How Makar Sankranti Is Celebrated, Makar Sankranti on Sunday 15 January 2023 : यंदा मकरसंक्रांती (मकर संक्रांत किंवा मकरसंक्रांत किंवा मकरसंक्रांती) हा सण रविवार 15 जानेवारी 2023 रोजी आहे. संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. यंदा भोगी शनिवार 14 जानेवारी 2023 रोजी आहे. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. यंदा किंक्रात सोमवार 16 जानेवारी 2023 रोजी आहे.
मकरसंक्रांती हा पौष महिन्यात येणारा कालगणनेशी संबंधित असा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती म्हणून ओळखली जाते. या दिवसांमध्ये शेतांत आलेल्या धान्याचे वाण महिला एकमेकींना देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ सुगडात (सुपात) भरुन देवाला अर्पण करतात. महिला उखाणे घेतात. उत्तर आणि दक्षिण भारतात मकरसंक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करुन नंतर देवदर्शन करण्याची पद्धत रुढ आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. पृथ्वीचा उत्तर गोलार्ध आणि सूर्य यांच्यातील अंतर कमी होते.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्योदय होताच आंघोळ करुन सूर्याला अर्ध्य द्यावे. शक्य असल्यास पवित्र नदीत अथवा जवळच्या नदीवर जाऊन आंघोळ करावी. नंतर घरातल्या देवांची पूजा करावी. सूर्यदेवाचे नामस्मरण करावे तसेच गायत्री मंत्राचा जप करावा. किमान 108 वेळा गायत्री मंत्र म्हणावा. ओळखीतल्यांना तिळाचे लाडू अथवा तिळाच्या वड्या किंवा तिळाचा हलवा यांचे वाटप करावे. 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे म्हणावे. नंतर मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा द्याव्या. दुपारच्या जेवणात गुळाची पोळी आणि तिळगुळ अथवा तिळाची वडी हे पदार्थ आवर्जून खावे.
महाराष्ट्रात विवाहित स्त्रिया मकरसंक्रांतीच्या दिवशी तसेच या दिवसापासून हळदीकुंकू समारंभ करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो. मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात.
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात.
तीळ वापरण्यातचा दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा उद्देश असतो.
नवविवाहित वधूचे हळदीकुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट देतात. हलव्याचे दागिने मुलीला व जावयाला देतात. लहान बालकांना संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे तसेच त्यांना हलव्याचे दागिने घालणे ही पद्धत अनेक ठिकाणी आहे. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओततात. काळानुरुप या पदार्थांसोबतच गोळ्या, चॉकलेट आणि बिस्किटे पण डोक्यावर ओततात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.
मकरसंक्रांतीच्या दिवशी दिवसभर नवे कपडे परिधान करुन लहान-थोर पतंग उडवतात. पतंग उडवून आनंद साजरा करण्याची पद्धत आहे.
IND vs SL : सूर्यकुमार यादव चमकला, भारताने T20 सीरिज जिंकली, पहिली वन डे मंगळवारी
Sunday Mega Block | हुश्श…! या मार्गावरील मुंबईकरांना दिलासा, जाणून घ्या कुठे आहे मेगाब्लॉक
Accident : आमदार योगेश कदमांच्या कारला भीषण अपघात; घातपाताचा संशय, घटनेनंतर कदमांनी दिली प्रतिक्रिया
मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात. वांग्या-बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा, पापडी, हरभऱ्याचे हिरवे दाणे, कोनफळ, लाल गाजरे, भुईमुगाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शेंगा, तिळाचे कूट या सर्वांचा मिश्रणातून तयार केलेल्या भाजीला भोगीची भाजी म्हणतात. दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी इंदाची पूजा करून आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे.
संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदीकुंकू समारंभा साजरा करतात. दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गायीबैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्यगायनाचा कार्यक्रमही केला जातो.