Guru Pradosh Vrat Katha In Marathi : हिंदू धर्मात प्रदोष व्रताला महत्त्व आहे. जर प्रदोष व्रत गुरुवारी असेल तर त्याला गुरू प्रदोष व्रत किंवा गुरुवार प्रदोष व्रत असे म्हणतात. या व्रताचे पालन करणाऱ्यास पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात. अडचणी, अडथळे दूर होतात. प्रगती होते. प्रदोष व्रत दर महिन्यात 2 वेळा असते. हे व्रत व्यवस्थित केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात. जर आपण गुरू प्रदोष व्रत करत असाल तर आपण या व्रताची कथा पण ऐकणे किंवा वाचणे आवश्यक आहे.
देवांचे राजे इंद्रदेव आणि वृत्रासूर यांच्या सैन्याची लढाई झाली. देवांच्या सैन्याने राक्षसांच्या सैन्याचा पराभव केला. पराभवामुळे संतापलेल्या वृत्रासुराने विक्राळ रुप धारण करून देवांना घाबरवले. घाबरलेले देव बृहस्पती देवाला शरण गेले. तेव्हा बृहस्पती देवाने इंद्र देवाला शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत करण्यास सांगितले. या व्रताने शंकर प्रसन्न झाले आणि त्यांच्या आशीर्वादाने इंद्र देवाने अखेर वृत्रासूर समूळ पराभव केला.
राजा चित्ररथ कैलास पर्वतावर गेला. तिथे शंकराच्या आसनावर बसलेल्या पार्वती मातेला बघून राजाने तिची आणि शंकराचे चेष्टा केली. या प्रकाराने संतापलेल्या देवी पार्वतीने राजाला तुझा मृत्यू होईल आणि पुढल्या जन्मात तू राक्षस योनीत जन्माला येशील अशा स्वरुपाचा शाप दिला. यानंतर तसेच घडले. राजा चित्ररथाचा मृत्यू झाला आणि पुढल्या जन्मात वृत्रासूर या नावाने राक्षस योनीत जन्माला आला. या राक्षसाने शंकराला प्रसन्न करून स्वतःचे सामर्थ्य वाढविले. नंतर वृत्रासूर उन्मत्त झाला. त्याने आणि त्याच्या सैन्याने इंद्र देव आणि देवांच्या सैन्याशी लढाई केली होती. लढाईत वृत्रासुराचे सैन्य हरले पण वृत्रासुराला हरवणे इंद्र देवाला जमत नव्हते. शंकराचा आशीर्वाद हेच त्यामागचे कारण होते. पण जेव्हा शंकर इंद्र देवाला प्रसन्न झाले त्यावेळी आशीर्वादाचा गैरवापर करणाऱ्या वृत्रासुराचे सामर्थ्य क्षीण होच गेले. पुढे इंद्र देवाने वृत्रासुराचा समूळ पराभव केला.
प्रत्येक पंधरवड्यातील त्रयोदशी म्हणजे तेराव्या दिवशी सूर्यास्त होण्याच्या 45 मिनिटे आधी प्रदोष काळ सुरू होतो आणि सूर्यास्त होताच संपतो. काही वेळा पंधरवड्यातील द्वादशी म्हणजे बाराव्या दिवशी सूर्यास्त होण्याच्या 45 मिनिटे आधी प्रदोष काळ सुरू होतो आणि सूर्यास्त होताच संपतो. या कालावधीत शंकराचे नामस्मरण करणे, शंकराची पूजा करणे याला प्रचंड महत्त्व आहे. आज गुरुवार 19 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी प्रदोष काळ आहे. आपण ज्या गावात आहात त्या ठिकाणी सूर्यास्ताची वेळ कधी आहे हे तपासून घ्या. कारण प्रत्येक ठिकाणच्या सूर्यास्ताच्या वेळेत फरक असू शकतो. यामुळे प्रत्येक ठिकाणचा प्रदोष काळ वेगवेगळा असू शकतो.