Tired even after sleep: पुरेशी झोप होऊनही थकवा जात नाही? असू शकते ‘या’ पाच आजारांची वॉर्निंग

अनेकांना रात्रभर नीट झोपूनदेखील दिवसभर थकवा जाणवत असतो. काहीही काम करू नये, एकाच जागी बसून राहावं आणि दिवसभर झोपून राहावं अशी इच्छा होत असते. सातत्याने अशी लक्षणं जाणवत असतील,तर त्याचा अर्थ वेगळाही असू शकतो.

Tired even after sleep
पुरेशी झोप होऊनही थकवा जात नाही?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पुरेशी झोप घेऊनही अनेकदा जाणवतो थकवा
  • असू शकतात गंभीर कारणं
  • अनेक आजारांचं असतं हेच प्राथमिक लक्षण

Tired even after sleep: सकस आहार (Diet) आणि पुरेशी झोप (Sleep) या दोन गोष्टींमुळे आपलं आरोग्य उत्तम राहतं, असं आपण अनेकदा ऐकलेलं असतं. मात्र हे दरवेळी पूर्ण सत्य असेलच, असं नसतं. अनेकदा चांगला आहार घेऊन आणि पुरेशी झोप घेऊनही अनेक विकार जडायला सुरुवात झाल्याचा अनुभव येतो. अनेकांना रात्रभर नीट झोपूनदेखील दिवसभर थकवा (tiredness) जाणवत असतो. काहीही काम करू नये, एकाच जागी बसून राहावं आणि दिवसभर झोपून राहावं अशी इच्छा होत असते. सातत्याने अशी लक्षणं जाणवत असतील,तर त्याचा अर्थ वेगळाही असू शकतो. आपल्या शरीरात काही गंभीर आजार असण्याचं हे लक्षण असू शकतं.

मधुमेह

थकवा येणं हे मधुमेहाचं एक सामान्य लक्षण आहे. जर सातत्याने तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर तुम्हाला तातडीने रक्ताची चाचणी करून शरीरातील साखरेची पातळी तपासून घेण्याची गरज आहे. डायबेटिस हा एक गंभीर आजार आहे. एका मर्यादेच्या पलिकडे रक्तातील साखरेची पातळी गेल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणं अशक्य होऊन बसतं. त्यामुळे रक्तातीत साखरेवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज असते. 

ॲनिमिया

रक्तातील लोहाचं प्रमाण कमी झाल्यामुळेदेखील थकवा जाणवू शकतो. रक्तातील लोह हा असा घटक असतो जो फुफ्फुसातून ऑक्सिजन शोषून घेण्याचं काम करत असतो. त्याचं रक्तातील प्रमाण कमी झालं,तर ऑक्सिजनच्या अभावामुळे थकवा जाणवण्याची शक्यता असते. ज्यांच्या शरीरात लोहाचं प्रमाण कमी आहे, त्यांना थकवा, चक्कर येणे, ब्रेन फॉग, हृदय अचानक धडधडणे यासारखे त्रास होताना दिसतात. 

अधिक वाचा - Symptoms of depression: छोट्या छोट्या गोष्टींवर रडू येतं? असू शकतं डिप्रेशनचं लक्षण

थायरॉइडची समस्या

थायरॉइड ही एक छोटीशी, फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते. आपल्या गळ्यापाशी असणाऱ्या ग्रंथीचं संतुलन बिघडलं, तरी त्याचे आरोग्यावर अनेक विपरित परिणाम होत असतात. आपल्या ऊर्जेचा उपयोग आपण कसा आणि कितपत करतो, हे या ग्रंथीवर अवलंबून असतं. ज्या व्यक्तीचे थायरॉइड कमी सक्रीय असतात, त्या व्यक्ती थकल्यासारख्या वाटतात. त्यांना सतत जडपणा, कंटाळा, थकवा जाणवत असतो. 

डिप्रेशन

डिप्रेशनमुळेही अनेकांना थकल्यासारखं वाटत असतं. या काळात एक प्रकारची निरर्थकता आणि निराशा दाटून येते. मेंदूमध्ये आपल्याला चांगलं वाटण्यासाठी कारणीभूत ठरणारी रसायनं वाहण्यात अडथळे निर्माण होत असतात. त्यामुळे सतत उदास आणि थकल्यासारखं वाटू शकतं. त्याचप्रमाणे या काळात निद्रानाशाची समस्या जडण्याचीही शक्यता असते. 

अधिक वाचा - How to increase heart pumping: हार्ट पंपिंग वाढवण्याचे 4 सोपे उपाय, रक्ताचा सुरु होईल मुक्त संचार

हृदयरोग

कमालीचा थकवा हा हृदयाचं कार्य बिघडल्याचं लक्षण असू शकतं. आपल्या शरीराला जितकी आवश्यकता आहे, तितकं रक्त शरीराकडून पंप केलं जात नाही. त्यामुळे थकवा जाणवण्याची शक्यता असते. अशा अवस्थेत व्यायाम केल्याने फ्रेश वाटण्याऐवजी अधिकच थकवा जाणवतो. हातापायांना सूज येणं आणि श्वास घेण्यास अडथळे येणं, ही लक्षणंही जाणवू शकतात. 

डिस्क्लेमर - ही सर्व सामान्य निरीक्षणं आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी