world arthritis day 2020 : अर्थ्रोप्लास्टी: आयुष्याचा दर्जा पूर्ववत करण्याच्या दिशेने एक पाऊल

world arthritis day 2020 : संधिवाताबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आर्थरायटिस अँड -हुमॅटिझम इंटरनॅशनलने (एआरआय) १९९६ मध्ये १२ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक संधिवात दिन’ म्हणून आयोजित केला. 

world arthritis day 2020  arthroplasty
अर्थ्रोप्लास्टी: आयुष्याचा दर्जा पूर्ववत करण्याच्या दिशेने एक पाऊल  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • संधिवाताबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आर्थरायटिस अँड -हुमॅटिझम इंटरनॅशनलने (एआरआय) १९९६ मध्ये १२ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक संधिवात दिन’ म्हणून आयोजित केला. 
  • अर्थ्रोप्लास्टीला सामान्यपणे सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणून ओळखले जाते.
  • या शस्त्रक्रियात्मक उपचारांबद्दल उत्तम सल्ला केवळ तज्ज्ञच देऊ शकतो.

मुंबई:  संधिवाताबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आर्थरायटिस अँड -हुमॅटिझम इंटरनॅशनलने (एआरआय) १९९६ मध्ये १२ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक संधिवात दिन’ म्हणून आयोजित केला. हे करणे खूप गरजेचे होते, कारण संधिवाताकडे बहुतेकदा दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळे रुग्णाच्या हालचालींवर परिणाम होतो, तीव्र वेदना तर होतातच. ही अवस्था हाताळण्याच्या सर्वोत्तम उपायांपैकी एक म्हणजे अर्थ्रोप्लास्टी होय. अर्थ्रोप्लास्टीला सामान्यपणे सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणून ओळखले जाते. मात्र, या शस्त्रक्रियात्मक उपचारांबद्दल उत्तम सल्ला केवळ तज्ज्ञच देऊ शकतो.

संधिवात म्हणजे एक किंवा अनेक सांध्यांमध्ये होणारा दाह, यामुळे वेदना होतात, ताठरपणा येतो आणि ही अवस्था वयोपरत्वे अधिक वाईट होत जाते. तर, संधिवाताचे सर्वाधिक आढळणारे प्रकार म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस आणि -हुमॅटॉइड आर्थरायटिस. आपल्या हाडाच्या अखेरच्या टोकांना गादीप्रमाणे सुरक्षा देणारा संरक्षक कुर्चा (कार्टिलेज) कालांतराने फाटतो तेव्हा ऑस्टिओआर्थरायटिस होतो. ऑस्टियोआर्थरायटिसमुळे रुग्णाच्या सांध्यांना हानी पोहोचते पण हा विकार सहसा गुडघे, नितंब, पाठीचा कणा व हाताच्या सांध्यांवरच परिणाम करतो.

भारतातील ऑस्टिओआर्थरायटिसबद्दल बोलायचे तर उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२५ पर्यंत भारत या जुनाट आजाराची जागतिक राजधानी होईल अशी शक्यता आहे. २०२५ पर्यंत भारतातील ऑस्टिओआर्थरायटिसच्या रुग्णांची संख्या ६० दशलक्ष होण्याची शक्यता आहे. भारतात ७० वर्षांहून अधिक वयोगटातील २८.१ टक्के पुरुष व ३१.६ टक्के स्त्रिया ऑस्टिओआर्थरायटिसने ग्रस्त आहेत.

ऑस्टिओआर्थरायटिसच्या लक्षणांमध्ये वेदना, ताठरपणा, लवचिकता कमी होणे, सूज, सांध्यांतून करकर असा वाज होणे, प्रभावित सांध्यांभोवती गाठीसारखे वाटणारे हाडांचे अतिरिक्त तुकडे तयार होणे आदींचा समावेश होतो. यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यास अजिबात विलंब न करता त्वरित डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे. याशिवाय, स्थूलतेच्या विकाराने ग्रासलेल्यांना ऑस्टिओआर्थरायटिसचा धोका अधिक असतो, कारण अतिरिक्त वजनामुळे सांध्यांवरील ताण व दाब दोन्ही वाढते. वयस्कर लोकांनाही ऑस्टिओआर्थरायटिस होण्याची शक्यता अधिक असते. ज्या लोकांना व्यवसायामुळे अधिक वेळ गुडघ्यावर बसावे लागते, उकिडवे बसावे लागते किंवा जड वजन उचलावे लागते त्यांनाही ऑस्टिओआर्थरायटिस होण्याचा धोका अधिक असतो.

ऑस्टिओआर्थरायटिस या विकारामुळे दैनंदिन कामे अवघड होऊन बसतात. आयुष्याचा दर्जा पूर्वपदावर आणण्यासाठी रुग्णांनी अँथ्रोप्लास्टी शस्त्रक्रियेचा (सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया) एक पर्याय म्हणून विचार केला पाहिजे. अर्थ्रोप्लास्टी ही सांध्यांचे कार्य पुन्हा सुरू करून देणारी एक शस्त्रक्रियात्मक प्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया करवून घेणा-या रुग्णाची सांधेदुखी कमी होते, हालचालीत सुधारणा होते आणि एकंदर आयुष्याचा दर्जा सुधारतो

डॉक्टरांच्या मते, रुग्ण सामान्यपणे भीती व चिंतेमुळे ही शस्त्रक्रिया टाळतात. अँथ्रोप्लास्टी करवून घेण्यास उशीर झाल्यास केवळ सांध्यांचीच भरून न येण्याजोगी हानी होत नाही, तर त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील गुंतागुंतीही वाढतात. अँथ्रोप्लास्टी सुरुवातीच्या टप्प्यांत करवून घेतल्यास रुग्णांना त्यातून लवकर बाहेर येण्यास तसेच आयुष्याचा दर्जा पूर्वपदावर आणण्यास मदत होते. आज अँथ्रोप्लास्टी ही संधिवाताशी निगडित आजारांवर मात करण्यासाठी सर्वांत यशस्वी व किफायतशीर प्रक्रिया समजली जाते. वेदनांपासून मुक्ती, कामे पुन्हा सुरू होणे व आयुष्याचा दर्जा सुधारणे या निकषांवर विलक्षण सुधारणा झाल्याचा रुग्णांचा अनुभव आहे. जगभरातील लक्षावधी रुग्णांना अँथ्रोप्लास्टीचा लाभ झाला आहे.

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणा व्यक्तीला संधिवाताची वर दिलेली लक्षणे जाणवत असतील, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी