देशातील ‘या’ हनुमान मंदिराची आश्चर्यकारक कथा, मूर्तीही आहे विशेष

आध्यात्म
Updated May 15, 2019 | 07:40 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Bijethua Mahaviran Temple: देशातच नव्हे तर परदेशातही हनुमानाची भक्ती केली जाते. संपूर्ण देशात मारूतीरायाचे कोट्यवधी मंदिरं आहेत. पण देशातील एक असं मंदिर आहे जिथं हनुमानाचा एक पाय जमिनीखाली खूप खोलवर फसलेला आहे.

Bijethua Mahaviran Temple
हनुमानाच्या मंदिराची विशेष आख्यायिका  |  फोटो सौजन्य: Instagram

हिंदू धर्मातील मुख्य देवी-देवतांमध्ये मारोतीरायाचं एक अढळ स्थान आहे. देशभरात कोट्यवधींच्या संख्येनं लोकं रामभक्त हनुमानाची आराधना करतात. हनुमानाला संकटमोचनही म्हटलं जातं. देशातील सर्वच लहान मोठ्या गावात, शहरात हनुमानाचं मंदिर आहेत. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात आपण भक्तांची दर्शनासाठीची गर्दी बघू शकतो.

हिंदू धर्मातील शास्त्रानुसार हनुमानाच्या पूजेचं आणि उपासनेचं मंगळवारचं महत्त्व वेगळंच असतं. इतर सर्व देवी-देवतांप्रमाणेच मारूतीच्या व्रत आणि सणांचं महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलं गेलंय. आपल्याला वाराणसीच्या संकटमोचन मंदिरासह देशातील अनेक महत्त्वांच्या हनुमान मंदिरांबाबत माहिती असेल, पण आम्ही आपल्याला आज एका अशा हनुमान मंदिराबाबत सांगतोय, ज्याबाबत कदाचित तुमच्या ऐकण्यात आलं नसेल. या मंदिराचं विशेष असं महत्त्व आणि आख्यायिका आहे.

पाहा कुठे आहे हे मंदिर

मारोतीरायाचं हे आश्चर्यकारक मंदिर उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यात आहे. सुल्तानपूरच्या कादीपूर तालुक्यात विजेथुआ गावांतील हे हनुमान मंदिर खूप विशेष आहे. हे मंदिर ‘महावीरन मंदिर’ या नावानं ओळखलं जातं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली हनुमानाची मूर्ती होय. प्राचीन काळापासूनची असलेल्या या हनुमानाच्या मूर्तीचा एक पाय जमिनीखाली खोलवर रूजलेला आहे. महावीरन मंदिरातील ही मूर्ती थोडी तिरपी आहे.

 

 

पुरातत्त्व विभागालाही आलं अपयश

महावीरन मंदिरातील ही हनुमानाची मूर्ती किती प्राचीन आहे हे शोधण्यासाठी आणि तिरपी असलेली मूर्ती सरळ करण्यासाठी पुरातत्त्व विभागानं इथं खोदकाम केलं होतं. मात्र १०० फूट हून अधिक जमिनीखाली खोदल्यानंतरही पुरातत्त्व विभागाला हनुमानाच्या जमिनीखाली रूजलेल्या पायाचा शोध लागला नाही.

महावीरन मंदिराबाबतची आख्यायिका

जेव्हा रामायणात श्रीराम आणि रावणाचं युद्ध सुरू होतं. तेव्हा रावणाच्या एका बाणानं लक्ष्मण बेशुद्ध झाले होते. तेव्हा त्यांच्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी वैद्यांनी संजीवनी आणायला सांगितलं होतं. हनुमान संजीवनी आणण्यासाठी हिमालयात जायला निघाले. मात्र रावणानं त्यांना मारण्यासाठी कालनेमी नावाच्या एका मायावी राक्षसाला पाठवलं होतं. कालनेमीनं साधूचं रूप घेतलं आणि रामनामाचा जप करत बसला. रामनामाचा जप करताना पाहून हनुमान तिथं थांबले. तेव्हा कालनेमीनं मारूतीरायाला आपल्या आश्रमात जावून थोडा आराम करण्याची विनंती केली. साधूच्या इच्छेचा मान ठेवत हनुमंतानं आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. आश्रमात साधूंनी त्यांना जेवणाचा आग्रह केला आणि त्यासाठी आधी आंघोळ करण्यास सांगितले. हनुमंत जसे आंघोळीसाठी तलावात उतरले तसाच साधूच्या रूपात लपलेल्या कालनेमीनं मगरीचं रूप घेतलं आणि हनुमानावर हल्ला केला. मात्र या युद्धात हनुमानानं कालनेमी राक्षसाचा त्याच तलावात वध केला. आता सुद्धा तिथं तो तलाव आहे आणि तलावाला ‘मकरी कुण्ड’ या नावानं ओळखलं जातं.

महावीरन मंदिरात हनुमंताच्या दर्शनासाठी येणारे भक्त पहिले या मकरी कुण्डांचं दर्शन घेतात आणि नंतरच मंदिरात येतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी