लग्न हा खूप महत्त्वाचा संस्कार हिंदू धर्मात मानला जातो. धर्म, जात कोणतीही असो पण प्रत्येक आई-वडिलांना आपली मुलगी ही सासरी सुखी असली पाहिजे हे वाटत असतं. सासरची मंडळी कशी असेल, आपल्या मुलीला ते सांभाळून घेतील की नाही, ही भीती मुलीच्या आई-वडिलांना वाटत असते.
आई-वडील आपल्या परीनं सर्वात चांगलं घर आणि मुलगा आपल्या मुलीसाठी निवडत असतात, पण अनेकदा कुठल्याही कारणानं ती सासरी आनंदी राहू शकत नाही. अशावेळी ज्योतिष शास्त्रानुसार मुलीच्या आई-वडिलांनी करण्यासाठीचे काही उपाय सांगितले आहेत. या उपयांनी मुलगी सासरी आनंदी राहील, असं सांगितलं गेलंय. ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले हे उपाय मुलीच्या आई-वडिलांनी वरातीच्या वेळी करायचे आहेत. हे उपाय केले तर मुलीचं वैवाहिक आयुष्य सुखी आणि समृद्ध होईल.
१०० ग्रॅम मेहंदीचे तीन पाकिट घेऊन ते काली मातेच्या मंदिरात अर्पण करावेत. देवीच्या तिन्ही मेहंदीच्या पाकिटांसह काही दक्षिणा, फूल, नैवेद्य, कुंकू आणि ओटी भरावी. यानंतर देवीला अर्पण केलेल्या मेहंदीच्या तीन पाकिटांपैकी दोन पाकिटं आणि एक फळ कोणत्याही गरीब सवाष्ण स्त्रीला द्यावे. त्यानंतर त्या गरीब स्त्रीकडून एक मेहंदीचं पाकिट परत घ्यावं आणि ती परत घेतलेली मेहंदी त्या गरीब सवाष्ण स्त्रीच्या हातावर आपल्या मुलीच्या हातून लावावी. जसजशी त्या महिलेच्या हाता-पायावरची मेहंदी उतरेल तसतसे मुलीच्या आयुष्यातील दु:ख दूर होतील.
मुलगी जेव्हा पहिल्यांदा सासरी जात असते तेव्हा शेंडीसोबत असलेला एक नारळ मुलीला द्या. हे नारळ मुलीनं सासरी पोहोचल्यावर आपल्या देवघरात ठेवावं आणि दररोज या नारळाची पूजा करावी. यामुळे सासरी प्रेमाचं वातावरण राहिल.
वरातीच्या वेळी मुलीची आई किंवा कुठल्याही सवाष्ण स्त्रीला हळदीच्या सात गाठी तिच्या पदराला बांधून द्याव्यात. जेव्हा मुलगी सासरी पोहोचेल त्यानंतर ही हळद एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून कपाटामध्ये ठेवून द्यावी. हा उपाय केल्यानं मुलीला सासरी प्रेम आणि सन्मान दोन्ही मिळेल.
वरातीच्या वेळी मुलीनं आपली आई किंवा आई सारखीच जवळची असलेल्या सवाष्ण स्त्रीच्या भांगामधील कुंकू आपल्या भांगेत भरावं. यानं तिला सासरी प्रेम मिळेल आणि तिचं सौभाग्य अबाधित राहिल.
ज्या दिशेला मुलीचं सासर असेल त्या दिशेला मेहंदीमध्ये उडदाची डाळ मिसळून तिकडे फेकावी. यामुळे सासरी होणाऱ्या त्रासापासून मुलीला दूर ठेवता येईल.
वरातीच्या वेळी एका तांब्यामध्ये गंगाजल घ्यावं आणि त्यात हळद आणि तांब्याचा शिक्का टाकावा. त्यानंतर हे पाणी मुलीच्या डोक्यापासून पायापर्यंत ७ वेळा उतरवून एखाद्या निर्जनस्थळी टाकावं. यानं सासरी मुलीला प्रेम मिळेल.
वरातीच्या वेळी मुलीनं आईकडून तांब्याची चार खिळे घ्यावे आणि आपल्या सासरी बेडच्या चारही पायांवर लावून, ठोकून घ्यावे. यामुळे सासरच्या व्यक्तींचं प्रेम मिळतं.
(टीप: आम्ही या गोष्टींचं समर्थन करत नाही. मात्र, असं करणं हे चांगलं असल्याची अनेकांची मान्यता आहे आणि आम्ही त्याचं केवळ वृत्तांकन करत आहोत.)