Ganesh Chaturthi 2022 on august 31 august, why Ganapati Bappa is called Ekdanta, know the behind story : देशभर दरवर्षी उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सव यंदा बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होत आहे. या उत्सवाची तयारी करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू आहे. लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्याची तयारी सुरू आहे.
भक्तांच्या बाप्पाला गणपती, गणेश, गणाधीश अशा वेगववेगळ्या नावांनी ओळखले जाते. गणपतीला एकदंत असेही म्हणतात. गणपतीच्या मूर्तीत दोन सुळे तोंडाबाहेर दिसतात. हे सुळे म्हणजे गणपतीचे मोठे दात. गणपतीच्या मूर्तीत दोन सुळे दिसतात. यापैकी एक सुळा अखंड असतो तर एक सुळा अर्धवट तुटलेला दिसतो. याच कारणामुळे गणपतीला एकदंत या नावाने ओळखतात.
ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलं आहे की, एकदा भगवान परशुराम आपल्या इष्ट देवतेला म्हणजेच भगवान शंकराला भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर गेले. त्यावेळी भगवान शंकर माता पार्वतीसोबत आपल्या गुहेत होते. ते देवी पार्वतीला श्री रामाची कथा ऐकवत होते. कथेमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी गणपतीला आज्ञा दिली होती की, कुणालाही गुहेत आत सोडू नये. सोबतच त्यांनी बाप्पाला आपलं त्रिशूळ दिलं होतं. जेव्हा भगवान परशुराम कैलास पर्वतावर पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिलं की, भगवान शंकर पूर्ण कैलासावर कुठेच नाहीयेत. फक्त एक मुलगा एका गुहेबाहेर उभा आहे. ते आपल्या इष्ट देवतेच्या दर्शनासाठी संपूर्ण कैलास पर्वतावर फिरत होते. मग त्यांनी गुहेत जाण्याचा प्रयत्न केला. जिथं भगवान शंकर आणि देवी पार्वतीला श्री राम कथा ऐकवत होते. जेव्हा गणेशानं भगवान शंकराचा त्रिशूल रोखून परशुराम यांना गुहेत जाण्यापासून थांबवलं. तेव्हा भगवान परशुराम गणेशावर क्रोधित झाले. त्यांनी गणेशाला आपला रस्त्या अडवू नकोस असं सांगितलं. नाहीतर युद्ध करण्याची चेतावनी दिली. गणपती बाप्पा मागे हटणारे नव्हते आणि त्यांनी परशुराम यांच्यासोबत युद्ध केलं. या युद्धादरम्यान गणपती बाप्पाचा एक दात तुटला. त्यामुळेच गणेशाला एकदंत हे नाव मिळालं. नंतर भगवान शंकर आणि देवी पार्वतीनं जेव्हा हे बघितलं तेव्हा त्यांनी परशुराम यांना गणपती आपला मुलगा असल्याचं सांगितलं.
काही काळाने भगवान गणेश यांनी याच दाताच्या तुटलेल्या भागाचा लेखणीसारखा वापर केला. दात शाईच्या दौतीत बुडवून त्या दाताचा लेखणी सारखा वापर सुरू केला. याच दाताचा लेखणीसारखा वापर करून गणपतीने महर्षी व्यास यांनी सांगितलेले महाभारत लिहून काढले. या घटनांची आठवण म्हणून गणपतीला एकदंत हे नाव पडले.
गणशोत्सवाची सुरुवात बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ रोजी होईल आणि सांगता शनिवार १० सप्टेंबर २०२२ रोजी होईल. या उत्सव काळात दररोज गणपतीची मनोभावे पूजा करा. सकाळी, दुपारी आणि रात्री गणपतीची आरती करा. गणपतीसमोर धूप दीप प्रज्वलित करा.
लक्षात ठेवा गणपतीची पूजा म्हणजेच गणरायाच्या एकदंत या स्वरुपाची पूजा. गणपतीचे एकदंत हे स्वरुप म्हणजे सतत प्रयत्न करणे अडचणींतून मार्ग काढणे, संकटावर विजय मिळवणे.
गणपतीच्या तुटलेल्या दातावरून एक बाब आवर्जून शिकली पाहिजे ती म्हणजे कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी हार मानू नये. प्रयत्न करावा. तुटलेल्या वस्तूचा सदुपयोग शक्य आहे. फक्त वेगळा विचार करणे आवश्यक आहे.