December Fasting,Tyohar & Festival हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष तर इंग्रजी कालगणनेनुसार डिसेंबर महिना सुरू झाला आहे. व्रतवैकल्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा महिना आहे. याच महिन्यात सूर्यग्रहणही आहे. तर जाणून घेऊया कुठल्या तारखेला आहेत उपवासाचे दिवस आणि ग्रहण.
हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना पवित्र समजला जातो. शास्त्रानुसार हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. गीतेत सांगितलेल्या एका कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने हा महिना आपला अवतार असल्याचे म्हटले आहे.
मराठी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार पूर्वी या महिन्यापासून वर्षारंभ होत असल्याने याला अग्रहायन (हायन= वर्ष) असेही नाव आहे. शिवाय ‘मासानाम् मार्गशीर्षोऽहम्’ असे भगवद्गीतेत म्हटले आहे, यावरून याचे विशेषत्व लक्षात येते. या महिन्याची अधिदेवता केशव आहे. यात मार्तंड, भैरव, मल्हारी किंवा खंडोबा या कित्येकांच्या कुदैवतांचा षड्रात्रोत्सव (शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी) असतो याच्या पहिल्या दिवसाला देव दीपावली म्हणतात व शेवटचा दिवस चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी हा असतो. या दिवशी शंकरांनी मणिअल्ल दैत्याच्या वधासाठी अवतार घेतला असे मानतात. या दिवशी जेजुरी, पाली किंवा खंडोबाच्या अन्य क्षेत्रस्थानी मोठी यात्रा भरते.
शुद्ध पंचमीस नागपूजा असते. शुद्ध एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी व त्याच दिवशी गीताजयंती आणि पौर्णिमेस दत्तजयंती हे या महिन्यातील महत्त्वाचे दिवस आहेत. बहुतेक याच महिन्यात उत्तरायणास प्रारंभ (२२ डिसेंबर) होतो.