Numerology Prediction For January 2022 : अंकशास्त्रानुसार जानेवारी २०२२ चे मासिक राशीभविष्य

भविष्यात काय
Updated Jan 03, 2022 | 06:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology Prediction For January 2022 : जाणून घेऊ जानेवारी २०२२ या महिन्याचे प्रत्येक मूलांकाचे काय आहे भविष्य...

Numerology Prediction For January 2022
अंकशास्त्रानुसार जानेवारी २०२२ चे मासिक राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • अंकशास्त्रानुसार जानेवारी २०२२ चे मासिक राशीभविष्य
 • जानेवारी २०२२ या महिन्याचे प्रत्येक मूलांकाचे भविष्य
 • काय आहे आपले भविष्य?

Numerology Prediction For January 2022 : ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र शाखेला तितकेच महत्त्व आहे. ज्या प्रमाणे आपली राशी, कुंडलीमधील ग्रह आणि नक्षत्रांचा आपल्या जीवनावर असतो तसाच आपल्या जन्म तारखेचाही प्रभाव आपल्या आयुष्यावर असतो. जन्म तारखेच्या आधारावरच मूलांक किंवा भाग्यांक किंवा जन्मांक काढला जातो. अंकावरुन व्यक्तीचा स्वभाव, गुणदोष, व्यक्तीमत्व, भविष्य याविषयी सांगता येते. जर आपला जन्म ३, १२, २१, ३० यापैकी एखाद्या दिवशी झाला असेल तर आपला जन्मांक/भाग्यांक/मूलांक ३ आहे. जाणून घेऊ या पद्धतीने जानेवारी २०२२ या महिन्याचे प्रत्येक मूलांकाचे काय आहे भविष्य...

 1. मूलांक १ - बुद्धी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रगती कराल. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. अनेक प्रश्न सहज हातावेगळे कराल. अनेकांवर प्रभाव पाडाल. नोकरी-व्यवसायात लाभ होईल. महत्त्वाची जबाबदारी प्रभावीरित्या सांभाळाल. सरकारी सेवेत असाल, पत्रकार असाल अथवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित असाल तर उत्तम काळ आहे. प्रेमात चढउतार आले तरी नाती जपू शकाल. तब्येतीत चढउतार दिसून येतील.
 2. मूलांक २ - कार्यक्षेत्रात प्रगती कराल. बढतीचा योग आहे. महत्त्वाची जबाबदारी प्रभावीरित्या हाताळाल. कौतुक होईल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करू शकाल. प्रसंगी योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने अडचणी सोडवू शकाल. वाद टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. तब्येत जपा. प्रेम, नाती आणि व्यवहार यात गल्लत टाळा. 
 3. मूलांक ३ - संयम बाळगा. मकरसंक्रातीनंतर परिस्थिती बदलेल. मार्ग निघेल. प्रश्न सुटतील. व्यवसायात दुसऱ्या पंधरवड्यात फायदा होईल. नेतृत्वगुण दुसऱ्या पंधरवड्यात दिसून येईल. दांपत्य जीवन आनंदी राहील आणि परस्पर सामंजस्य सुधारेल. कौटुंबिक सुख लाभेल. वाद टाळणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल. तब्येत जपा. चुका आणि हलगर्जीपणा टाळा. देवीच्या सूक्ताचे दररोज पठण करा. 
 4. मूलांक ४ - आर्थिक नियोजन करणे हिताचे. ठरवून आणि नियोजन करुन केलेली कामं यशस्वी होतील. महत्त्वाच्या योजना राबवताना दोन-तीन पद्धतीने नियोजन करणे हिताचे. दांपत्य जीवनात चढउतार येतील. वाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. दर मंगळवारी आणि शनिवारी कालीमातेचे दर्शन घ्या आणि नारळ अर्पण करा. देवीसमोर तुपाचा दिवा लावत जा. 
 5. मूलांक ५ - कधी आपले प्रयत्न तर कधी नशिबाची साथ लाभेल. महिना आनंदात जाईल. आर्थिक नियोजन करा. नोकरीत बढतीचा योग आहे. दांपत्य जीवनात चढउतार आहे. अहंगंड थोडा दूर ठेवा फायदा होईल. वाद टाळणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे मनःशांतीसाठी फायद्याचे आहे. आदित्य हृदय याचे दररोज पठण करा. रोज शक्य नसल्यास किमान दर रविवारी करा.
 6. मूलांक ६ - अनेक रखडलेली कामं पूर्ण होतील. नियोजन करणे हिताचे. आर्थिक नियोजन फायद्याचे ठरेल. व्यवसायात स्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. गैरसमज होऊ नये यासाठी थेट संवादावर भर द्या. प्रसंगी अहं दूर ठेवा. वाद आणि राग यापासून दूर राहणे हिताचे. कायदा पाळणे लाभाचे. तब्येत जपावी. दर मंगळवारी आणि शनिवारी देवी सूक्ताचे पठण करा.
 7. मूलांक ७ - भावूक होण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवा. भौतिक सुख मिळवू शकाल. बुद्धीचा वापर करा. नोकरीत बढती-बदलीचे योग आहेत. प्रवासाचा योग आहे. दांपत्य जीवन आणि कौटुंबिक जीवनात चढउतार आहे. वाद टाळणे हिताचे. तब्येत जपा. देवी सूक्ताचे दररोज पठण करा. बाहेरचे खाणेपिणे टाळा. गरज नसल्यास प्रवास करणे टाळा.
 8. मूलांक ८ - अध्यात्मिक सुखाची अनुभूती येईल. व्यावहारिक जीवनात नियोजन महत्त्वाचे. आर्थिक निर्णय समजून उमजून घ्यावे. काही वेळा भावनांपेक्षा वास्तवाचे भान राखणे हिताचे आहे. हा समतोल साधल्यास प्रगती होईल. गोड बोलून कामं सहज पूर्ण करुन घ्याल. नाती जपण्याला महत्त्व द्या. फिटनेस जपा. दररोज सकाळी १०८ वेळा गायत्री मंत्र म्हणा.
 9. मूलांक ९ - चिंता करणे सोडा. नियोजन करा. आर्थिक नियोजन हिताचे. विद्यार्थ्यांनी शांत डोक्याने अभ्यास-चिंतन-मनन केले तर परीक्षेत यश मिळेल. आरंभी बिकट आव्हान समोर आले तरी प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवाल तर मार्ग निघेल. अडचणी सोडवू शकाल. वाद टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. डोक्यावर बर्फ ठेवा आणि जिभेवर साखर ठेवा. कौटुंबिक पातळीवर आणि दांपत्य जीवनात कधी माघार घ्यायची याचे भान ठेवल्यास आनंदी राहाल. तब्येत जपा.
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी