पाहा लालबाग राजाच्या चरणी यंदा किती कोटी दान?

धर्म-कर्म-भविष्य
Updated Sep 17, 2019 | 16:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ म्हणून ज्याची जगभरात ख्याती आहे अशा लालबागच्या राजाच्या चरणी यंदा तब्बल ६ कोटींहून अधिक रुपयांचं दान करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सोने आणि चांदीचा देखील समावेश आहे.

lalbaugcha raja_facebook
(फोटो सौजन्य: लालबागचा राजा फेसबुक)  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • लालबागच्या राजाच्या चरणी यंदा कोट्यवधी रुपये दान
  • रोख रक्कमेसह सोने-चांदीचे दागिने देखील राजाला अर्पण
  • राजाच्या चरणी एका भाविकाकडून सोन्याचं ताट, वाटी, ग्लास आणि चमचाही अर्पण

मुंबई: लालबागच्या राजाच्या चरणी यंदा देखील कोट्यवधीच्या घरात दान करण्यात आलं आहे. यंदा राजाच्या चरणी तब्बल ६ कोटी रुपये दान स्वरुपात प्राप्त झाले आहेत. यावेळी जवळजवळ ३ किलोहून अधिक सोनं आणि ५७ किलो चांदी देखील भविकांनी राजाच्या चरणी दान केली आहे. त्यामुळे या दान स्वरुपातील रक्कमेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यंदा संपूर्ण गणेशोत्सवात सतत पाऊस सुरु असल्याने अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये फारशी गर्दी पाहायला मिळाली नव्हती. सुरुवातीचे काही दिवस लालबाग राजच्या मंडपात देखील तुलनेने गर्दी कमीच होती. पण शेवटच्या तीन ते चार दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली होती. त्यामुळेच यंदाही सहा कोटी एवढं प्रचंड दान राजाच्या चरणी झाल्याचं समजतं आहे. दरम्यान, राजाच्या चरणी दान करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव देखील करण्यात आला. यातून देखील मंडळाला कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. 

संपूर्ण मुंबईसह अगदी देशभरातून लोकं लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी येत असतात. हेच भाविक राजाच्या चरणी भरभरून दान देतात. यावेळी रोख रक्कम, सोने-चांदीच्या वस्तूंसह अनेक गोष्टी दान केल्या जातात. पण यासोबतच अनेकदा काही भाविक परदेशी चलन देखील दान स्वरुपात देत असल्याचं दिसून आलं आहे. राजाच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान होत असल्याने त्याची योग्य मोजणी करण्यासाठी मंडळाने तब्बल ९० जणांची एक वेगळी टीमच नेमली आहे. गेले काही दिवस मंडळातील ९० जणांची विशेष टीम ही सतत पैशाची मोजणी करत आहे. आतापर्यंत दान करण्यात आलेल्या अनेक वस्तूची मोजदाद झाली असून आता त्यातील अनेक वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असल्याने अनेक जण हे राजाच्या चरणी अनेकविध गोष्टी दान करतात. यावेळी काही भाविकांनी तर सोन्याचे अनेक दागिने बाप्पाला अर्पण केले आहेत. यामध्ये एका भाविकाने सोन्याचं ताट, वाट्या, ग्लास आणि चमचे अर्पण केले आहेत. तर एका भाविकाने तब्बल अर्धा किलो वजनाचे चांदीची पावलं दान केली आहेत. 

यंदा संपूर्ण गणोशोत्सवात सतत पाऊस बरसत असल्याने लालबागच्या चरणी गर्दी कमी असेल असं अनेकांचं मतं होतं. पण गणेशोत्सवातील शेवटच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. ज्यामुळे दानपेटीत कोट्यवधी रुपयांचं दान जमा झालं आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षात राजाच्या चरणी दान वाढतच आहेत. यंदाच सहा कोटींहून अधिकचं दान करण्यात आलं असून अजूनही काही गोष्टींची मोजदाद सुरु आहे. 

दरम्यान, यंदा लालबागचा राजा मंडळाने मोठ्या प्रमाणात भाविकांसाठी वेगवेगळ्या स्वरुपात सोय केली होती. मात्र तरीही गर्दीने यंदाही उच्चांक गाठल्याने भाविकांना दर्शनासाठी तासनतास रांग लावावी लागली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पाहा लालबाग राजाच्या चरणी यंदा किती कोटी दान? Description: मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ म्हणून ज्याची जगभरात ख्याती आहे अशा लालबागच्या राजाच्या चरणी यंदा तब्बल ६ कोटींहून अधिक रुपयांचं दान करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सोने आणि चांदीचा देखील समावेश आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola