Raksha Bandhan 2019: जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

धर्म-कर्म-भविष्य
Updated Aug 13, 2019 | 23:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही तासांवर आला आहे. भारतामध्ये रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधनाचा हा सण १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. पाहा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

Raksha Bandhan
रक्षाबंधन 

Rakshabandhan 2019: रक्षा बंधनाचा सण हा भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी रक्षाबंधन १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यादिनी साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाला राखी असंही संबोधलं जातं. हा सण भाऊ-बहिणीतील प्रेमाचं प्रतीक असल्याचं म्हटलं जातं. रक्षाबंधनाचा शाब्दिक अर्थ आहे 'सुरक्षेचं बंधन'. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यात येणाऱ्या अडचणीत मदत करण्याचा तसेच सुरक्षा देण्याचं आश्वासन देतो.

रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला एखादं छान गिफ्ट देतो. तर बहिण-भाऊ एकमेकांना मिठाई भरवतात. मात्र, बदलत्या काळानुसार आता रक्षाबंधनाचं स्वरूपही बदलत चालल्याचं दिसत आहे. पूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी केवळ भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट देत असे मात्र आता बहिण सुद्धा आपल्या भावाला एखादं गिफ्ट देतात. 

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

हिंदू धर्मात कुठल्याही सणात शुभ मुहूर्ताला एक खास महत्व असतं. इतर सणांप्रमाणेच रक्षाबंधनाचाही शुभ मुहूर्त आहे आणि याच शुभ मुहूर्ताला बहिण आपल्या भावाला राखी बांधते. यंदा रक्षाबंधन १५ ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी गुरुवार आहे. रक्षाबंधनासाठी गुरुवारी सकाळी ५.४९ मिनिटांपासून संध्याकाळी ६.०१ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे त्यामुळे या काळात बहिण आपल्या भावाला राखी बांधून शकते.

आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यापूर्वी एका थाळीत (ताटात) राखी, कुंकु, हळद, दिवा घ्या. हे ताट चांगल्याप्रकारे सजवा. त्यानंतर भावाला ओवाळून त्याच्या माथ्याला टिका लावा आणि राखी बांधा. मग आपल्या लाडक्या भावाला मिठाई द्या.

१४ नाही तर १५ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन

पंचांगानुसार श्रावण पोर्णिमेची सुरूवात १४ तारखेला दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी होत आहे. मात्र, १४ तारखेला चतुर्दशी तिथीमध्ये सूर्योदय असल्याने पोर्णिमेची तिथी १५ ऑगस्ट रोजी होत आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी मिठाई

रक्षाबंधनाचा एक वेगळाच उत्साह सर्वच घरांमध्ये पहायला मिळतो. प्रत्येक घरात एखादा गोड पदार्थ बनवण्यात येतो किंवा विकत आणला जातो. लाडू, पेढे, मिठाई, खिर, बर्फी सारख्या मिठाईंचा यामध्ये समावेश आहे. सध्याच्या काळात रक्षाबंधनाच्या दिवशी चॉकलेट सुद्धा मोठ्या प्रमाणात दिले जातात. तुम्ही सुद्धा तुमच्या भावाला किंवा बहिणीला चॉकलेटचं गिफ्ट देऊ शकता. बाजारात विविध प्रकारच्या चॉकलेट्सचे पॅकेट तुम्हाला मिळतील.

रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बहिणीने भावाला राखी बांधल्यानंतर गोड पदार्थ एकमेकांना भरवतात. एकमेकांना गिफ्टही देतात. त्यानंतर संपूर्ण परिवार एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...