Navratri 2020: आजपासून शारदीय नवरातोत्सवाला सुरूवात, नवरात्रोत्सवानिमित्त देवीचा जागर

Navratri 2020: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात देवीच्या विविध नऊ रुपांची पूजा, अर्चा केली जाते. सर्वत्र साधेपणाने आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येत आहे.

navratri puja
नवरात्रोत्सव  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • देवीच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना  
 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भाविकांना मंदिरात प्रवेशास मनाई 
 • सर्वत्र नवरात्रोत्सवाचा उत्साह, मात्र यंदा साधेपणाने नवरात्रोत्सव

मुंबई : आजपासून (१७ ऑक्टोबर २०२०) शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri) सर्वत्र सुरूवात झाली आहे. सर्वत्र देवीच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना (Ghatasthapana) करुन पूजा-अर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप मंदिरे (Maharashtra Temples) उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश नाहीये पण ऑनलाईन माध्यमातून भाविकांना देवीचे दर्शन (Online darshan) घेता येणार आहे. 

दरवर्षी नवरात्रीत सर्वत्र देवीच्या दर्शनासाठी भाविक मंदिरात गर्दी करत असतात. मात्र, राज्यात मंदिर बंद असल्याने भाविक मंदिरा बाहेरुन दर्शन घेत असल्याचं पहायला मिळालं. मुंबईतील मुंबा देवी मंदिरात नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पहाटे भाविकांनी रस्त्यावर उभे राहत देवीचे दर्शन घेतले. 

जम्मू-काश्मीरमध्ये सुद्धा नवरात्रीचा उत्साह पहायला मिळत आहे. माता वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झाल्याचं दिसत आहे. भाविकांनी दुर्गा मातेचं दर्शन घेण्यासाठी रांग लावल्याचं पहायला मिळालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आखून दिलेल्या सूचनांचे पालन करुन भाविकांना दर्शन घेता येत आहे. सर्व भाविकांचे मंदिर प्रवेश द्वारावर स्क्रिनिंग करण्यात येत, फेस मास्क अनिवार्य आहे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन आणि सॅनिटायजरचा वापर करण्यात येत आहे. 

उत्तरप्रदेशातील कानपूर येथील वैभव लक्ष्मी आणि दुर्गा मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यानंतर भाविकांनी देवीचे दर्शन घेतलं.

दिल्लीतील झंडेवालन मंदिरात देवीची मनोभावे पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी मंदिरात देवीचे दर्शन घेतलं. 

राज्यात असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. तसेच या संदर्भात राज्याच्या गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना 

 1. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महानगरपालिका / स्थानिक प्रशासन यांची धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. 
 2. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. 
 3. या वर्षांता नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवी मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. 
 4. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट आणि घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी. 
 5. या वर्षी शक्यतो पारंपारिक देवी मूर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्याने कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
 6. नवरात्रोत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. 
 7. गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. 
 8. आरती, भजन, किर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदीचे पालन करण्यात यावे.
 9. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट आणि फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
 10. देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुक करणाची तसेच थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था कराण्यात यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी