Sharad Purnima 2021 Date कोजागिरी पौर्णिमा : जाणून घ्या आज मसाला दूध का पितात? काय आहे कृषी संस्कृती कोजागरीचं महत्त्व

वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात.

Kojagari Pournima Find out why you drink masala milk today
कोजागिरी पौर्णिमा : जाणून घ्या आज मसाला दूध का पितात?   |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • कोजागिरी पोर्णिमेला काही ठिकाणी नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात.
  • शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते.
  • कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीचे पूजन करून जागरण केल्यास लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात.

नवी दिल्ली :  वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. तसेच या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागरी पौर्णिमा असेही संबोधले जाते. तर काही ठिकाणी याला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागिरी पोर्णिमेचं महत्त्व, मान्यता, परंपरा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊया...

मसाला दूध पिण्याचे कारण 

आज १९ ऑक्टोबर रोजी निज अश्विन पौर्णिमा आहे. कोजागरीला लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून 'कोजागर्ती'? असा प्रश्न विचारते, असे मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी असे म्हणतात. मसाला दूध पिण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागिरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते.  दमा किंवा अस्थमा यांसारख्या आजारांवरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते.

​कृषी संस्कृतीमध्ये काय आहे महत्त्व

कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. या दिवशी धान्याची पूजा केली जाते. काही मान्यतांनुसार अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्र मंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाली, असे सांगितले जाते.

आज लक्ष्मीदेवीला काय देणार नैवेद्य

भारतातील बहुतांश ठिकाणी शरद पौर्णिमेला लक्ष्मी नारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी देवी नारायणांसह गरुडावर आरुढ होऊन पृथ्वीतलावर येते. लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवता स्वर्गातून पृथ्वी येतात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.

कोजागरीला लक्ष्मी पूजनाचे महत्व

कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीचे पूजन करून जागरण केल्यास लक्ष्मीदेवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. जी माणसे जागरण करत नाहीत, त्यांच्या दारावरून लक्ष्मी देवी परत जाते. कोजागरीला केलेले लक्ष्मी पूजन विशेष मानले जाते. यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते. लक्ष्मी देवीच्या आशिर्वादामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णूसहस्रनाम आदींचे पठण करणे शुभ मानले जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी