Dental Health: ‘या’ पाच वस्तू असतात दातांच्या शत्रू, डाएटमधून आजच करा हकालपट्टी

आपल्या रोजच्या आहारात आपण खात असलेल्या पदार्थांचाही दातांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. काही पदार्थ आपल्या दातांवर विपरित परिणाम करत असतात. अशा वस्तू ओळखणे आणि त्या आपल्या आहारातून काढून टाकण्याची आवश्यकता असते.

Dental Health
‘या’ पाच वस्तू असतात दातांच्या शत्रू  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दातांसाठी काही पदार्थ ठरतात घातक
  • ब्रेडमुळे होते दातांचे नुकसान
  • अल्कोहोल आणि कार्बोनेेटेड ड्रिंकमुळे दात किडण्याची शक्यता

Dental Health: दातांच्या साफसफाईसाठी (Cleaning of teeth) दिवसातून दोनदा ब्रश करण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा दातांवर किटाणूंचा (Bacteria) थर जमायला सुरुवात होते आणि दातांचं आरोग्य बिघडू लागतं. दातांत फटी (Cavity) पडायलाही त्यामुळे सुरुवात होते. दातांबरोबर हिरड्या आणि तोंडातील त्वचेचं आरोग्यही बिघडू लागतं आणि दातांशी संबंधित अनेक समस्या जडायला सुरुवात होते. दातांच्या सफाईसोबत ते मजबूत असणंही आवश्यक असतं. आपल्या रोजच्या आहारात आपण खात असलेल्या पदार्थांचाही दातांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. काही पदार्थ आपल्या दातांवर विपरित परिणाम करत असतात. अशा वस्तू ओळखणे आणि त्या आपल्या आहारातून काढून टाकण्याची आवश्यकता असते. जाणून घेऊया, असेच काही पदार्थ.

१. आंबट गोळ्या आणि चॉकलेट्स

सर्व प्रकारच्या गोळ्या, कँडिज आणि चॉकलेट्स ही आरोग्यासाठी हानीकारकच असतात. मात्र चवीला आंबट असणाऱ्या कँडिजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड असण्याची शक्यता अधिक असते. त्याचा आपल्या दातांवर विपरित परिणाम अधिक वेगाने होत असतो. काही लोक या गोळ्या चावून आणि फोडून खातात. त्यामुळे त्या दातांना चिकटून बसतात आणि दात किडण्याची शक्यता बळावते. या गोळ्या शक्यतो न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र जरी कधी या गोळ्या खाल्ल्या, तरी त्यानंतर लगेच दातांची साफसफाई करणं आवश्यक आहे. 

अधिक वाचा - Obesity : वर्क फ्रॉम होममुळे वजन वाढू लागलं, मग या सोप्या टिप्ससह मिळवा Flat Tummy

२. ब्रेड

जेव्हा तुम्ही बाजारात ब्रेड खरेदी करण्यासाठी जाल, तेव्हा त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करा. ब्रेडमध्ये असणाऱ्या स्टार्चचा संबंध जेव्हा आपल्या लाळेशी येतो, तेव्हा त्यातून साखरेची निर्मिती होते. ब्रेड जेव्हा चावून चावून मऊ होतो, तेव्हा तो आपल्या दातांतील फटींमध्ये अडकून बसतो. त्यामुळे दात किडण्याची आणि दातात फटी तयार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ब्रेडऐवजी धान्यापासून तयार करण्यात येणारी चपाती किंवा भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. 

३. अल्कोहोल

दारु पिणं हे आरोग्यासाठी वाईट आहे, हे प्रत्येकालाच माहित असतं. दारु पिल्यानंतर आपलं तोंड कोरडं पडतं, याचा अनुभवही अनेकांनी घेतलेला असतो. ड्राय माउथमध्ये लाळीचं प्रमाण कमी असतं. आपल्या दातांचं आरोग्य नीट राखण्यात तोंडात असणाऱ्या लाळेचा मोठा वाटा असतो. अन्नघटक दातांना चिकटून राहू नयेत, यासाठी लाळ मोठं काम करत असते. दातांना चिकटलेले पदार्थ एक प्रकारे धुण्याचं काम लाळेमार्फत केलं जातं. दात सडणे, हिरड्यांशी संबंधित आजार आणि ओरल इन्फेक्शन यासारख्या आजारांची प्राथमिक लक्षणं दिसताच, लाळेचं काम सुरू होतं आणि ते आजार परतवून लावले जातात. त्यामुळे मद्यपानाच्या सवयीपासून दूर राहणंच उत्तम. 

अधिक वाचा - Heart rate of athlete: सामान्यांपेक्षा ॲथलिट्सचा हार्ट रेट असतो कमी, जाणून घ्या कारण

४. कार्बोनेटेड ड्रिंक्स

कार्बोनेटेड ड्रिंक टाळण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. या पेयांमध्ये सोडिअमचं प्रमाण अधिक असतं. सोडियम दातांसाठी हानीकारक घटक मानला जातो. जेव्हा जेव्हा हे पदार्थ आपण पितो, तेव्हा तेव्हा दातांना सोडियमची अक्षरशः अंघोळ घातली जाते. हा पदार्थ कधी प्यावा लागला, तरी तातडीने ब्रश करणे आणि तोंडाची सफाई करणे आवश्यक आहे. 

आईस्क्रीम

आईस्क्रीम जवळपास सर्वांनाच आवडतं. मात्र त्याचे दोन प्रकारचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यातील गोडव्यामुळे दात किडण्याची शक्यता असते, तर त्याच्या थंडपणामुळे दातांची सेन्सेटिव्हिटी वाढण्याची शक्यता असते. 

डिस्क्लेमर - सामान्यज्ञानावर आधारित या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत गंभीर समस्या असतील. तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी