Naraka Chaturdashi 2021 Date Time Puja Muhurat । मुंबईः नरकासुर राक्षसाच्या वधाचा आनंद साजरा करण्यासाठी नरक चतुर्दशी हा सण साजरा करतात. दरवर्षी दिवाळीत आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी येणारा नरक चतुर्दशी हा सण यंदा गुरुवार ४ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.
नरक चतुर्दशी निमित्त आकाशात तारे असताना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. शरीराला सुगंधी तेल आणि उटणे लावून मालीश करतात नंतर गरम पाण्याने आंघोळ करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.
आंघोळ करुन बाहेर येताना अकाली मृत्यू होऊ नये म्हणून कारीट नावाचे कडू फळ पायाने ठेचून उडवतात तर काही जण त्याचा रस जिभेला लावतात. आंघोळ झाल्यानंतर नवे कपडे घालतात. नटतात-सजतात. नंतर यमदीपदान (दीपदान), अन्नदान, वस्त्रदान केले जाते. लहान मुलांना आंघोळ केल्यानंतर त्यांची आई किंवा मोठी बहीण ओवाळते.
नरक चतुर्दशी निमित्त काही घरांमध्ये पहाटे (सूर्योदयाआधी) आंघोळीनंतर शंकराचे पूजन केले जाते. तर काही घरांमध्ये पहाटे (सूर्योदयाआधी) आंघोळीनंतर यम, श्रीकृष्ण, काली माता, शंकर, मारुती (हनुमान), वामन या सहा देवतांची पूजा करण्याची पद्धत आहे. पूजन करण्याआधी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस दोन्ही कोपऱ्यांना पणती (दिवा) ठेवतात.
काही घरांमध्ये नरक चतुर्दशी निमित्त गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करतात. या दिव्यात तिळाचे तेल टाकतात. दिव्याच्या चारही बाजूस कापसाच्या वाती लावून प्रज्वलीत करतात. हा दिवा घरातील देवांसमोर किंवा घरातील तुळशीच्या झाडाजवळ ठेवतात. नंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी दिव्याची पूजा करतात. संध्याकाळी घर, कामाचे ठिकाण या सर्व ठिकाणांना तेलाच्या दिव्यांनी उजळवून टाकले जाते.