मुंबई: धनत्रयोदशीच्या(Dhanteras 2020) दिवशी कुबेर(kuber) आणि लक्ष्मी मातेच्या(laxmi mata) पुजेसोबतच देवतांचे आयुर्वेदाचार्य धन्वंतरीचीही(dhanvantari) पुजा केली जाते या दिवशी सुख, संपत्तीसोबत चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदानाचेही विशेष महत्तव आहे. दिवाळीची सुरूवातच मुळी धनत्रयोदशीपासून होत आणि या दिवशी धातूची वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या दिवसाला यश, वैभव, कीर्ती तसेच सुख समृद्धी देणारा दिवस म्हटले आहे. या दिवशी संध्याकाळी दीपदान करणे शुभ मानले जाते. या दिवशी दिवा लावणे इतर दिवसांपेक्षा वेगळे असते.
धनत्रयोदशी्या दिवशी मुख्य दरवाजावर १३ आणि घराच्या आत १३ दिवे लावावेत. लक्षात ठेवा हे दिवे सूर्यास्तानंतर लावायचे आहेत. दोन्ही जागेवर तुम्ही तूपाचे दिवे लावा आणि त्यानंतर देवाकडे आपले चांगले आरोग्य, सुख, संपत्तीसाठी प्रार्थना करा.
कुबेर देवाची कृपा कायम राहण्यासाठी 'ॐ श्रीं, ॐ ह्रीं श्रीं, ॐ ह्रीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय: नम:' हा मंत्र खूपच लाभदायक मानला जातो. जीवनात भोग-विलासिताच्या गोष्टींचे सुख मिळवण्यासाठी 'ॐ वैश्रवणाय स्वाहा:' हा मंत्र जरूर म्हणा.
धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान हे घरातील लक्ष्मी म्हणजेच स्त्रीने करावे. यादिवशी कोणत्याही धातूचे भांडे खरेदी करा. त्यात मिठाई भरून घरात प्रवेश करा. त्यानंतर धन्वंतरी, कुबेर देव आणि लक्ष्मी देवीसोबत गणपतीला या नव्या भांड्यात प्रसाद अर्पण करा. धनत्रयोदशीच्याच दिवशी दिवाळीसाठी पुजा करताना लागणारी लक्ष्मी आणि गणपतीची प्रतिमा खरेदी केली पाहिजे. या दिवशी सोने-चांदी अथवा पितळेचे भांडे खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी तसेच शांती राहते. पितळ हा धन्वंतरीचा धातू आहे.यासाठी पिवळ्या रंगाच्या धातूची खरेदी या दिवशी शुभ मानली जाते.
धनत्रयोदशीपासून दिवाळी सणाला सुरूवात होते. धनत्रयोदशीनंंतर लक्ष्मीपुजन, नरकचतुर्दशी, पाडवा, भाऊबीज असे सण येतात. हिंदू धर्मातील दिवाळी हा मोठा सण आहे. देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.यंदा दिवाळी सणावर कोरोनाचे सावट आहे त्यामुळे आपले आरोग्य जपत सणाची मजा घ्या. मोठी गर्दी करणे टाळा. थोडीशी काळजी घेतली तर आपण सण नक्कीच उत्साहात साजरे करू शकतो.