Hartalika: हरतालिकेचं व्रत आणि पूजा अशाप्रकारे करा, जाणून घ्या संपूर्ण यादी

Hartalika: आज (२१ ऑगस्ट) हरतालिका आहे. या व्रतासाठी महिलांना विशेष तयारी करावी लागते. तर मग जाणून घ्या कसं करायचं हरतालिकेचं व्रत आणि पूजेसाठी काय-काय लागणार साहित्य.

Shiv-Parvati
Hartalika: हरतालिकेचं व्रत आणि पूजा अशाप्रकारे करा, जाणून घ्या संपूर्ण यादी 

थोडं पण कामाचं

  • हरतालिकेचं व्रत करण्यासाठी जाणून घ्या कुठले साहित्य लागणार ते
  • २१ ऑगस्टला आहे हरतालिका, जाणून घ्या या व्रताचं महत्त्व
  • सौभाग्यवती महिलांसोबतच कुमारीका सुद्धा करतात हरतालिकेचं व्रत

मुंबई: भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरतालिकेचं व्रत महिला करत असतात. अनेक राज्यांमध्ये याला तीज असंही म्हणतात. हे व्रत भगवान शंकराला आणि माता पार्वतीला समर्पित आहे. पौराणिक मान्यतेनुसार कुमारी कन्या हे व्रत चांगला मनासारखा पती मिळण्यासाठी करतात. तर लग्न झालेल्या महिला हे आपलं सौभाग्य अबाधित राहावं, यासाठी हरतालिकेचं व्रत करत असतात. हे व्रत करूनच माता पार्वतीनं आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकराची प्राप्ती केली होती. आज (२१ ऑगस्ट) महाराष्ट्रभरात हरतालिकेची पूजा केली जाणार आहे. तर मग जाणून घ्या हरतालिकेची पूजा कशाप्रकारे करावी ते...

हरतालिकेच्या पुजेला लागणारं साहित्य

हरतालिकेच्या पूजेसाठी रेती, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरे फुलं, वस्त्र, तसंच १६ प्रकारच्या पत्री (१६ झाडांची १६-१६ पानं), पूजेसाठी फुलं, तसंच सौभाग्याचं साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू, श्रीफळ, कलश, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दुध, मध, दही म्हणजेच पंचामृत इत्यादी साहित्य पूजेसाठी तयार ठेवावं.

अशा पद्धतीनं करा हरतालिकेची पूजा

हरतालिकेचं व्रत अनेक जण निर्जल करतात. सकाळी-सकाळी आंघोळ करून शुचिर्भूत व्हावं. यानंतर देवघरातील भगवान शंकराला गंगाजल, दही, दूध, मध म्हणजे पंचामृतानं स्नान घालावं. यासाठी आपल्या पतीची मदत घ्यावी. यानंतर एका ताटलीला किंवा परडीला दोरा बांधावा. त्यानंतर त्यावर रेतीनं महादेवाची पिंड बनवावी आणि पार्वती म्हणून ५ खडे ठेवावेत. त्यांची फुल, कापसाचे वस्त्र, बेलपत्र वाहावित. तर पार्वतीला हळदी-कुंकू लावावं.

याशिवाय अनेक जण बाजारात उपलब्ध असलेले मातीच्या गौरी-पार्वतीची मूर्ती आणून त्याचीही पूजा करतात. प्रत्येक विभागातील एक वेगवेगळी पद्धत असली तरी पूजेची पद्धत मात्र एकच आहे.

पूजेत सौभाग्याचं लेणं देवी पार्वती/गौरीला अर्पण करावं आणि देवीकडे आपल्या अखंड सौभाग्याची आणि मुलांच्या रक्षणाचा आशीर्वाद मागावा.

यानंतर देवीचा हा मंत्र म्हणावा-

कात्यायिनी महामाये महायोगिनीधीश्वरी

नन्द-गोपसुतं देवि पतिं में कुरु ते नम:।।

यासाठी केलं जातं हरतालिकेचं व्रत

हरतालिकेचं व्रत सर्वात पहिले देवी पार्वतीनं भगवान शंकर पती म्हणून मिळावे म्हणून केलं होतं. या व्रतामुळे आणि देवीच्या तपस्येमुळे प्रसन्न होऊन भगवान शंकरानं पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला होता. हेच कारण या व्रताचं महत्त्व सांगतं. पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीनं जंगलात जावून एकही पर्ण ग्रहण न करता शिवाची उपासना केली होती. या व्रतामध्ये त्यांनी पाणीही ग्रहण केलं नव्हतं. सौभाग्यवती महिलांसाठी हे व्रत खूप फलदायी मानलं जातं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी