Kaal Bhairava Ashtami 2021 काल भैरव अष्टमी कोणत्या दिवशी आणि कशी साजरी करतात?, वाचा कालभैरवाष्टक स्तोत्र

Kaal Bhairava Ashtami 2021 or  Kaal Bhairava Jayanti On which day and how is celebrated, Kalabhairavashtakam भय, संकट, कोप, बदनामी किंवा आरोप (लांछन) यापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण व्हावे यासाठी दरवर्षी काल भैरव अष्टमी (काल भैरव जयंती) साजरी केली जाते. यंदा शनिवार २७ नोव्हेंबर २०२१ रोजी काल भैरव अष्टमी (काल भैरव जयंती) आहे.

Kaal Bhairava Ashtami 2021 or  Kaal Bhairava Jayanti, Kalabhairavasht
काल भैरव 
थोडं पण कामाचं
  • काल भैरव अष्टमी कोणत्या दिवशी आणि कशी साजरी करतात?, वाचा कालभैरवाष्टक स्तोत्र
  • शनिवार २७ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५.४३ वाजल्यापासून रविवार २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत काल भैरव अष्टमी (काल भैरव जयंती)
  • कालभैरव हा भगवान शंकराचा अवतार

Kaal Bhairava Ashtami 2021 or  Kaal Bhairava Jayanti On which day and how is celebrated नवी दिल्ली : भय, संकट, कोप, बदनामी किंवा आरोप (लांछन) यापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण व्हावे यासाठी दरवर्षी काल भैरव अष्टमी (काल भैरव जयंती) साजरी केली जाते. यंदा शनिवार २७ नोव्हेंबर २०२१ रोजी काल भैरव अष्टमी (काल भैरव जयंती) आहे. या वर्षी शनिवार २७ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५.४३ वाजल्यापासून रविवार २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत काल भैरव अष्टमी (काल भैरव जयंती) साजरी करता येईल.

Bhairavastami : भैरवाष्टमी 2021 कधी आहे? जाणून घ्या भैरवला का म्हटलं जातं 'शक्तीपुंज'

कालभैरव हा भगवान शंकराचा अवतार आहे. ब्रह्म देवाला सृष्टीची निर्मिती केल्याचा अहंकार झाला. अखेर कालभैरवाने त्रिशूळाने ब्रह्म देवाचे पाच पैकी एक शिर धडापासून वेगळे केले. पृथ्वीवर ब्रह्म देवाला पूजेत विशेष महत्त्व दिले जाणार नाही, असा शाप कालभैरवाने दिला. यामुळेच पृथ्वीवर अपवादात्मक जागा सोडल्यास ब्रह्म देवाचे पूजन होत नाही तसेच त्याचे मंदिर दिसत नाही. 

शंकराचा अवतार असलेला कालभैरव हा चार हातांचा आहे. त्याचे दात तोंडाबाहेर आले आहेत. कालभैरवाच्या एका हातात तलवार किंवा फास किंवा साप, दुसऱ्या हातात कवटी, तिसऱ्या हातात डमरू आणि चौथ्या हातात त्रिशूळ आहे. कालभैरवाला दंडपाणि या नावानेही ओळखले जाते. हा शंकराचा अतिशय उग्र आणि घातक अवतार आहे. या अवताराला रुद्रावतार असेही म्हणतात. अतिशय मोजक्या कपड्यांत वावरणाऱ्या कालभैरवासोबत कुत्रा आणि पर्वत असतात. वाईट वर्तन करणाऱ्या आणि अहंकार बाळगणाऱ्यांना कालभैरव कठोर शिक्षा देतो. 

जेव्हा सतीने अर्थात पार्वतीच्या सती अवताराने यज्ञ कुंडात उडी मारुन आत्माहुती दिली त्यावेळी भगवान शंकराचा कोप झाला. शंकराने कालभैरव या अवताराला यज्ञस्थळ नष्ट करण्याचा आदेश दिला. साक्षात काळ बनून आलेल्या कालभैरवाने तांडव केले. ज्या ठिकाणी शंकराचे ज्योर्तिलिंग किंवा देवीचे शक्तिपीठ आहे अशा ठिकाणी कालभैरवाचे मंदिर आढळते. यातूनच कालभैरवाचे महत्त्व लक्षात येते. 

कालभैरवाची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी काल भैरव अष्टमीच्या दिवशी अर्थात काल भैरव जयंती निमित्त उपवास केला जातो. सूर्योदयापासून सुरू होणारा हा उपवास सूर्यास्तानंतर संपतो. उपवास काळात कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणतात. कुत्र्याला खाऊ घालून उपवास सोडतात. काल भैरव अष्टमी किंवा काल भैरव जयंती निमित्त त्या दिवशी १००८ वेळा काल भैरव मंत्राचा मनोभावे जप केला जातो. कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणतात. रात्री जागरण करुन पूजा, आरती, भजन, किर्तन केले जाते. कुत्र्यांना खाऊ घालतात आणि पितरांना श्रद्धांजली वाहतात. 

कालभैरवाष्टक स्तोत्र Kalabhairavashtakam

ॐ देवराजसेव्यमानपावनाङ्घ्रिपङ्कजं
व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥१॥

अनुवाद: साक्षात देवराज इंद्र ज्यांच्या चरणांची सेवा करतात, ज्यांनी शरीरावर सर्प रुपी यज्ञोपवीत, आणि डोक्यावर चंद्र धारण केलेले आहेत. दिशा हे ज्यांचे वस्त्र आहेत आणि नारदादी योगीवृंद ज्यांना आदराने वंदन करतात, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं
नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ।
कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥२॥

अनुवाद: ज्यांना तीन डोळे आणि निळा कंठ आहे आणि ज्यांचे कोट्यवधी सूर्यप्रकाशसम तेज आहे, ते निश्चितच संसाररूपी भवसमुद्र तरुन जाण्यास सहाय्यक आहेत. जे अक्षय असून काळाचे महाकाळ आहेत, ज्यांचे नेत्र कोमल आहेत, ज्याचे त्रिशूळ समस्त विश्वाचा आधार आहे, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥३॥

अनुवाद: ज्यांनी हातात त्रिशूळ, भाला, पाश, दंड इत्यादी धारण केलेले आहेत. सावळा रंग असून जे निरामय असून विश्वाच्या आरंभापासून अस्तित्वात आहेत, जे महापराक्रमी असून अदभुत तांडव करतात, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं
भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् ।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥४॥

अनुवाद: जे आपल्या भक्तांना भुक्ती आणि मुक्ती प्रदान करतात, ज्यांचे स्वरूप प्रशस्त आणि सुंदर आहे, ज्यांचे चारही लोकांत सामावलेले आहे, जे आपल्या भक्तांवर ममत्वाचा वर्षाव करतात, ज्यांच्या कमरेला मंजुळ आवाजात किणकिणणाऱ्या घंट्या आहेत, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं
कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम् ।
स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥५॥

अनुवाद: जे धर्ममार्गाचे पालक तथा रक्षक असून अधर्माचा नाश करतात, ते दिसण्यास आनंददायी असून भक्तांच्या जन्मोजन्मीच्या कर्मपाशाचा नाश करतात. सर्पांनी शरीर वेढल्यामुळे जे शोभून दिसताहेत, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं
नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनम् ।
मृत्युदर्पनाशनं कराळदंष्ट्रमोक्षणं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥६॥

अनुवाद: पायात रत्नजडित पादुका धारण केल्यामुळे जे सुशोभित झाले आहेत आणि नित्य निर्मल, अविनाशी, अद्वितीय असून भक्तप्रिय आहेत. जे मृत्यूचा अहंकार दूर सारून आपल्या भयावह दातांनी काळापासून भक्तांचे रक्षण करतात, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं
दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् ।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥७॥

अनुवाद: ज्यांच्या विकट हास्याने संपूर्ण ब्रम्हांड विदीर्ण होते आणि ज्यांच्या एका दृष्टीकटाक्षाने सर्व पापांचा नाश होतो, तसेच ज्याचे शासन कठोर असून आपल्या भक्तांना जो सर्व प्रकारच्या सिद्धी देतो, अशा या नरमुंड धारक काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं
काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥८॥

अनुवाद: जो समस्त भूत संघाचा नायक असून विशाल किर्तीदायक आहे, तसेच तो काशीपुरीत राहणाऱ्या भक्तांच्या पाप-पुण्याचा हिशोब ठेवतो. ज्याला नीती आणि अनितीच्या मार्गाची जाण आहे तसेच तो अत्यंत प्राचीन काळापासून जगाचा स्वामी आहे, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं
ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं
ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं ध्रुवम् ॥९॥

अनुवाद: जे लोक अशा या मनोहर कालभैरवाष्टकाचे निरंतर पठण करतात, त्यांना ज्ञान तथा मुक्तीचा लाभ होतो. तसेच त्यांच्या सर्व शोक, मोह, दैन्य, लोभ, कोप आणि ताप इत्यादींचा नाश होतो. अशा प्रकारे हे लोक अंती कालभैरवाच्या चरणी आपले स्थान प्राप्त करतात.

॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णम् ॥

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी