगतं. पचनासाठी जड असणारे पदार्थ जसं चणाडाळ, उडीद डाळ, मोड आलेले धान्य, गव्हाचे पदार्थ, नागलीचे पदार्थ, तुपात-तेलात तळलेले मैद्याचे पदार्थ पूर्णत: टाळावे. पोहे आणि पोह्याचे पदार्थ खाणे टाळावे. तसंच विविध प्रकारच्या ‘डेझर्ट’च्या मोहात आपण पडू नये. चाट हा प्रकार या ऋतूत खूप खाल्ला जातो, तो ही खाणं टाळावा. उपवास आणि उपवासाचे पदार्थ पूर्णपणे टाळलेले बरे. खरं तर लठ्ठ व्यक्तींनी उपवास करू नये. एकाच वेळी खूप खाल्ल्यानं शरीराला जडत्व येतं हे कुणीही विसरू नये.

सलाड खाण्यास हा ऋतू योग्य आहे. वाफवलेले आणि सैंधव मीठ टाकलेली कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली हे खाण्यावर जोर द्यावा. थंड पदार्थ खाणे टाळावे कारण त्यानं जठरातील अग्निवर परिणाम होतो. त्यामुळं लठ्ठ लोकांनी उसाचा रस, बर्फ आणि थंड पदार्थ खाणं टाळल्यास बारीक होण्यास मदत होईल. वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात भाजलेले पदार्थ आणि धान्य पदार्थ खूप उपयुक्त ठरतात.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी उन्ह्याळ्यात हे उपाय करावेत

  • उन्हाळ्यातील सर्वात उत्तम पेय म्हणजे पाणी, लिंबाचा रस, आल्याचा रस आणि चवीपुरतं सैधंव मीठ, साखर टाकल्यास चवदार पेय तयार होईल.
  • चरबीतील पाण्याचा उपयोग शरीरातील तहान भागवायला झाला म्हणजे चरबी आपोआप वितळेल. कारण उन्हाळ्यात तहान जास्त लागते. लठ्ठ व्यक्तींनी थोड्या-थोड्यावेळानं पाणी पिणं गरजेचं आहे. पण पाणी गरजेपुरतेच प्यावं त्यानं चरबीचं विलयन होण्यास मदत मिळेल.
  • जेवणानंतर आणि झोपताना कोमट पाणी प्यावं
  • तांब्याच्या भांड्यात अहोरात्र पाणी ठेवून नंतर गरम करून प्यायल्यानं अधिक फायदा होतो.
  • लठ्ठ व्यक्तींनी दुधात पाव पट पाणी टाकून प्यावं. त्यात दालचिनी किंवा इलायची टाकल्यानं अधिक लाभ होतो.
  • तसंच शक्यतोवर तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ खावे. तांदळाच्या पिठाचे घावणे हे शक्ती देणारे आणि तृप्ती देणारे असतात.

उन्हाळा इतर कुणासाठी कसाही ठरो पण लठ्ठ व्यक्तींसाठी उन्हाळ्यातील तीन महिने जाडी कमी करण्यास खूप फायदेशीर आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी