Date History and Significance of Hanuman Jayanti : दरवर्षी चैत्र मासातील पौर्णिमेला हनुमान जयंती अर्थात हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिन साजरा केला जातो. यंदा हनुमान जयंती गुरुवार 6 एप्रिल 2023 रोजी आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी भगवान हनुमान अर्थात मारुतीरायाची विधीवत पूजा केली जाते. हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला प्रारंभ होतो. पूजा झाल्यानंतर कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो असे सांगतात. याच कारणामुळे सूर्योदयाला हनुमानाची पूजा करतात.
वानर राजा केसरी आणि त्याची पत्नी अंजना (अंजनी) यांचा पुत्र हनुमान. हनुमान हा भगवान श्रीराम यांचा निस्सीम भक्त म्हणून प्रसिद्ध आहे. भक्ती कशी असावी यासाठी आजही हनुमानाचे उदाहरण दिले जाते. या रामभक्त हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे सूर्योदयाच्या वेळी झाला असे सांगतात.
महाराष्ट्रात शनिवार तर भारतातील इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मंगळवार आणि शनिवार या दिवशी हनुमानाची अर्थात मारुतीरायाची पूजा केली जाते. हनुमानाला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले, पाने, नारळ अर्पण करतात. काही ठिकाणी हनुमानासमोर नारळ फोडतात आणि नंतर तो नारळ हनुमानाला अर्पण करतात. पूजा झाल्यानंतर प्रसाद म्हणून नारळ अर्थात खोबरे वाटतात.
उत्तर भारतात हनुमानाची उपासना मोठ्या प्रमाणात होते. संत तुलसीदास यांनी रचलेली हनुमान चालिसा उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे.
समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांच्या काळात हनुमानाची उपासना महाराष्ट्रात पोहोचविली. यासाठी अकरा ठिकाणी हनुमान मंदिरांची स्थापना केली. आणि बलाच्या उपासनेचे महत्व प्रस्थापित केले अर्थात बलोपासना करण्यासाठी मार्गदर्शन केले. रामदास स्वामी यांनी रचलेले भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र महाराष्ट्रात उपासनेचे एक प्रमुख स्तोत्र आहे.
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स
उन्हाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी खा ही 7 फळे