navratri 2020 नवरात्रीत कशी करतात घटस्थापना?

navratri 2020 ghatasthapana vidhi शारदीय नवरात्रारंभ. पहिल्या पूजेच्यावेळी सर्वात आधी घटस्थापना करणे आवश्यक आहे. घटस्थापनेनंतर दररोज देवीसमोर तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी आरती करा.

navratri 2020 ghatasthapana vidhi
navratri 2020 नवरात्रीत कशी करतात घटस्थापना? 

थोडं पण कामाचं

  • navratri 2020 नवरात्रीत कशी करतात घटस्थापना?
  • महाराष्ट्रातला घटस्थापनेचा विधी (घटस्थापना अथवा कलश स्थापना)
  • नवरात्रीच्या नऊ दिवसांत जागरण, नवचंडी यज्ञ, पुण्याहवाचन, सप्तीशतीचा पाठ, देवीच्या धार्मिक स्तोत्रांचे पठण

मुंबईः नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. घट म्हणजेच कलश. हा घट माती, तांब्याचा अथवा पितळ्याचा असतो. घटाची स्थापना करण्याचा अथवा कलशाची स्थापना करण्याचा विधी अतिशय महत्त्वाचा आहे. याच विधीने नवरात्रीच्या उत्सवाची सुरुवात होते. अनेकांना हा विधी नेमका कसा करतात हे माहीत नसते अथवा ऐकीव माहितीआधारे विधी केला जातो. या पद्धतीने विधी करण्यापेक्षा जाणून घ्या कशी करतात घटस्थापना?

शारदीय नवरात्रारंभ यंदा आज होत आहे. काही ठिकाणी सकाळी पूजा आणि संध्याकाळी आरती अशी पद्धत आहे तर काही ठिकाणी संध्याकाळी पूजा आणि आरती करण्याची पद्धत आहे. यापैकी कोणतीही पद्धत असली तरी पहिल्या पूजेच्यावेळी सर्वात आधी घटस्थापना करणे आवश्यक आहे. घटस्थापनेनंतर दररोज देवीसमोर तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी आरती करा.

महाराष्ट्रातला घटस्थापनेचा विधी (घटस्थापना अथवा कलश स्थापना)

शारदीय नवरात्रात घटस्थापना हा सर्वात महत्त्वाचा विधी आहे. यासाठी आग्नेय दिशेला जिथे घट स्थापन करणार, पूजा आणि आरती करणार तो संपूर्ण भाग स्वच्छ करा. घट स्थापन करण्यासाठी केळीच्या पानावर मातीचा छोटा ओटा तयार करा. 

हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही काम करण्याचाय एक शुभमुहूर्त असतो. त्याप्रमाणे घटस्थापनेचाही एक शुभमुहूर्त आहे. या वर्षी हा मुहूर्त पहिल्या दिवशी १७ ऑक्टोबर रोजी ०६:२७पासून ते सकाळी १०:१३पर्यंत असणार आहे. तर घटस्थापनेचा अभिजीत मुहूर्त सकाळी ११:४४पासून ते १२:२९पर्यंत असेल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच घटस्थापना करतात. 

घटस्थापनेसाठी पूजेला बसल्यानंतर प्रथम स्वतःला आणि संपूर्ण पूजा साहित्य मंत्राने पवित्र करून घेतात. 'ॐ अपवित्रः पवित्रोवा सर्वावस्थां गतोऽपिवा। यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः॥', असा मंत्र म्हणतात. हा मंत्र म्हणून आंब्याचे एक पान हातात घेऊन कलशातील पाण्याने आधी स्वतःवर आणि नंतर पूजा साहित्यावर प्रोक्षण करतात. उजव्या हातात अक्षत, फूल, जल, विडा, नाणी आणि सुपारी घेऊन नवरात्र दुर्गा पूजनाचा संकल्प करतात.

नंतर ॐ विष्णुर्विष्णुर्विष्णु:, ॐ अद्य ब्रह्मणोऽह्नि द्वितीय परार्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे, अष्टाविंशतितमे कलियुगे, कलिप्रथम चरणे जम्बूद्वीपे भरतखण्डे भारतवर्षे पुण्य (आपल्या क्षेत्राचे वा भागाचे नाव घेतात) क्षेत्रे बौद्धावतारे वीर विक्रमादित्यनृपते: २०७७, तमेऽब्दे शार्वरी नाम संवत्सरे सूर्य उत्तरायणे शरद ऋतो महामंगल्यप्रदे मासानां मासोत्तमे आश्विन मासे शुक्ल पक्षे प्रतिपदायां तिथौ शनि वासरे (गोत्राचे नाव घेतात) गोत्रोत्पन्नोऽहं अमुकनामा (स्वतःचे नाव घेतात सकलपापक्षयपूर्वकं सर्वारिष्ट शांतिनिमित्तं सर्वमंगलकामनया- श्रुतिस्मृत्योक्तफलप्राप्त्यर्थं मनेप्सित कार्य सिद्धयर्थं श्री दुर्गा पूजनं च महं करिष्ये। तत्पूर्वागंत्वेन निर्विघ्नतापूर्वक कार्य सिद्धयर्थं यथामिलितोपचारे गणपति पूजनं करिष्ये। 'यथोपलब्धपूजनसामग्रीभिः कार्य सिद्धयर्थं कलशाधिष्ठित देवता सहित, शारदीय नवरात्र श्री दुर्गा पूजनं महं करिष्ये।

एका लाल कापडावर चंदनाने अथवा कुंकवाने स्वस्तिक काढतात. या कापडावर दुर्गा देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करतात. यानंतर मातीच्या ओट्यावर कलश ठेवतात. लक्षात ठेवा, देवीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूलाच कलशस्थापना करायची असते. ओट्यावर घटस्थापना करतात आणि घटाखाली मातीत सात प्रकारचे धान्य (जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी) पेरतात तसेच सात प्रकारची माती मिसळतात. घटामध्ये स्थानिक शुद्ध पाणी आणि गंगाजल एकत्र स्वरुपात भरतात. या पाण्यात एक रुपयाचे नाणे आणि कुलदेवतेची मूर्ती ठेवली जाते. घटात आंब्याची पाने ठेवतात. अक्षता, फूल आणि गंगाजल घेऊन वरुण देवतेचे आवाहन केले जाते. कलशावर एका पात्रात धान्य (महाराष्ट्रात तांदुळ) भरून त्या समोर एक दीप प्रज्ज्वलित करतात. यानंतर कलशावर लाल रंगाचे वस्त्र लपेटून नारळ ठेवतात. 

कलशाखाली असलेल्या मातीत जव पसरतात. यानंतर देवीचे ध्यान करतात. 'खड्गं चक्र गदेषु चाप परिघांछूलं भुशुण्डीं शिर:, शंखं सन्दधतीं करैस्त्रि नयनां सर्वांग भूषावृताम। नीलाश्मद्युतिमास्य पाद दशकां सेवे महाकालिकाम, यामस्तीत स्वपिते हरो कमलजो हन्तुं मधुं कैटभम।।', असा मंत्र म्हणतात.

षोडषोपचार पूजा केली जाते. यासाठी नऊ झेंडूच्या फुलांची माळ तसेच तीळ घटाला अर्पण केले जातात. घटासमोर विड्याचे पान, पानावार एक रुपयाचे नाणे आणि त्यावर सुपारी ठेवतात. या विड्यावर पळीने थेंबभर पाणी सोडले जाते नंतर गंध, अक्षता आणि फुले वाहिली जातात. ताम्हनात हळकुंड आणि सुपारी मांडून त्याची पूजा करतात. त्यावर पळीने पाणी सोडतात आणि त्यालाही गंध, अक्षता आणि फुले वाहिली जातात.

घटाला नमस्कार करुन नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात. अष्टमी किंवा नवमीला उपवास करतात. जी व्यक्ती पूजा करणार असेल त्यांनी पूजा करेपर्यंत उपवास धरावा आणि पूजेनंतर उपवास सोडावा. नवरात्रीत सुवासिनी अथवा कुमारिका यांना बोलावून त्यांचे ओवाळले जाते तसेच त्यांना भोजन आणि दक्षिणा दिली जाते. 

अश्विन शुद्ध पंचमीला ललिता व्रत अर्थात 'ललिता पंचमी'ची पूजा केली जाते. हा विधी स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत जागरण, नवचंडी यज्ञ, पुण्याहवाचन, सप्तीशतीचा पाठ, देवीच्या धार्मिक स्तोत्रांचे पठण केले जाते. देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन केले जाते. तिची यथासांग पूजा केली जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी