Raksha Bandhan 2020: मान्यतेनुसार देवी लक्ष्मीनं केली रक्षाबंधनाची सुरूवात, जाणून घ्या पौराणिक कथा

भावा-बहिणींच्या नात्यातील प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण साजरा करणं कधीपासून सुरू झाला. याबाबत विविध मान्यता आहे. जाणून घेऊया याबाबतची एक पौराणिक कथा...

Raksha Bandhan
मान्यतेनुसार देवी लक्ष्मीनं केली रक्षाबंधनाची सुरूवात (फोटो सौजन्य: Shutterstock) 

थोडं पण कामाचं

  • कधीपासून सुरू झालं रक्षाबंधन, जाणून घ्या पौराणिक कथा
  • देवी लक्ष्मीनं बळी राजाला भाऊ मानून सुरू केला हा सण, अशी मान्यता
  • रक्षाबंधनाबाबत अनेक कथा, त्यातीलच एक पौराणिक कथा

Raksha Bandhan 2020: रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमा देशात खूप उत्साहानं साजरा केला जाणारा सण आहे. हा दिवस म्हणजे भावा-बहिणीच्या नात्याचा, प्रेमाचा दिवस होय. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या सणाबाबत अनेक मान्यता सुद्धा आहेत. त्यामुळे आज जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार कधीपासून झाली रक्षाबंधन साजरा करण्यास सुरूवात.


धार्मिक कथेनुसार एकदा राजा बळी अश्वमेध यज्ञ करत होते. तेव्हा भगवान विष्णू यांनी वामन अवतार घेतला आणि राजा बळीला तीन पावलं जमीन दान मागितली. राजा बळी आपल्या दानशूरपणासाठी प्रसिद्ध होता. त्यांनी ही मागणी लगेच मान्य केली आणि तीन पावलं जमीन वामनाला मापायला सांगितली. यानंतर भगवान विष्णूनं आपल्या एका पावलात पृथ्वी, दुसऱ्यात स्वर्गलोक मापून घेतलं. तर तिसरं पाऊल ठेवायला राजा बळीनं आपलं डोकं समोर केलं. नारायणानं तिसरं पाऊल राजा बळीच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात पाठवलं.

राजा बळीनं पाताळात राहणं स्वीकारलं, पण राजानं भगवान विष्णूकडे एक वचन मागितलं. देवानं वचन देण्याचं मान्य केलं आणि मागणं मागायला सांगितलं. तेव्हा राजा बळीनं म्हटलं की, देवा मी जेव्हा पण बघेन तेव्हा फक्त आपल्याला बघू शकलो पाहिजे. जागा असेल तेव्हा झोपेल तेव्हा प्रत्येक क्षणी मी आपल्याला बघू इच्छितो. देवानं तथास्तु म्हणत राजा बळीला आशीर्वाद दिला.

जेव्हा भगवान विष्णू राजा बळीसोबत पाताळात राहू लागले तेव्हा देवी लक्ष्मीला काळजी वाटली. देवीनं त्याच क्षणी भ्रमण करत असलेल्या नारद मुनींना बघितलं. तेव्हा माता लक्ष्मीनं नारदांना विचारलं की, त्यांनी कुठे भगवान विष्णूला बघितलंय का? तेव्हा नारद मुनींनी सर्व घटना सांगितली. तेव्हा देवी लक्ष्मीनं विष्णूंना परत वैंकुंठात आणण्यासाठीचा उपाय विचारला. तेव्हा नारद मुनींनी सांगितलं की, राजा बळीला आपला बंधू स्वीकारून त्यांच्याकडे विष्णू देवाची मागणी करा. यानंतर देवी लक्ष्मी पण पाताळात पोहोचल्या.

पाताळात पोहोचल्यावर देवी लक्ष्मी रडायला लागल्या. राजा बळीनं देवींना रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा लक्ष्मीनं म्हटलं की, त्यांचा कुणी भाऊ नाही. देवीचं हे वाक्य ऐकून राजा बळीनं देवी लक्ष्मीला आपली धर्म बहीण मान्य केलं. यानंतर देवी लक्ष्मीनं बळी राजाला भगवान विष्णू परत मागितले. धार्मिक मान्यतेनुसार तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण साजरा करणं सुरू झालं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी