Laxmi puja Muhurat: जाणून घ्या लक्ष्मी पूजन विधी आणि अत्यंत शुभ मुहूर्त कोणता ते 

Laxmi Puja Muhurat 2020: दिवाळीतील महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे लक्ष्मीपूजन. यादिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. पण पूजन नेमकं कोणत्या वेळी केलं गेलं पाहिजे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

laxmi poojan
लक्ष्मी पूजन विधी आणि अत्यंत शुभ मुहूर्त कोणता?  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: दिवाळीमधील (Diwali) सर्वात महत्त्वाचा सण किंवा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. (Laxmi Puja) लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. यंदा १४ नोव्हेंबर (शनिवार) लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी धन,लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते. तसेच धनदेवता कुबेराची देखील आराधना केली जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. यावेळी ते विशेष चोपडी पूजन देखील करतात. 

लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी हे आपली चोपडी पूजन करुन आपल्या व्यवसायाच्या नव्या वर्षाची सुरुवात करतात. त्यासाठी ते नव्या वहीची (चोपडी) विधीवत पूजा करतात. यालाच चोपडी पूजन असं म्हटलं जातं. यावेळी घरोघरी लक्ष्मीचं देखील पूजन केलं जातं. घरातील पैसे, सोने-नाणे हे देवीच्या फोटोसमोर मांडून त्याची पूजा केली जाते. मात्र, या पुजेसाठी विशिष्ट असा मुहूर्त (Muhurat) असतो. जाणून घ्या यंदा लक्ष्मी पूजेचा नेमका विधी आणि मुहूर्त आहे.  

पाहा लक्ष्मी पूजनचा शुभ मुहूर्त काय आहे: 

दर्श अमावस्या, महालक्ष्मी कुबेरपूजन 

आश्विन कृष्णपक्ष, शनिवार दि. १४ नोव्हेंबर २०२० दुपारी २.१८ पर्यंत चतुर्दशीनंतर अमावस्या आहे. 

यावेळी महाकालीपूजन, महालक्ष्मी पूजन, महासरस्वती पूजन, कुबेर पूजन आणि गादीपूजन केले जाते. 

शुभमुहूर्त: 

  1. प्रदोष काळ: सायंकाळी ५.१४ वाजेपासून ८.३२ वाजेपर्यंत
  2. लाभ योग: सायंकाळी ६.३२ वाजेपासून ८.०२ वाजेपर्यंत
  3. शुभ योग: रात्री ९.३२ वाजेपासून ११.०२ वाजेपर्यंत
  4. अमृत योग: रात्री ११.०२ वाजेपासून १२.३२ वाजेपर्यंत

लक्ष्मीपूजन नेमकं कसं करावं: 

लक्ष्मीपूजन ज्याठिकाणी करावयाचे आहे तिथे पूजेच्या स्थानी नवग्रह यंत्र ठेवा. त्यावर सोन्याचं किंवा चांदीचं नाणे ठेवा. हे उपलब्ध नसल्यास आपण काही नाणी किंवा पैसे देखील ठेऊ शकता. त्यानंतर गणपती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती तबकात घेऊन त्याला दूध, दही आणि गंगाजल याने स्नान घालावं. त्यानंतर या दोन्ही मूर्ती स्वच्छ धुवून-पुसून मुख्य स्थानी विराजमान कराव्यात तसेच त्या फुलांनी देखील सजवाव्यात. त्यानंतर मूर्तीच्या उजव्या बाजूला तुपाचा किंवा तेलाचा पंचमुखी दिवा लावून पूजा संपन्न करावी. 

चोपडी पूजनाचा विधी: 

चोपडी पूजन हे नेहमी शुभ मुहूर्तावर केलं गेलं पाहिजे. पूजा सुरु करण्याआधी वहीवर स्वस्तिक आणि श्री गणेशाय नम: असं लिहावं. यासोबतच एक नवी कापडी पिशवी घेऊन त्यात पाच हळकुंड, अक्षता, दुर्गा, धणे आणि दक्षिणा ठेवावी. त्या पिशवीवर देखील स्वस्तिकाचं चिन्ह काढून सरस्वती आईचं स्मरण करावं. त्यानंतर सरस्वती आणि लक्ष्मी मातेचं ध्यान करुन वहीवर गंध, पुष्प अर्पण करावं. त्यानंतर धूप, दिवा याने पूजन करावं. त्यानंतर नैवेद्य दाखविण्यात यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी