Navratri 2020: नवरात्र सुरू होण्यापूर्वी करुन घ्या ही ८ कामे 

Durga Puja: शारदीय नवरात्रोत्सव १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येत असतो.

navratri puja
नवरात्रोत्सव  |  फोटो सौजन्य: Twitter

Navratri 2020: १७ ऑक्टोबर रोजी घटस्थापना (Ghatasthapana) आहे. घटस्थापनेपासून नवरात्रीला (Navratri) सुरूवात होते. नवरात्रोत्सवाला भारतात खूपच वेगळे आणि खास महत्व आहे. यंदा १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र, दूर्गापूजा, दसरा हे सण साजरे केले जाणार आहेत. १७ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होईल तसेच इतर धार्मिक विधी करण्यात येतील. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मात्र, नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी तुम्हाला घरात काही गोष्टी करणं गरजेचं आहे.

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाल्यावर या नऊ दिवसांत भाविक देवीची मनोभावे पूजा करतात. देवीची पूजा करुन नऊ दिवसांचे व्रत करण्यात येते. या नऊ दिवसांत भाविक अनेक नियमांचे पालन करुन व्रत, उपवास करतात. तसेच दुर्गामातेच्या आगमनापूर्वी तुम्हाला काही गोष्टी करणं महत्वाचे आहे. 

पाहूयात काय आहेत या गोष्टी 

घराची साफसफाई : 

नवरात्र सुरू होण्यापूर्वी घराची साफसफाई करा. घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करा. असे मानले जाते की, स्वच्छता नसलेल्या घरातील भाविकांवर आईची कृपा होत नाही. 

घर शुद्ध करा :

घराची साफसफाई केल्यावर घर शुद्ध करणे देखील आवश्यक आहे. यासाठी घरात गोमूत्र शिंपडा. हे आपले घर शुद्ध बनवेल. याच्यासोबतच एक दिवस आधी घरात कलश स्थापना करा.

घराच्या दरवाजात स्वस्तिक :

नवरात्र सुरू होण्यापूर्वी आपल्या घराच्या मुख्य दरवाजात स्वस्तिक काढा. स्वस्तिक आणि रांगोळी काढून आईचे स्वागत करा. ज्या घरात पूजा करायची आहे त्या ठिकाणी सुद्धा चौरंगासमोर स्वस्तिक काढा. रांगोळी काढा, फुलांनी सजावट करा

घरापासून नॉन व्हेज दूर ठेवा :

घरात किंवा फ्रिजमध्ये असलेले मांसाहारी, नॉनव्हेज असेल तर ते नवरात्र सुरू होण्यापूर्वी काढा. असंही म्हटलं जातं की, शक्य असल्यास घरात लसूण, कांदे ठेवू नका.

कपड्यांची व्यवस्था :

नवरात्रीत रंगांना विशेष महत्व आहे. नवरात्रोत्सवात गडद किंवा काळे कपडे परिधान न करता नऊ दिवस स्वच्छ कपडे घालण्याची व्यवस्था करा.

केसांची निगा : 

जर तुम्ही केस कापण्याचा विचार करत असाल तर नवरात्र सुरू होण्यापूर्वी आपले केस कापून घ्या. नवरात्रीत नऊ दिवस दाढी-मिशी आणि केस कापणे शुभ मानले जात नाही.

नखे कापून घ्या : 

नवरात्र सुरू होण्यापूर्वी नखे कापून घ्या. नवरात्रीत नखे कापने अशुभ मानले जाते त्यामुळे नवरात्रीत नखे कापू नका.

उपवासाच्या वस्तू : 

नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास असतो. त्यामुळे या काळात उपवासासाठी लागणारे पदार्थ घरात आणून ठेवा. ज्यामध्ये शेंगदाणे, साबुदाणे, बटाटे आणि इतर उपवासाच्या पदार्थांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी