Why humans die around 80: Experts believe they have solved the ageing mystery : एखाद्या व्यक्तीची आठवण आली आणि त्याचवेळी ती व्यक्ती समोर आली अथवा त्या व्यक्तीचा फोन आला तर आपण त्याला शंभर वर्ष आयुष्य आहे, असं म्हणतो. तसं प्रत्येकालाच निरोगी दीर्घायुष्य जगण्याची इच्छा आहे. पण इच्छा असली तरी सगळ्यांनाच दीर्घायुष्य मिळत नाही. काहींचा मृत्यू लवकर नैसर्गिकरित्या अथवा अपघातामुळे वा आजारामुळे होतो तर काही जण आजार असो वा नसो दीर्घायुष्य जगतात. या मागचे रहस्य शोधण्यासाठी तज्ज्ञांनी संशोधन सुरू केले आहे. संशोधनातून दीर्घायुष्याचे रहस्य सापडण्यास सुरुवात झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
कोणताही सजीव म्हणजे पेशींचा समूह आहे. सजीवाच्या शरीरातील पेशी ठराविक कालावधीत त्यांची सर्व ऊर्जा वापरून संपवितात. यानंतर संबंधित पेशीचा मृत्यू होतो. पेशींचा जन्म आणि मृत्यू ही सतत होणारी प्रक्रिया आहे. ज्या पेशींची ऊर्जा लवकर वापरून संपते त्या पेशी लवकर मरतात. पण एखाद्या सजीवाने त्याच्या ऊर्जेचा वापर करण्याची प्रक्रिया संथ केली तर त्याच्या पेशी जगण्याचा कालावधी वाढण्याची.... पर्यायाने त्याच्या आयुष्याची दोरी अधिक काळासाठी बळकट राहण्याची शक्यता जास्त आहे; असे संशोधकांचे म्हणणे आहे.
काही प्राणी विशिष्ट परिस्थिती निर्माण होताच स्वतःची ऊर्जा वापरण्याची प्रक्रिया संथ करतात. काही प्राणी तर सुप्तावस्थेत जातात आणि दीर्घ काळ जगतात. प्राण्यांना हे जमते, माणसाला या पद्धतीने जगणे जमले तर त्याचे दीर्घायुष्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे संशोधकांचे मत आहे.
औषधांनी आजार बरे करून आयुष्य वाढविता येईल. पण वयाच्या विशिष्ट टप्प्यावर यंत्रांची मदत घेऊन दैनंदिन कामं हाताळणे, स्वतःच्या ऊर्जेचा वापर जपून करणे... या पद्धतीने माणूस ८० चा टप्पा पार करून शंभरीकडे कूच करू शकेल. पुढच्या काही पिढ्यांनी हे कौशल्य आत्मसात केले तर त्या पुढील पिढ्या शंभरपेक्षा जास्त वर्षे जगण्यासाठी सक्षम होतील; असा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत.
पेशींच्या ऊर्जेची बचत करणे अथवा पेशींना कृत्रिमरित्या ऊर्जा पूरवून मानवी आयुष्य वाढविणे या दोन पर्यायांवर संशोधक संशोधन करत आहेत. यातील कोणता पर्याय सोपा हे लक्षात आले की दीर्घायुष्य जगण्याचे तंत्र अवगत करणे माणसाला सोपे होईल; असे संशोधकांचे म्हणणे आहे.
संशोधकांचे संशोधन पूर्ण होईपर्यंत शक्य तेवढे निसर्गाशी जुळवून घेऊन निरोगी आणि आनंदी जीवन जगणे माणसाला शक्य आहे. जी माणसं हे आव्हान सहज पेलू शकतील त्यांचे आयुष्य सुखी समृद्ध होईल हे निश्चित.