Kitchen Vastu Tips: वास्तू शास्त्र म्हणजे आठ दिशा आणि पंचमहाभूतं यांचे शास्त्र. पंचमहाभूतं म्हणजे पृथ्वी, पाणी, हवा, अग्नी आणि आकाश. मानवी आयुष्य हे दिशा आणि पंचमहाभूतांवर अवलंबून आहे. यामुळे घराची रचना योग्य दिशेला योग्य व्यवस्था अशा प्रकारे झाली तर दिशांचा आणि पंचमहाभूतांचा सकारात्मक प्रभाव वास्तूवर अर्थात घरावर होतो. घरातील सकारात्मक उर्जा वाढते. वास्तूशास्त्र हे घर आणि घरातील नागरिक यांना जास्तीत जास्त सकारात्मक उर्जेचा लाभ व्हावा या उद्देशानेच विकसित झाले आहे.
धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय
भारतात जन्मलेले वास्तूशास्त्र हे प्रामुख्याने संस्कृती, परंपरा, भौतिक घटक आणि ग्रहस्थिती यावर अवलंबून आहे. वास्तूमध्ये सुख समृद्धीसाठी विशिष्ट दिशेला विशिष्ट बांधकाम असणे अपेक्षित आहे. काही कारणाने तसे नसल्यास काय करावे याचेही उपाय वास्तूशास्त्राने सुचविले आहेत. घर कसे असावे, घरात स्वयंपाक घर कसे आणि कुठे असावे, घरातील झोपण्याची खोली कुठे आणि कशी असावी अशा सर्व प्रश्नांची उत्तरे वास्तूशास्त्र देते.
कोणत्याही घरात स्वयंपाक घर या जागेला विशेष महत्त्व आहे. कारण माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे. हे अन्न रुचकर स्वरुपात मिळाले तर माणसाला आनंद होतो. त्याच्या जगण्याचा उत्साह वाढतो. संबंधित व्यक्तीमध्ये सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो. यामुळे मानवी आयुष्यात स्वयंपाक घराला महत्त्व आहे. मानवी आयुष्याशी थेट संबंध असल्यामुळे वास्तूशास्त्रातही स्वयंपाक घराला विशेष महत्त्व आहे.
स्वयंपाक घराच्या निर्मितीत गंभीर वास्तूदोष आढळले तर ते दूर करण्याला वास्तूतज्ज्ञ प्राधान्य देतात. कारण वास्तूमधील स्वयंपाक घरातील दोष हा घरातल्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या आनंदावर तसेच त्यांच्या प्रगतीवर प्रतिकूल परिणाम करू शकतो. यामुळे वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाक घराची रचना असणे संबंधित घरातील सदस्यांच्या हिताचे आहे असे सांगतात.
वास्तूशास्त्रानुसार घरातील स्वयंपाक घर हे घराच्या पूर्व दिशेला असणे अपेक्षित आहे. यामुळे घरातील नागरिकांना निरोगी दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धी लाभू शकते. संबंधित व्यक्तीची प्रगती होऊ शकते.
वास्तूशास्त्रानुसार घरातील स्वयंपाक घराची दिशा चुकली तर संबंधित घरात राहणाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. यामुळे वास्तूतज्ज्ञ घर वास्तूशास्त्राच्या दृष्टीने तपासताना स्वयंपाक घराची रचना काळजीपूर्वक बघतात.
वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाक घरामध्ये चप्पल बूट घेऊन वावरणे चुकीचे आहे. स्वयंपाक घरात गॅसची शेगडी विझणार नाही अशा पद्धतीने वाऱ्याच्या येण्याजाण्याची आणि पुरेश्या प्रकाशाची व्यवस्था आवश्यक आहे.
स्वयंपाक घरात प्रवेश करण्याआधी दररोज संबंधित व्यक्तीने आंघोळ करणे महत्त्वाचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने वास्तूशास्त्रात हा नियम आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्वयंपाक घरात देवाचे नामस्मरण करून प्रवेश करावा, गॅसच्या शेगडीला किंवा स्वयंपाक करण्याच्या चुलीला देव समजून त्याची हळद-कुंकवाने पूजा करावी. यानंतर स्वच्छतेला प्राधान्य देत घरात असलेल्यांना आवडतील किंवा त्यांची तब्येत जपतील असे पदार्थ तयार करण्यावर भर द्यावा; असे वास्तूशास्त्र सांगते.
वास्तूशास्त्रानुसार गॅसच्या शेगडीची जागा घराच्या आग्नेय दिशेला आणि स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेला असावे. यामुळे संबंधित वास्तूतील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते