Corona Vaccine: ...तर कोविड लसीचा पहिला डोस मी घेईन: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

तब्येत पाणी
Updated Sep 13, 2020 | 22:32 IST

Covid19 Vaccine: कोरोनावर लस निर्मितीचे काम जगभरातील विविध देशांत सुरू आहे. ही लस कधी उपलब्ध होणार या बाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे. 

थोडं पण कामाचं

  • पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कोविड-१९ वर लस येईल अशी अपेक्षा आहे : डॉ. हर्षवर्धन 
  • वर्ष २०२१च्या पहिल्या तिमाहीत कोरोनावरील लस उपलब्ध होऊ शकते : डॉ. हर्षवर्धन 
  • खर्चाचा विचार न करता आवश्यक असलेल्यांना प्रथम लस देणार : डॉ. हर्षवर्धन 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग भारतातही मोठ्या प्रमाणात आहे. या कोरोनावर लस (Corona Vaccine) विकसित करण्याचे संशोधक, शास्त्रज्ञ, डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. यापैकी काही लसींची चाचणी तर अंतिम टप्प्यात आहे. कोरोनावरील लस भारतात पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२१च्या सुरूवातीला उपलब्ध होऊ शकते अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन (corona vaccine may be ready by the first quarter of 2021 said Dr Harsh Vardhan) यांनी दिली आहे.

खर्चाचा विचार न करता लस उपलब्ध करुन देणार 

डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोनावरील लस कधी उपलब्ध होईल याची तारीख निश्चित नाहीये पण ही लस २०२१च्या सुरुवातीला उपलब्ध होऊ शकते. खर्चाचा विचार न करता आवश्यक असलेल्या रुग्णांना लस प्रथम उपलब्ध करुन देण्यात येईल.

लसीची सुरक्षा, खर्च, उत्पादनावर चर्चा सुरू

कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यावर ती अधिकाधिक रुग्णांपर्यंत कशी पोहोचवता येईल. तसेच लसीची सुरक्षा, खर्च, उत्पादन या संदर्भात चर्चा सुरू आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी 'संडे संवाद' या कार्यक्रमात दिली आहे.

...तर लसीचा पहिला डोस घेईन

लस उपलब्ध झाल्यावर लसीचा डोस देताना सुरक्षिततेविषयी असलेली भीती दूर करत आरोग्यमंत्री म्हणाले, कोविड लसीच्या चाचणी दरम्यान योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. जर कुणाला लसीवर विश्वास नसेल तर या लसीचा पहिला डोस मी घेईन.

कोरोनावरील लसीच्या चाचणी संदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, जैव तंत्रज्ञान विभाग आणि आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद हे लसीच्या चाचणीला पाठिंबा देण्यासाठी सक्रीयपणे कार्यरत आहेत. भारतात विविध प्रयोगशाळांमध्ये लसींच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर चाचण्या सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी