makar sankranti 2023 : History, Facts, Significance in Marathi : यंदा मकरसंक्रांती (मकर संक्रांत किंवा मकरसंक्रांत किंवा मकरसंक्रांती) हा सण रविवार 15 जानेवारी 2023 रोजी आहे. हिंदू पंचागानुसार 15 डिसेंबर 2022 पासून खरमास अर्थात अशुभ काळ सुरू झाला आहे. हा काळ संपेल आणि शुभ काळ सुरू होईल. शुभ कार्य करण्यासाठी उत्तम कालावधी सुरू होईल. याचा आनंद मकरसंक्रांतीच्या रुपाने साजरा केला जाईल.
मकरसंक्रांत हा पौष महिन्यात येणारा कालगणनेशी संबंधित असा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती म्हणून ओळखली जाते. या दिवसांमध्ये शेतांत आलेल्या धान्याचे वाण महिला एकमेकींना देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ सुगडात (सुपात) भरुन देवाला अर्पण करतात. महिला उखाणे घेतात. उत्तर आणि दक्षिण भारतात मकरसंक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करुन नंतर देवदर्शन घेण्याची पद्धत रुढ आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. पृथ्वीचा उत्तर गोलार्ध आणि सूर्य यांच्यातील अंतर कमी होते. नागरिक मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्योदय होताच आंघोळ करुन सूर्याला अर्ध्य देतात. शक्य असल्यास पवित्र नदीत अथवा जवळच्या नदीवर जाऊन अथवा नदीचे पाणी घरच्या पाण्यात मिसळून आंघोळ करतात आणि सूर्याला अर्ध्य देतात. नंतर घरातल्या देवांची पूजा करतात.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे नामस्मरण करणे तसेच गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करणे याला विशेष महत्त्व आहे. ओळखीतल्यांना तिळाचे लाडू अथवा तिळाच्या वड्या देतात. 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे म्हणतात. दुपारच्या जेवणात गुळाची पोळी आणि तिळगुळ अथवा तिळाची वडी हे पदार्थ आवर्जून खातात. भारतात वेगवेगळ्या भागांमध्ये मकरसंक्रांत हा दिवस वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
हिंदू दिनदर्शिकेनुसार 2023 मध्ये मकर संक्रांत हा सण रविवार 15 जानेवारी रोजी साजरा केला जाईल. याआधी 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 8 वाजून 21 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि 15 जानेवारी 2023 रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांत हा सण साजरा केला जाईल. यावेळी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त सकाळी 7 वाजून 15 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 30 मिनिटापर्यंत असेल. महापुण्य काळ मुहूर्त 7 वाजून 15 मिनिटे ते 9 वाजून 15 मिनिटापर्यंत असेल.
January 2023 : जानेवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस