Jagannath Rath Yatra 2019: 'या' दिवशी निघणार जगन्नाथ रथ यात्रा, जाणून घ्या यात्रेचं महत्त्व

आध्यात्म
Updated Jul 02, 2019 | 21:22 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

दरवर्षी ओडिशाच्या पुरी इथं असलेल्या जगन्नाथ मंदिरात भगवान जगन्नाथाची रथरात्रा निघत असते. या रथयात्रेत भगवान जगन्नाथ सोबत भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचाही रथ निघत असतो. यंदा ही रथयात्रा ४ जुलैला निघणार आहे.

jagannath puri rath yatra
या दिवशी निघेल जगन्नाथ रथ यात्रा,जाणून घ्या यात्रेचं महत्त्व  |  फोटो सौजन्य: Instagram

Jagannath Yatra: पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिराचं खूप महत्त्व आहे. हे मंदिर भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक येथे  भगवान जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. शास्त्र आणि पुराणांमध्ये भगवान विष्णूचे २४ अवतार सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचं सांगितलं जातं. दरवर्षी ओडिशाच्या पुरी इथं असलेल्या जगन्नाथ मंदिरातून जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा काढली जाते. हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव असतो. प्रत्येक वर्षाच्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितियेला ही रथयात्रा संपन्न होते. यंदा रथयात्रा ४ जुलै २०१९ म्हणजेच येत्या गुरूवारी निघणार आहे.

जगन्नाथ रथयात्रा उत्सवाचं महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार, जगन्नाथ रथयात्रा काढून भगवान जगन्नाथाला तिथं प्रसिद्ध असलेल्या गुंडिचा माता मंदिरात पोहोचवलं जातं. म्हणून या रथयात्रेची तयारी खूप आधीपासून सुरू केलेली असते. गुंडिचा मंदिरात भगवान जगन्नाथ आराम करतात म्हणून रथयात्रेच्या एक दिवसापूर्वी गुंडिचा माता मंदिर चांगल्या पद्धतीनं स्वच्छ केलं जातं. या स्वच्छेतेच्या कार्याला गुंडिचा मार्जन असं म्हणतात.

मंदिराच्या स्वच्छतेसाठी खास इंद्रद्युम्न तलावातून पाणी आणलं जातं. आपल्याला कदाचित हे माहिती नसेल पण भगवान जगन्नाथाची ही रथयात्रा फक्त भारताताच नाही तर संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरी केली जाते. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी पुरी येथे जगभरातून भाविक दाखल होतात. जगन्नाथ मंदिर देशातील चार धाम पैकी एक आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी जगन्नाथ मंदिरात जावून देवाचं दर्शन घेणं ही सर्वच हिंदूंची इच्छा असते.

अशी काढली जाते ही रथयात्रा

ओडिशातील पुरी इथल्या रस्त्यावरून भगवान जगन्नाथ, बालभद्र आणि सुभद्रा यांची भव्य रथयात्रा काढली जाते. या पवित्र यात्रेत भगवान बालभद्रचा रथ सर्वात पुढे असतो, याला तालध्वज म्हटलं जातं. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो याला दर्पदलन किंवा पद्मा रथ असं संबोधलं जातं. सर्वात शेवटी भगवान जगन्नाथाचा रथ असतो, ज्याला नंदी घोष किंवा गरुड ध्वज म्हटलं जातं. खरं पाहिलं तर ही रथयात्रा भगवान विष्णूचे अवतार जगन्नाथ देवालाच समर्पित असते. जे कुणी भाविक खऱ्या श्रद्धेनं या यात्रेमध्ये सहभागी होतात, त्यांना मोक्षाची प्राप्ती होते, असं म्हटलं जातं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी