Vat Savitri Vrat Banyan Tree Puja ans Importance: जसं उत्तरेत करवा चौथ साजरा केला जातो. त्याच प्रमाणे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील काही भागात वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास आणि पुजा करतात. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमवास्येच्या तिथीला वटसावित्रीचा सण साजरा केला जातो. यंदा ३० मे २०२२ रोजी वटपौर्णिमा साजरी होत आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू, लक्ष्मी माता आणि वडाच्या झाडाचीही पुजा केली जाते. वडाच्या झाडाला दोरा बांधून महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. पण या दिवशी वडाच्या झाडाचीच पुजा का होते? जाणून घेऊया यामागील धार्मिक कारण
हिंदू धर्मात पशू पक्ष्यांसह झाडांनाही विशेष महत्त्व दिले आहे. पिंपळ, तुळशी आणि केळीच्या झाडांना पवित्र मानले गेले आहे आणि या झाडांची पुजा केली जाते. या झाडांमध्ये देवांचा वास असतो असेही सांगितले जाते. या झाडांमध्ये वडाच्या झाडाचाही समावेश आहे. वटपौर्णिमेत वडाच्या झाडाला जास्त महत्त्व आहे. सर्व सुवासिनी वडाच्या झाडाजवळ येऊन वटसावित्रीची पुजा करतात आणि कथा ऐकतात.
शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार वडाच्या झाडांच्या मुळांमध्ये ब्रम्हा, झाडामध्ये विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शिवाचा वास असतो. म्हणून हे झाड त्रिमुर्तीचे प्रतीक मानले जाते. तसेच वडाचे झाड हे मोठे दीर्घायुषी असते. आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठीच वटपौर्णिमेचे व्रत केले जाते.
भगवान शंकर वडाच्या झाडाखालीच तपस्या करायचे असे सांगितले जाते. वडाच्या झाडावरीक पानांवरच श्रीकृष्णाने मार्कण्डेय ऋषींना दर्शन दिले होते. वट सावित्रीच्या कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येच्या तिथीला सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी महिला व्रत करतात आणि वटवृक्षाची पुजा करतात.
(डिस्क्लेमर: सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही)