मुंबईः दिवाळीचा फराळ म्हणजे तळलेले पदार्थ आणि साखरेचे पदार्थ यांची रेलचेल. जिभेचे चोचले पुरवणारे हे पदार्थ बैठी कामं करणाऱ्यांचे वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. पण या समस्येवर एक चविष्ट आणि हेल्दी पर्याय आहे. हा आरोग्यदायी पर्याय अंमलात आणला तर दिवाळी फराळ खाल्ल्याचा आनंद लुटता येईल तसेच फिटनेसची चिंताही करावी लागणार नाही. हा पर्याय म्हणजे कुरमुऱ्याची भडंग अथवा भडंग (Bhadang). कोणी या पदार्थाला कुरमुरा भडंग म्हणतं, तर कोणी मुरमुरा भडंग म्हणतं. काही जण कुरमुरा चिवडा अथवा मुरमुरा चिवडा या नावानेही या पदार्थाला ओळखतात. लाह्यांचा चिवडा अथवा लाह्यांची भडंग या नावांनीही हा पदार्थ ओळखला जातो. (How to make Diwali special recipe Bhadang at home Video)
यंदा कोरोना संकटात कोविड प्रोटोकॉलचे पालन करत दीपावली साजरी केली जात आहे. या वर्षी गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी वसुबारस पासून दीपावलीची सुरुवात झाली. उद्या म्हणजेच १४ नोव्हेंबरच्या शनिवारी लक्ष्मीपूजन होणार आहे. हा मंगलप्रसंग साजरा करताना फिटनेसची काळजी करणाऱ्यांसाठी भडंग हा पर्याय उपलब्ध असेल तर त्यांच्याही फराळाची छान सोय होईल.
भडंग या पदार्थाची चव जिभेचे समाधान करते आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मोलाची मदत करते. लक्षात ठेवा मर्यादीत प्रमाणात खाल्लेले कुरमुरे वजन वाढवत नाही पण शरीराला ऊर्जा पुरवतात. कुरमुरे पचायला अतिशय हलके असतात. कुरमुऱ्यात फायबर असते. पोटाचे विकार असल्यास आराम पडावा म्हणून जेवणाच्या वेळी इतर कोणताही पदार्थ खाण्याऐवजी कुरमुरे खाणे लाभदायी ठरू शकते. कुरमुरे हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शिअम, आयर्न (लोह) आणि पोटॅशिअम पुरवतात. रक्तदाब, हृदयविकार अशा त्रासांनी त्रस्त असल्यास हमखास कुरमुरे खावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि वजन नियंत्रणात ठेवणारे कुरमुरे अतिशय लाभदायी आहेत. याच कारणामुळे मर्यादीत प्रमाणात कुरमुरे खाणे आरोग्याच्या हिताचे आहे.
नव्या पिढीतील अनेकांना त्यांच्या धावपळीच्या जीवनामुळे दीपावलीचा फराळ करणे जमत नाही, ही मंडळी रेडीमेड फराळ आणून घरी पदार्थ खाण्याचा आनंद लुटतात. पण ज्यांना हौसेने एखादा पदार्थ करुन बघायचा आहे अशांनी हेल्दी आणि चविष्ट असलेली कुरमुऱ्याची भडंग जरुर करुन बघावी. पहिल्यांदाच कुरमुऱ्याची भडंग करत असलेल्या हौशी मंडळींच्या सोयीसाठी 'टाइम्स नाऊ मराठी' (timesnowmarathi.com) आज चविष्ट तसेच हेल्दी असलेल्या कुरमुऱ्याच्या भडंगची रेसिपी सांगणार आहे.
दोन चमचे तेल, एक चमचा हिंग, अर्धा चमचा हळदीची पूड किंवा हळद, १५ कढीपत्त्याची पाने, चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक वाटी डाळं, पाव वाटी शेंगदाणे, आवडीनुसार थोडे काजू, २०० ग्रॅम कुरमुरे, चवीनुसार मीठ
महत्त्वाचे - कुरमुऱ्याची भडंग ही दिवाळीत फराळ म्हणून तसेच एरवी संध्याकाळी नाश्ता म्हणून खाण्यास एक उत्तम आणि चविष्ट पदार्थ आहे.