Tulsi Vivah Time Tulsi Mata Aarti Lyrics in Marathi : कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करतात. तुळस म्हणजे लक्ष्मीचा अवतार तर शाळीग्राम म्हणजे विष्णुचा अवतार. तुळशी विवाहाच्या वेळी तुळशीच्या रोपाचा शाळीग्रामसोबत विधीवत विवाह केला जातो. यालाच तुळशी विवाह किंवा तुळशीचे लग्न असे म्हणतात. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते.
कार्तिक शुक्ल एकादशी (कार्तिक शुद्ध एकादशी) म्हणजे प्रबोधिनी एकादशी. या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा प्रबोध उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन उत्सव कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा या काळात साजरे केले जातात. अनेक ठिकाणी कार्तिक शुक्ल द्वादशी या दिवशी तुळशी विवाह किंवा तुळशीचे लग्न हा सोहळा साजरा करतात. यंदा शनिवार 5 नोव्हेंबर 2022 रोजी कार्तिक शुक्ल द्वादशी या दिवशी तुळशी विवाह किंवा तुळशीचे लग्न आहे. हा पूजेचा उत्सव अर्थात पूजोत्सव आहे.
भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला (प्रबोधिनी एकादशी) संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळस प्रिय आहे. तुळस म्हणजे लक्ष्मीचा अवतार आहे. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून विशेष महत्त्व आहे. तुळस ही वनस्पती भारतातील सर्व राज्यांमध्ये उगवणारी वनस्पती आहे. आजही देशातील अनेक हिंदू कुटुंबाच्या घरात तुळस आढळते. याच कारणामुळे हिंदू कुटुंब तुळशी विवाह हा सोहळा उत्साहाने साजरा करताना आढळतात.
घरातील कन्या समजून तुळशीचा शाळीग्राम सोबत विवाह लावून दिला जातो. काही ठिकाणी तुळस आणि बाळकृष्ण अथवा तुळस आणि कृष्णाची मूर्ती यांचा विवाह केला जातो. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि शाळीग्राम वा बाळकृष्ण वा कृष्ण यांची विधीवत पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार करून विष्णूला जागे करतात. नंतर आंतरपाट धरतात. मंगलाष्टके म्हणतात. तुळशीचा विवाह संपन्न होतो. कुटुंबातील कर्ता माणूस तुळशीचे कन्यादान करतो. नंतर मंत्रपुष्पांजली आणि आरती केली जाते. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे.
विधीवत तुळशी विवाह लावून देणाऱ्या घरातील कर्त्याला तुळशीचे कन्यादान केल्यानंतर कन्यादानाचे पुण्य लाभते. यामुळे तुळशी विवाह या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. व्यवस्थित तुळशी विवाह झाल्यास ज्या कर्त्याने विवाह लावून दिला त्याला तसेच विधी सांगणारी व्यक्ती यांना आणि त्यांच्या कुटुंबाला विष्णू आणि लक्ष्मी यांचे आशीर्वाद लाभतात असे सांगतात.
तुळशी विवाह सोहळा झाल्यानंतर सर्व शुभ कार्यांची सुरुवात होते. लग्न (विवाह), गृहप्रवेश, मुंज आदी शुभ कार्य सुरू होतात. संतती प्राप्तीसाठी विष्णू सहस्रनाम म्हणतात. भगवद्गीतेचे पठण करतात. संध्याकाळी तुळशी विवाह उत्साहाने विधीवत करतात.
कांची नगरावर कनक राजा राज्य करत होता. त्याला नवसाने मुलगी झाली. नाव ठेवले किशोरी. ज्योतिषाने पत्रिका पाहिली. किशोरी ज्याच्याशी लग्न करेल तो अंगावर वीज पडून मरेल असे ज्योतिषी म्हणाला.
ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला. मंत्राचा जप कर. तुळशीची पूजा कर असे सांगितले. किशोरी तसे करू लागली. किशोरी वयात आली तसे तिला पाहून मोहित झालेला गंध्या मुलीचे रुप घेऊन एका महिलेसोबत किशोरीला भेटला. महिला म्हणाली ही मुलगी दासी बनून देवासाठी फुलांचे हार करून देईल. किशोरीने मुलीला दासी म्हणून ठेवून घेतले.
काही काळाने एका राजाचा मुलगा आणि सूर्यदेवाचा भक्त राजकुमार मुकुंद किशोरीवर भाळला. त्याने सूर्यदेवाची प्रार्थना केली. किशोरीसोबत लग्न व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. सूर्यदेव कनक राजाच्या स्वप्नात आला. नंतर मुकुंदसोबत किशोरीचे लग्न ठरले. लग्नाचे कळले आणि गंध्याला वाईट वाटले. त्याने किशोरीचा हात धरला आणि तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पाऊस सुरू झाला आणि विजा कडाडल्या. गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली. गंध्या मरण पावला. किशोरीवरचे संकट टळले. नंतर किशोरी आणि मुकुंद यांचे लग्न झाले.
तुळशीची पूजा करण्याचा किशोरीला फायदा झाला तसा इतरांनाही व्हावा यासाठी दररोज तुळशीची पूजा करतात आणि कार्तिक शुक्ल द्वादशीला तुळशी विवाह करतात.
जय देव जय देवी जय माये तुळशी ।
निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥
ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥ जय देवी. ॥ १ ॥
शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥ जय देवी. ॥ २ ॥
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ॥
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ ३ ॥