Maghi Ganesh Jayanti 2023 : यंदा बुधवार 25 जानेवारी 2023 रोजी माघी गणेश जयंती अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती आहे. याच दिवशी विनायक चतुर्थी पण आहे.
गणपतीचे एकूण तीन अवतार समजले जातात. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस साजरे केले जातात. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टिपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतात. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून साजरा करतात. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून साजरा करतात.
माघी गणेश जयंतीला मातीच्या अथवा धातूच्या गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. भाद्रपद महिन्यातील गणेशचतुर्थीला जशी घरोघरी गणपतीची पूजा होते तशी माघी गणेश जयंतीला प्रत्येक घरी गणपतीची पूजा करण्याची पद्धत नाही.
जिथे माघी गणेश जयंती साजरी करतात तिथे एक किंवा दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. पण अलिकडे काही मंडळांनी भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणेशोत्सव पण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
माघी गणेश जयंती साजरी करताता तिळगुळाचे मोदक गणपतीला अर्पण करण्याची पद्धत आहे. दिवसभर उपवास करतात, गणपतीची पूजा करतात तसेच गणपतीचे नामस्मरण करतात, सूर्यास्तानंतर उपवास सोडतात.
गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. याच कारणामुळे माघी गणेश जयंतीला षोडशोपचार गणेशपूजन करून गणपतीला तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. नैवेद्याच्या वेगळ्या पद्धतीमुळेच या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. माघी गणेश जयंतीला स्नान, दान, जप, होम कर्म केल्यास गणेशकृपा राहते असे सांगतात.
Bank Strike : बँक कर्मचारी जानेवारीत संपावर जाण्याच्या तयारीत
माघ महिन्यातील या गणेश जयंतीच्या दिवशी करावयाचे गणेशपूजन भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या गणेशपूजनासारखेच असते. या दिवशी पाण्यात तीळ घालून त्या पाण्याने स्नान करावयाचे असते. तसेच उपवास करावयाचा असतो. माघ महिन्यातील गणेशजयंतीला धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेशमूर्तीची पूजा करावयाची असते. प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये देवत्त्व आणले जाते. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी पूजन करावयाचे असते. माघ महिन्यातील या गणेशपूजनात पत्री अर्पण न करता दूर्वा अर्पण करतात. तसेच पुरणाच्या मोदकांऐवजी तिळगुळाच्या मोदकांचा प्रसाद अर्पण करतात.