शनिदेवांना (Lord Shani) न्यायाची देवता (deity of justice) मानले जाते. जर शनिदेव कुणावर प्रसन्न झाले तर ती व्यक्ती अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून राजा होऊ शकते आणि जर ते संतापले तर व्यक्ती राजापासून भिकारीही बनू शकते. त्यामुळे शनीची कृपा नेहमी आपल्यावर राखणे हे गरजेचे असते. यासाठी नियमितपणे शनीदेवाची पूजाअर्चना करावी असे मानले जाते.
शनिदेवांच्या या सहा मंदिरांबाबत असे मानले जाते की, इथे आल्याने मनुष्याचे सर्व शनिदोष दूर होतात आणि त्याला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. शनीच्या वक्रदृष्टीपासून सर्वांनीच सावध राहायला हवे. त्यामुळे आम्ही आपल्याला शनीच्या या मंदिरांबाबत सांगणार आहोत जिथे शनिदोषापासून मुक्त होण्यासाठी आपण जाऊ शकता.
कोकिलावन धाम शनिमंदिर: उत्तर प्रदेशातील मथुरा येथील कोसीकला इथे सूर्यपुत्र शनिदेवांचे मंदिर आहे जे अतिशय चमत्कारिक मानले जाते. शनिदेवांचे हे मंदिर नंदगांव, बरसाना आणि श्री बांकेबिहारी मंदिराच्या जवळ आहे. असे मानले जाते की, शनिदोष असलेल्या मनुष्याने इथे जरूर यावे. सोबतच या मंदिरात शनीच्या पूजेनंतर परिक्रमा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. पौराणिक मान्यतांनुसार इथे शनिदेवांना खुद्द श्रीकृष्णाने दर्शन दिले होते आणि त्यांना वरदान दिले होते की इथे येऊन जो पूजा करेल आणि परिक्रमा करेल त्याचे सारे शनिदोष दूर होतील.
शनिमंदिर, उज्जैन: मध्यप्रदेशातील उज्जैन येथील सांवेर रस्त्यावरील प्राचीन शनिमंदिरात दर्शन घेतल्याने शनिदोष दूर होतो. या मंदिरात नवग्रहही स्थापन आहेत, त्यामुळे हे मंदिर नवग्रह मंदिर म्हणूनही ओळखले जाते. ज्यांच्यावर शनीच्या साडेसातीचे, अडीच वर्षांच्या संकटाचे सावट आहे त्यांनी या मंदिरात येऊन पूजा करावी. मंदिराच्या जवळूनच क्षिप्रा नदी वाहते, ज्याला त्रिवेणी संगम म्हणूनही ओळखले जाते.
शनिशिंगणापूर मंदिर: महाराष्ट्राच्या शनिशिंगणापूर गावातील मंदिरही खूप चमत्कारिक मानले जाते. हे पूर्ण गावच देशभरात अतिशय महत्वाचे आहे. इथे शनिदेवाची प्रतिमा खुल्या आकाशाखाली आहे आणि या मंदिराला छप्पर नाही. इतकेच नाही, तर या गावात कोणीही आपल्या घरांना कुलुपे लावत नाही. या गावाचे रक्षण प्रत्यक्ष शनी करतो अशी मान्यता आहे. इथे शनीचे सामर्थ्य सर्वाधिक आहे आणि त्यामुळे सर्वांचे कष्ट दूर होतात अशी मान्यता आहे.
शनिमंदिर, इंदौर: मध्यप्रदेशातील इंदौरमधील शनिदेवाचे मंदिर अनेक कारणांमुळे महत्वपूर्ण आहे. इथे भगवान शनीचे सोळा शृंगार केले जातात. इंदौरच्या जुने इंदौर भागातील हे मंदिर काळ्या पाषाणापासून बनलेले आहे. इथे शनीदेवाला शाही वस्त्रे घातली जातात आणि मोठ्या खास पद्धतीने त्यांचा शृंगार केला जातो.
शनिश्चर मंदिर, ग्वाल्हेर: ग्वाल्हेरमधील हे शनिमंदिर अतिप्राचीन आहे. असे मानले जाते की इथे शनिदेवाचे जे पिंड आहे ते हनुमानाने लंकेवरून फेकले होते आणि ते इथे येऊन पडले. यानंतर शनिदेवांची स्थापना इथेच करण्यात आली. इथे शनिदेवांची पूजा केल्यानंतर त्यांना मोहरी किंवा तिळाचे तेल चढवले जाते आणि त्या मूर्तीला मिठी मारून आपल्या समस्या सांगितल्या जातात. असे केल्याने शनिदेव सर्व समस्या दूर करतात अशी मान्यता आहे.
सारंगपूर कष्टभंजन हनुमान मंदिर, गुजरात: गुजरातमधील भावनगर इथे असलेले हनुमान मंदिर हेही अत्यंत प्राचीन आहे ज्याला कष्टभंजन हनुमान मंदिर म्हटले जाते. या मंदिराची खासियत ही आहे की इथे मारुतीच्या सोबत शनिदेव विराजमान आहेत. इथे शनिदेव स्त्रीरुपात मारुतीच्या चरणांशी विराजमान आहेत. असे म्हटले जाते की या कष्टभंजन हनुमानाची पूजा केल्याने सर्व दोष दूर होतात.
(टिप : आम्ही या गोष्टीचं समर्थन करत नाही. मात्र, या मंदिरात दर्शन घेतल्याने शनिदोष दूर होतो अशी अनेकांची मान्यता आहे आणि आम्ही केवळ त्याचं वृत्तांकन करत आहोत.)